निधी मस्त, पण अधिकारी स्वस्थ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सांगली - पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत नेत्यांनी अधिकाऱ्यांना धू धू धुतले. कामचुकार अधिकाऱ्यांमुळे निधी पडून असल्याचे धक्‍कादायक चित्र समोर आले. त्यामुळे ‘थंडोबा अधिकाऱ्यांची गय करणार नाही’, असा कडक शब्दांत पालकमंत्र्यांना इशारा द्यावा लागला.

सांगली - पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत नेत्यांनी अधिकाऱ्यांना धू धू धुतले. कामचुकार अधिकाऱ्यांमुळे निधी पडून असल्याचे धक्‍कादायक चित्र समोर आले. त्यामुळे ‘थंडोबा अधिकाऱ्यांची गय करणार नाही’, असा कडक शब्दांत पालकमंत्र्यांना इशारा द्यावा लागला.

सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना झालंय तरी काय? सदाभाऊ खोत यांच्या बैठकीत काही अधिकारी फेसबुक आणि व्हॉटस्‌ॲपवर मश्‍गूल होते, अशांना साधी नोटीसही प्रशासन देऊ शकले नाही. आता तर अनेक विभागांचा निधी पडून असल्याचे सांगत आमदार जयंत पाटील, अनिल बाबर आणि शिवाजीराव नाईक यांनी प्रशासनाच्या कारभाराची पूर्ण धुलाई केली. त्यामुळे  भाजप नेतृत्वाचा कसलाही अंकुश प्रशासनावर नाही काय, असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अर्थात भाजप आमदारांनीही प्रशासनाच्या कारभारावर आसूड ओढलेच!

तरतूद होऊन विकासकामांवर निधी खर्च करण्यात चालढकल होत असल्याबद्दल आज नियोजन समिती सभेत सदस्यांनी प्रशासनावर टीकेचा भडिमार केला. जबाबदार यंत्रणा आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा,  अशी मागणी सदस्यांनी एकमुखाने केली. सदस्यांचा हा पवित्रा पाहून श्री. देशमुख यांनी आरोपांना उत्तरे द्या,  कामे वेळेत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, कामचुकारांची गय करणार नाही, असा इशारा दिला. जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या विविध  विभागांच्या कामांवर आक्षेप घेत निधी मुबलक असताना वेळेत खर्च होत नसल्याचा गंभीर आरोप केला. जून  संपत आला तरी निधी खर्च होत नाही, असा मुद्दा उपस्थिती करून अधिकारी करतात काय, असा सवाल केला. कुक्‍कुटपालनवर तरतुदीपैकी खर्च शून्य टक्के कसा? असाही सवाल केला. तसेच जतसारख्या  दुष्काळी तालुक्‍यातील दुधेभावी गावात तीन कोटींची तरतूद असताना एक कोटी खर्च झाले; मात्र कामेच झाली नाहीत हे कसे ? जिल्हाधिकाऱ्यांनी काल कसला आढावा घेतला? असा प्रश्‍न केला. 

दरम्यान, याच विषयावरून पाटबंधारे व जिल्हा परिषदेत समन्वय नाही, याबद्दल सदस्यांनी टीकेचा सूर आळवला. 

शिराळा तालुक्‍यातील ४५ गावांत अजून वीजपंपाना कनेक्‍शन मिळत नाहीत, हा मुद्दा उपस्थित करून नाईक यांनी वीज मंडळाच्या कारभारावर टीका केली. श्री. नाईक यांनी चांदोली राष्ट्रीय अभयारण्य परिसरात रस्त्यांची कामे केली तर पर्यटन वाढेल, असे सांगितले. तसेच कास पठाराप्रमाणे फुलांच्या वैविध्य असलेल्या गुढे पठारावर पर्यटन विकासास वाव आहे. तिथे रस्ते व अन्य कामांसाठी तरतूद करा, अशी मागणी केली.      
माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी पिण्याच्या पाणी योजनांना अनुसरून म्हैसाळचे पाणी लांडगेवाडी तलावात सोडण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेची टीका केली. केवळ दोन विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे टॅंकरवर खर्च वाढतो आहे. एक तलाव भरला तर कवठेमहांकाळसह अकरा गावांचा पाणी प्रश्‍न वर्षभर निकालात निघेल, असे सांगत शेखर गायकवाड जिल्हाधिकारी असल्यापासून पाठपुरावा करतोय. मात्र प्रश्‍न जसाच्या तसा आहे, असे सांगितले.

