सात महिन्यांच्या बाळाचा गळा दाबल्याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

तासगाव - विसापूर (ता. तासगाव) येथील अवघ्या सात महिन्यांच्या आर्यन अर्जुन चव्हाण या बालकाचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे  निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्याच्या आई-वडिलांवर संशयाची सुई रोखली गेली आहे.

तासगाव - विसापूर (ता. तासगाव) येथील अवघ्या सात महिन्यांच्या आर्यन अर्जुन चव्हाण या बालकाचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे  निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्याच्या आई-वडिलांवर संशयाची सुई रोखली गेली आहे.

पोलिसांनी आर्यनचे वडील अर्जुन चव्हाण व आई सुनीता यांना ताब्यात घेतले आहे. दोघांची दिवसभर कसून चौकशी केली; मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिस कोणत्याही निष्कर्षापर्यंत आलेले नव्हते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या धक्कादायक प्रकारामुळे विसापुरात खळबळ उडाली आहे.

विसापूर येथील जिरवळ मळा परिसरात राहणाऱ्या अर्जुन चव्हाण आणि सुनीता यांच्या आर्यन चव्हाण या अवघ्या सात महिन्यांच्या बालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २५) रात्री दहाच्या दरम्यान घडली. आर्यनचे आजोबा दिनकर रामचंद्र तांबेकर (रा. दुधोंडी) यांनी तासगाव पोलिसांना हा प्रकार कळविला. त्यानंतर पोलिसांची चक्रे फिरली. पोलिसांनी आर्यनचा मृतदेह ताब्यात घेतला. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आज शवविच्छेदनाचा अहवाल आला. या अहवालात आर्यनचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. 

विसापूर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. घरातील सर्व सदस्यांची चौकशी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या प्रकाराचा उलघडा करू. 
- उमेश दंडिले,
सहायक पोलिस निरीक्षक

तेव्हा घरात दोघेच होते...
या प्रकरणी तासगाव पोलिसांनी सोमवारी आर्यनच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही घटना घडली, त्या वेळी अर्जुन व सुनीता चव्हाण दोघे घरीच होते. अर्जुनचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात या दोघांशिवाय कोणीही नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई आर्यनच्या आई-वडिलांकडे रोखली गेली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Sangli News Seven month old baby drops death