#MarathaKrantiMorcha मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ उद्या सांगली जिल्हा बंदची हाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश सांगलीत येताना न आणल्यास सोमवारी (ता.३०) जिल्हा बंद केला जाईल, तसेच सांगलीत महापालिका क्षेत्रात मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी  येथे पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश सांगलीत येताना न आणल्यास सोमवारी (ता.३०) जिल्हा बंद केला जाईल, तसेच सांगलीत महापालिका क्षेत्रात मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी  येथे पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे गेली २० वर्षे सातत्याने मागणी करीत आहोत. आताच ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत म्हणून आंदोलन केले जात नाही. यापूर्वी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना पुरंदर येथे त्यांचे हेलिकॉप्टर त्याच मागणीसाठी फोडले होते. गेली दोन वर्षे मराठा क्रांतीच्या नावाने आंदोलन सुरू आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्याबाबत ठोस कृती न करता समाजाला खिजवण्याचा उद्योग सुरू केला. राज्यात, देशात शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले. सरकारने आश्‍वासन देऊनही ते पूर्ण न झाल्याने असंतोष वाढला. दहा दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सांगलीत येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगलीत येताना सोबत मराठा आरक्षणाचा अध्यादेश आणावा, तो न आणल्यास त्यांच्या निषेधार्थ जिल्हा बंद केला जाईल, महापालिका क्षेत्रात निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मराठा क्रांतीतर्फे निदर्शने केली जातील.’’ 

ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाची दिशाभूल करून अपमान कसा होईल, असाच दृष्टिकोन ठेवलेला आहे. पंढरपूर आषाढीवारीत साप सोडले जाणार असल्याची अफवा पसरवली होती. शिवाजी महाराजांचे खरे मावळे नाहीत, असेही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते, यासाठी त्यांचा आम्ही निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे, की आमची संस्कृती ज्ञानदेव, तुकारामांची आहे. वारीमध्ये आमचेच आई-वडील होते. आमच्या घरातील मंडळी वारीत असताना साप सोडतील का? याचाच त्यांनी विचार करावा. साप सोडणाऱ्या मंडळींची नावे मुख्यमंत्र्यांनीची जाहीर करावीत, अशी मागणी केली.

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची जीभ सैल झाली आहे. २०११ मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायरीवर बसून आंदोलन केले होते, याचाच त्यांना विसर पडला असून, ते आंदोलनात पेड लोक घुसलेत, असा आरोप करीत आहेत. यावेळी सतीश साखळकर, राहुल पवार उपस्थित होते. 

मराठा आरक्षणाचा अध्यादेश आणल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठा क्रांतीच्या वतीने स्वागत करण्यात येईल. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ३ जुलैपासून जिल्ह्यात आरक्षणासाठी आंदोलन तीव्र केले जाईल.
- डॉ. संजय पाटील

Web Title: Sangli News Sangli district closure calls for protest against Chief Minister