जिंकण्याची क्षमता या निकषातील उमेदवार शोधण्यासाठी भाजपची धावाधाव

जिंकण्याची क्षमता या निकषातील उमेदवार शोधण्यासाठी भाजपची धावाधाव

मिरज - गेले काही महिने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होणारा मिरज पॅटर्नच्या काही शिलेदारांचा तो भाजप प्रवेशाचा कार्यक्रम अखेर मुंबईत पार पडला. काँग्रेस-राष्ट्रवादीतील पंचवीस नगरसेवकांचा जथ्था भाजपमध्ये येऊ घातला आहे असा दावा आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनी केला होता. पहिल्या टप्प्यात तितके नगरसेवक नसले तरी  काही जणांची पुरवणी यादी पुढच्या टप्प्यात असू शकते. 

महापालिका जिंकण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या भाजपची सारी मदार आयारामांवरच असेल असे दिसते. आजघडीला भाजपचे म्हणवून घेणारे युवराज बावडेकर आणि स्वरदा केळकर असे दोनच सदस्य सभागृहात आहेत. कुपवाडचे ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांनी महिन्याभरापूर्वीच भाजपला रामराम केला आहे. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांत जिंकण्याची क्षमता या निकषातील उमेदवार शोधण्यासाठी भाजपची सध्या धावाधाव सुरू आहे.

भले पक्षाकडे तीनशे जणांनी उमेदवारी मागितल्याचा दावा केला जात असला तरी  त्यांना पळणाऱ्या घोड्यांचा शोध आहे. जिंकणाऱ्या घोड्यावरच पैसे लावायचा भाजपचा हा उद्योग राजकीय दृष्ट्या किती शहाणपणाचा ठरतो हे यथावकाश समजेल. गेल्या तीन- चार टर्म विधानसभेसाठी इथून आमदार विजयी होत असूनही पक्षाचा म्हणून पाया विस्तारला नाही हेच या पक्षांतरातून दिसून येत आहे.

मिरजेपाठोपाठ आता सांगलीतही असे पक्षांतर होणार असून त्यात माजी महापौर शैलजा नवलाई यांचे पती लक्ष्मण यांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय अनेकांनी भाजपची उमेदवारी मिळालीच असे गृहीत धरून प्रचारालाही सुरवात केली आहे. सांगलीत काँग्रेस- राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांवर पहिल्या टप्प्यात भाजपने लक्ष दिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील संभाव्य आघाडीनंतर या दोन्ही पक्षांतील सेंकड लाईन आपोआपच रिकामी होईल.

उमेदवारीवाटपानंतर उसळणाऱ्या नाराजीनंतर आणखी घाऊक पक्षांतर होईल असा भाजपचा होरा आहे. त्याची तयारी म्हणूनच  आमदार गाडगीळ यांनी काल शामरावनगरसह गुंठेवारी भागात भाजपला साथ द्या, असे आवाहन केले. भाजपचे वारे तयार करणे आणि अन्य पक्षातील इच्छुकांना आकर्षित करणे असे भाजपचे सध्याचे धोरण आहे. त्यामुळे पालकमंत्री, आमदार, खासदार सांगलीतील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या समारंभांना हजेरी लावत आहे. त्याचवेळी शिवसेनेने सोबत यावे यासाठी ही सारी नेतेमंडळी सतत आवाहन करीत आहेत. पुढचे महिनाभर भाजपचा हाच अजेंडा असेल असे सध्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com