सांगली पालिका निवडणूकीत आघाडी - मजबुरी की रणनीती?

सांगली पालिका निवडणूकीत आघाडी - मजबुरी की रणनीती?

गेल्या वीस वर्षांत सांगलीत प्रचंड राजकीय बदल झाले. त्यामुळे राजकारणाचा चेहरा बदलला, पण तिन्ही शहरांचे भकासपण आणि बकालपण मात्र तसेच राहिले. नुसते गल्लोगल्ली मलमपट्टी केलेले रस्ते म्हणजे विकास  म्हणता येत नाही. या तिन्ही शहरांशी निगडित बाहेरील गुंतवणूक वाढणे, येथील अर्थकारणास चालना मिळणे, नागरिकांच्या मानसिक शारीरिक स्वास्थ्यासाठी पूरक असे वातावरण तयार करणे, याबाबत आपल्या कारभाऱ्यांनी काय केले याची उत्तरे दोघा प्रदेशाध्यक्षांनी दिली पाहिजेत. हाच खरा इथला मुद्दा आहे.

त्यांनी आपल्या भाषणात देशाचे नव्हे, तर या शहराचे प्रश्‍न चर्चेत आणले पाहिजेत. विधानसभेला किंवा लोकसभेला त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर जरूर चर्चा करावी. विधानसभा आणि लोकसभेला जनमत मिळूनही दुर्दैवाने भाजपकडे असे  प्रश्‍न मांडणारा आणि त्यावर आमच्याकडे उपाय आहेत, हे सांगत आश्‍वस्त करणारा भारदस्त नेता नाही. त्यामुळे इथे जी सत्ताधाऱ्यांबाबतची नाराजी आहे ती भाजप कितपत कॅश करू शकेल, हे सांगणे सध्या तरी मुश्‍कील आहे. आपल्या पाच वर्षांतील कारभाराबद्दल काँग्रेसकडे सांगण्यासारखे काही नाही, पण या कारभाराचा भाजपला फायदा घेऊ द्यायचा नाही एवढीच रणनीती आघाडी करण्यामागे आहे काय? 

महापालिकेत पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रवादीस काँग्रेससोबत आघाडी करायला जयंतराव अगतिक का झाले आहेत?  दिवंगत नेते मदन पाटील यांच्यानंतर सत्ता मिळविण्यासाठी जी काही गणिते आणि गिमिक्‍स करावी लागतात ती हातोटी असलेले ते एकमेव नेते आहेत. प्रचंड अनुभव, दिवस-रात्र राबण्याची क्षमता आणि कारभाऱ्यांच्या करामती हे सारी काही त्यांना  अवगत आहे. तुलनेने भाजप-सेनेककडे किंवा सध्याच्या काँग्रेसकडेही असा अनुभवसंपन्न नेता नाही. सत्ता मिळविण्यासाठी नुसतीच भाषणे आणि कार्यकर्त्यांना टॉनिक देऊन चालत नाही, तर काही गिमीक्‍स वापरावी लागतात, करामती कराव्या लागतात. या खेळात जयंतराव माहीर आहेत. (तरी देखील इस्लामपुरात त्यांना सत्ता गमवावी लागली) पण  सलग तीन संस्थांच्या पराभवातून त्यांनी शहाणपण घेतले असल्याने ते काँग्रेसकडे आघाडीचा आग्रह थेटपणे करत आहेत.

एक काळ कोणापुढे न झुकणारा ताठ नेता म्हणून त्यांचा लौकिक असला तरी आता आघाडीसाठी ते कोणतीही भीड न ठेवता मनधरणी करत आहेत. कारण जिल्हा परिषदेला आमदार मोहनराव कदमांनी त्यांच्यावर जो राग काढाला त्यातून जिल्हा परिषदेची सत्ता गेली, असे जयंतरावांना वाटते. तेव्हाही जयंतरावांनी काँग्रेसपुढे स्वत:हून आघाडीसाठी टाळी दिली होती, पण काँग्रेसने ती झिडकारली. ही गोष्ट आता स्वत: जयंतराव जाहीर सभेतून सांगत आहेत. याचा अर्थ पराभवाच्या जखमा आता फार झाल्या आता दोघं एक होऊन विजयाच्या गुलालात न्हाऊ, अशी अगतिक साद ते घालत आहेत.

अर्थात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी अजून बघूया असे म्हणूनच आघाडीच्या मागणीवर मौन ठेवले आहे, मात्र याच कार्यक्रमासाठी मुद्दामहून आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीसाठी जोर लावला आहे. काँग्रेसमध्ये आता प्रत्येक नेत्याची आपली आपली अलग कहानी आहे...त्यामुळे विशाल व प्रतीक पाटील यांची समजूत काढून जयंतरावांबरोबर आघाडी करण्याची जबाबदारी आमदार विश्‍वजित कदम यांनी घेतली आहे. पृथ्वीराज पाटील यांना सोबत घेऊन इतर सर्व भार उचलत ते ही जबाबदारी पार पाडतील म्हणजेच (आघाडीमुळे किमान निम्मा खर्च आपला वाचेल असे वाटून) आघाडीचा  नारळ फोडतील, असा अंदाज आहे. भाजप येथे दोन्ही दोघांची आघाडी झाली, तर काँग्रेसमधील हुकमी एक्‍के किती पदरात पडतील एवढ्याच आशेवर सध्या तरी आहे; पण काँग्रेसच्या येथील कारभारावर रान उठविण्याची संधी त्यांनी गमावली आहे.

त्याशिवाय मेतकूट नाही
जयंतरावांनी परवाच सांगितले की, भाजपला १८ पेक्षा जास्त नगरसेवक मिळणार नाहीत, पण त्यांनी हे सांगितले नाही की, काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्यावरचे हे चित्र असेल की विभक्‍त लढल्यावरचे? भाजप एवढीच कमकुवत असेल, तर त्यांना काँग्रेसकडे आघाडीसाठी एवढी मनधरणी का करावी लागते आहे, कारण काँग्रेस सत्तारूढ असलेल्या या पालिकेत त्यांचा पक्ष विरोधक होता, असे असतानाही त्यांना काँग्रेसशी आघाडी हवी आहे. सत्य हे आहे की ‘महा’ असो किंवा काँग्रेसशी  असो आघाडीशिवाय येथे त्यांचे मेतकूट जमत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com