सांगली फर्स्ट संमेलन २३ फेब्रुवारीपासून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

सांगली - जिल्ह्यातील उद्योग, शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी सांगलीच्या बलस्थानांचे दर्शन घडवणारे सांगली फर्स्ट संमेलन येत्या २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान होत आहे.

सांगली - जिल्ह्यातील उद्योग, शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी सांगलीच्या बलस्थानांचे दर्शन घडवणारे सांगली फर्स्ट संमेलन येत्या २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान होत आहे.

येथील वालचंद  अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या या प्रदर्शनासाठी केंद्र व राज्यातील मंत्री, बडे उद्योगसमूहाचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील अभियांत्रिकीचे विद्यार्थी, स्थानिक उद्योजकांचा संवाद घडवून आणला जाईल. असे संयोजक गोपाळराजे पटवर्धन व दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी सांगितले. या वेळी खासदार संजय पाटील उपस्थित होते.

पटवर्धन व शिंदे म्हणाले की,‘‘सांगलीसह अनेक उद्योगांतून नामवंत उत्पादनांची निर्मिती होते. देश-विदेशात ते पोहोचविले जातात. मिरज शहर मेडिकल हब आहे. जिल्ह्यात विविध तालुक्‍यांतून धान्य, फळांसह विविध शेतीमाल व शेतीपूरक उत्पादनांची निर्मिती होते. त्यांचा दर्जाही सर्वोत्तम आहे. विविध शिक्षणसंस्था, महाविद्यालयाचे विद्यार्थीही दर्जेदार संशोधन करतात. मात्र त्याचे ब्रॅंडिंग होत नाही. अशा तालुकावार उत्पादकांना चालना देण्यासाठीच हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.

उद्योजकांसोबत यशस्वी चर्चा
खासदार पाटील म्हणाले,‘‘सांगली फर्स्ट हा यापुढे निरंतपणे पक्षनिरपेक्षपणे उपक्रम चालेल. यापुढे मॅग्नेटीक महाराष्ट्र या प्रदर्शनातही सांगली फर्स्टचा स्वतंत्र स्टॉल्स असेल. असे करणारा सांगली राज्यातील पहिला जिल्हा असेल. जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना विशेष निमंत्रण दिले आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग यावेत यासाठी राहुल बजाज यांच्यासह देशातील अनेक मोठ्या उद्योजकांसोबत चर्चा झाली असून त्याचे रास्त परिणाम लवकच दिसतील.’’

सांगलीसह जिल्ह्यात अशा अनेक उद्योग-व्यवसाय व गुंतवणूकदार संस्थांसाठी  पोषक वातावरण आहे. त्यांची पाचशे-हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचीही तयारी आहे. पण त्यांना योग्य संधी, जागा मिळत नाही, त्यांना सांगलीत आणून विकासाच्या वाटा खुल्या कराव्यात, हा आमचा हेतू  आहे. यासाठीच या क्षेत्रात देशभरातील मोठमोठ्या उद्योग संस्थांनाही या प्रदर्शनासाठी निमंत्रित केले आहे. 

या प्रदर्शनात सांगलीच्या उद्योग विश्‍वाची ताकद दर्शवणारे सागंली प्राईड नावाने स्वतंत्र दालन असेल. यात देश आणि आंतराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवणाऱ्या उद्योजकांचे स्टॉल्स असतील. नव उद्योजकांना चालना देण्यासाठी देशातील नामवंत उद्योजकांची व्याख्याने, चर्चासत्र होणार आहे.’’

Web Title: Sangli News Sangli First from 23 February