ते म्हणाले,‘‘म्हैसाळ योजनेच्या थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणा. पण  लोकांचे हाल होता कामा नयेत, असेही ते म्हणाले.           

आमदार अनिल बाबर यांनी जिल्ह्यात १३००० कृषी पंपांना वीज देणे बाकी आहे, त्यावर महावितरण काहीच करीत नाही. ऊर्जामंत्री व अर्थमंत्र्यांसोबत बैठक घेऊनही तोडगा निघाला नाही, असा भाजप सरकारला घरचा आहेर दिला. त्यावर तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी केली. 

कोपरखळ्या... 
आमदार जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे वर्ग निधी दोन-दोन वर्षे खर्च होत नाही, अशी टीका केली.  त्यावेळी पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी तुमच्याच काळात असा कायदा केला आहे. जिल्हा परिषदेला दोन वर्षांपर्यंत निधी खर्च करण्याची तरतूद आहे, असा पलटवार केला; तर आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिराळा तालुक्‍यातील ४५ गावांत अजून कृषी पंपांना वीज कनेक्‍शन मिळाली नाही, असे सांगताच जयंत पाटील  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात देशात एकही गाव विजेशिवाय राहणार नाही. मग तुमच्याच राज्यात असं कसं, असा सवाल केला. तर जयंत पाटील एकावर एक प्रश्‍न उपस्थित करू लागताच, खासदार संजय पाटील यांनी पूर्वीचे पालकमंत्री दहा मिनिटांत डीपीडीसी उरकत, आता आम्ही भरपूर वेळ देतोय, हे लक्षात घ्या, असे सांगितले. त्यावर जयंत पाटील यांनी पुन्हा त्यांना बोलवा, अशी कोपरखळी मारली.

लोकप्रतिनिधी काय म्हणाले...

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जिल्ह्यातील ग्रंथालयासाठी काहीच करीत नाही, नावीन्यपूर्ण योजनेतून काही निधी देऊन विकास योजना कराव्यात, अशी मागणी केली. अपंगांसाठी स्वयंचलित सायकल पुरवण्याची योजना राबवावी.    
- अनिल बाबर, आमदार

जिल्हा परिषदेच्या शाळा प्रगती करीत आहेत. महामार्ग व तलावाशेजारील शाळांसाठी कुंपण घालावे, अशी मागणी केली. 
- सुरेश खाडे ,आमदार

म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी थकबाकी भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून कर्ज देण्याची  तरतूद करावी.
- अजितराव घोरपडे

जिल्ह्यातील पशुधनाच्या तुलनेत पशुचिकित्सालये व डॉक्‍टरांची संख्या वाढवा. चार-पाच गावांसाठी एकच डॉक्‍टर काम पाहत आहे.
- शिवाजीराव नाईक, आमदार

जिल्हा परिषदेकडे कर्मचारी कमी आहेत, तरी यंत्रणा सक्षमपणे राबवून काम करीत आहे. त्यात अधिक सुधारणा झालेली दिसेल.
- संग्रामसिंह देशमुख, अध्‍यक्ष, जि.प.

बुधगावमध्ये पाणी योजनेच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला आहे. सर्वसाधरण किमतीपेक्षा जादा दराने साहित्य खरेदी केले आहे. त्याची चौकशी करावी, सर्व संबंधितांवर कारवाई करा. 
- बजरंग पाटील, शिवसेना

Web Title: sangli news sangli districr officer