शेरीनाल्याच्या पाणी विक्रीचा धुळगावात धंदा 

शेरीनाल्याच्या पाणी विक्रीचा धुळगावात धंदा 

सांगली - सांगलीतील- कृष्णा नदीकाठावरून उचलेले मैलायुक्त सांडपाणी विक्रीचा धक्कादाय प्रकार धुळगाव (ता. तासगाव) येथील ग्रामस्थांनीच उघडा पाडला आहे. धुळगावकरांनी आरोग्याशी समझोता करत शेतीसाठी शिवारात आणलेले दूषित पाणी पैशांसाठी नियोजित हद्दीबाहेर विकण्याचा धंदा सुरू असल्याचा हल्लाबोल ग्रामसभेत झाला. या प्रकाराला तत्काळ अटकाव करण्याचा ठराव करण्यात आला आहे. 

शेरीनाल्यांच्या साठवण तलावांशेजारील जमिनी खरेदी करून त्यात विहिरी, कूपनलिका खोदल्या गेल्या आहेत. अजूनही काही कामे सुरू आहेत. या विहिरी, कूपनलिकेतील पाणी विकण्याचा धंदा परिसरात जोमात सुरू झाला आहे. शेरीनाल्याचे पाणी विकून काही लोकांनी मोठी कमाई केली आहे. त्यामुळे योजनेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी झगडावे लागत आहे. त्याविरुद्धचा उद्रेक यानिमित्ताने समोर आला आहे. 

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयसिंह डुबल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. सभेत शेरीनाल्याच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांवर प्रतिबंध करण्याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले. सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचे शेरीनाल्याचे पाणी शेतीला देण्याचा निर्णय सन 2000 मध्ये झाला. प्रकल्प सन 2015 मध्ये सुरू झाला. आतापर्यंत केवळ 300 एकर कार्यक्षेत्रातील शेतीला पाणी मिळाले आहे. 

धुळगावच्या हद्दीत पाणी साठवण्यासाठी तलाव खोदलेल्या ठिकाणीपासून अर्धाकिलोमीटर अंतरावर पाण्याचा पाझर होतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुळ विहिरी आणि कूपनलिकांना पाणी वाढले. त्यांनी त्यावर बागायत करायला सुरुवात केली. त्यांना ग्रामस्थांची हरकत नाही. धुळगावकरांच्या आरोपानुसार या पाण्याचा फायदा उठवण्यासाठी काही बाहेरच्या मंडळींनी पैशांचा वापर करून तलावाकाठी जमिनी खरेदी केल्या. त्या ठिकाणी आतापर्यंत चार विहिरी खोदण्यात आल्या आहेत. त्यांची नोंद होऊन त्यांना विद्युत कनेशक्‍नही मिळाली आहेत. येथून आता मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी पाणी उपसा सुरु झाला आहे. परिणामी गावातील 1700 एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षाच आहे. गाव उपाशी आणी डल्ला मारणारे तुपाशी हे आम्ही सहन करणार नाही. अशी आक्रमक भूमिका लोकांनी घेतली आहे. 

ग्रामसभेला माजी उपसरंपच जाफर मुजावर, चंदूलाल मगदूम, विकास सोसायटीचे अध्यक्ष महेशकुमार डुबल, शिवाजी डुबल, पोलिस पाटील रामचंद्र गायकवाड, अजित डुबल, सागर डुबल, भास्कर डुबल, हबीब मगदूम, उदय डुबल, उदयसिंह डुबल, गुलाब येलूरकर, बशीर येलूरकर, इकबाल मुजावर, अमर जाधव यांनी आक्रमक पावित्रा घेतला. 

सुकाणू समिती नेमणार 
याबाबत 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत पाणी उचलण्याला निर्बंध घालण्याचा ठराव करण्यात आला. पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक सुकाणू समिती नेमण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष ग्रामसभा घेतली जाणार आहे. राज्य शासनाने ग्रामसभांना बळकटी आणण्यासाठी ग्रामसभेला दिलेल्या जादा अधिकार व गावच्या सामुदायिक हिताच्या दृष्टीने नवीन  नियमावली, अधिकाराबाबत ग्रामसभेत विचार झाला. याच मुद्द्यांवर गावच्या हद्दीबाहेर पाणी न देण्याचा ठराव करण्यात आला. 

शेरीनाला पाण्यासाठी गोरगरिबांच्या जमिनी गेल्या 
प्रत्यक्षात 2000 एकर शेतीचा प्रकल्प 300 एकरावर समाधान 
ग्रामसभेच्या जादा अधिकाराचा वापराचा निर्णय 
धुळगाव हद्दीसाठी पाणी वापरण्याच्या अटीवरच योजनेला मंजूरी 
मुख्य अटीचाच भंग झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप 
पाझर तलावाशेजारी पंपाना विद्युत कनेक्‍शन देऊ नयेत. 
महसूलने नव्याने विहिरी, कूपनलिकांची नोंदणी करू नये 

प्रकल्पासाठी गोरगरिबांच्या जमिनी गेल्या असताना काही लोक पाणी विकण्यांचा धंदा करीत आहेत. ही बाब सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही  
माणिक मगदूम, उपसरपंच 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com