यहाँ, इतना सन्नाटा क्‍यूँ है भाई...

शेखर जोशी
शुक्रवार, 29 जून 2018

लोकांना वाटले भाजपकडे नगरविकास खाते आहे. काँग्रेसच्या कारभाऱ्यांनी केलेल्या भानगडींची चौकशी लावून रान उठेल; पण निवडणुकीचा पूर्वरंग एकदम फिका पडला. आता थेट प्रयोगाचीच तिसरी घंटा वाजली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी गृहीत धरली तर या निवडणुकीतील प्रमुख विरोधकांची भूमिका भाजपकडेच आहे. पण त्यासाठी जे रान उठवावे लागते, त्याचा अजून मागमूस देखील दिसत नाही.

महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. जशी परीक्षा जवळ आली की वर्षभर अभ्यास न केलेले विद्यार्थी गाईड, आयत्या नोटस्‌ शोधायला लागतात तशीच काहीशी अवस्था राजकीय पक्षांची झाली आहे. अगदी नियोजनात शिस्तबद्ध असलेल्या भाजपचाही येथील होमवर्कच अजून झालेला दिसत नाही. दोन आमदार आणि खासदार असताना कोणताही जोश दिसत नाही. उलट दिवसेंदिवस भाजपमधील निष्ठावंतांच्या नाराजीचे सूरच उमटू लागले आहेत. 

गेल्या चार वर्षांत पक्षांतील मूळ कार्यकर्ते बांधावरच बसले आहेत. नीता केळकर, आष्टेकर यांनी पक्षाकडे आपले राग आळवण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे अजून नव्याचे दिवस संपलेले नाहीत. आता कुठे भांड्यांची आदळाआपट ऐकू येऊ लागली आहे. इतके दिवस खासदार म्हणून संजय पाटील सुद्धा नाराजी व्यक्‍त करत होते. पण आता पद मिळाल्याने ते क्रियाशील होतील, अशी अपेक्षा त्यांच्या नेत्यांना आहे.

शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप या मंडळींचे काय चाललंय, ते पक्ष म्हणून किती सक्रिय आहेत, याबाबतही शंका उपस्थित होत असतात. पण नुकतेच शिवाजीराव नाईकांनी मी भाजपमध्येच राहणार असे जाहीर करून टाकले आहे. सध्या पक्षापुढे प्रश्‍न आहे तो महापालिकेच्या आखाड्याचा... त्यामुळे बाकीच्यांचे काय ते निवडणुकीनंतर किंवा पावसाळी अधिवेशनानंतर बघू, अशी भाजप नेत्यांची रणनीती असावी. कारण या निवडणुकीनंतर थेट लोकसभा आणि विधानसभेचेच  मैदान आहे. त्यामुळे सांगलीच्या छोट्या बजेटच्या महापालिकेसाठी किती ताकद लावायची असे म्हणून कोणालाही दुर्लक्ष करूनही चालणार नाही. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पदाधिकाऱ्यांसह गल्लीबोळातून फिरताना दिसताहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद किती हे  मतदानातूनच कळेल. पण किमान ते लोकांपर्यंत जाऊन भेटत आहेत.

महाआघाडी का फिसकटली याची कारणमीमांसा करणारे आणि भविष्यात सांगली चांगली करू, अशी पुन्हा साद घालत नवे पत्र जारी केले आहे. या तुलनेत काँग्रेसमधूनही नेते मंडळी जोरदारपणे उतरली आहेत असे दिसत नाही. फक्‍त शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेस नेत्या सौ. जयश्रीताई पाटील याच निवडक कार्यकर्त्यांसह लोकांना थेट भेटत असतानाचे चित्र आहे. युवा नेते नवनिर्वाचित आमदार विश्‍वजित कदम यांचीही अजून एंट्री झालेली नाही. भाजपचे दोन्ही आमदार अजूनही थेट नागरिकांच्या संपर्क अभियानासाठी बाहेर पडल्याचे दिसत नाही. खासदारसुद्धा शहरापेक्षा जिल्ह्यातील अन्य भागांतच सत्कार वगैरे स्वीकारत फिरताना दिसतात.

माजी खासदार तर कोठेच दिसत नाहीत. पण सांगली महापालिकेचा आखाड्यात जे सर्वांत मोठे स्पर्धक मानले जातात त्या भाजपच्या गोटात अजूनही ‘‘यहाँ इतना सन्नाटा क्‍यूँ है भाई...’’ अशीच अवस्था आहे. नाही म्हणायला सुरेश खाडे यांनी मुंबईत एक धमाका करून काँग्रेसमधील एक मोठी पलटनच भाजपमध्ये दाखल केली. पण सांगली-मिरजेतील  भाजपची सर्व कार्यालये थंडच आहेत. खाडेंची निवडणुकीची तयारी मिरजेपुरती दिसते. त्यांनी मिरजेतून १२ ते १५ प्रभागात कमळ फुलेल असा दावा केला आहे. मात्र गाडगीळांनी सांगलीत विकासकामांची  उद्‌घाटने थाटात केली तरी निवडणुकीची हलगी काही तापवलेली नाही.

मध्यंतरी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीची धुरा गाडगीळांकडे दिल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे खासदारांचा गट नाराज होता. या सर्वांवर खुलासा म्हणून पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी खासदारांसहित महापालिकेतील दोन्ही आमदरांवर निवडणुकीची जबाबदारी असेल, असा खुलासा केला होता. अर्थात तरीही महापालिका निवडणुकीसाठी संजयकाका अजून उतरलेले नाहीत. आता पावसाळी अधिवेशन असल्याने गाडगीळ व खाडे मुंबईकडे अधिक असतील. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी भाजपमध्ये सामसूमच आहे.

भाजपची मध्यंतरी येथे कार्यकारिणीची बैठक होणार होती. संपूर्ण मंत्रिमंडळासह बडे नेते यासाठी येणार होते पण हा कार्यक्रम देखील रद्द करावा लागल्याने निवडणूक पूर्व भाजपला येथे काहीच वातावरण तापविता आले  नाही. लोकांना वाटले होते भाजपकडे नगरविकास खाते आहे. काँग्रेसच्या कारभाऱ्यांनी केलेल्या भानगडींची चौकशी लावून रान उठवेल, पण ही अपेक्षा फोल ठरली आहे. आता या निवडणुकीत भाजप कोणते मुद्दे  मांडणार? काँग्रेस भ्रष्ट असेल तर चार वर्षांत चौकशी का लावली नाही याचे उत्तर काय देणार, असे प्रश्‍न भाजपची निवडणुकीत डोकेदुखी वाढवू शकतात. शिवाय दोन आमदार असताना भाजपने महापालिकाक्षेत्रात मोठा  विकास का केला नाही, या प्रश्‍नांची ढोलकी दोन्हीकडून वाजणार आहे. 

नाराजी भाजप कॅश करणार का?
आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पावसाळी अधिवेशनात नेते अडकणार आहेत. त्यानंतर प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत भाजपचे स्टार प्रचारक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, विनोद तावडे येथे येऊन फलंदाजी करतीलही. त्याला प्रत्युत्तरासाठी पृथ्वीराजबाबा, अजितदादा हे नेतेही उतरतील. पण भाजपचे स्थानिक नेते पक्षाला खेळपट्टी अनकूल करावी 
लागते ती करू शकलेले नाहीत. सत्ताधाऱ्यांबद्दलची नाराजी भाजप कॅश करू शकलाय असे अजून तरी चित्र नाही.

Web Title: Sangli News Shekhar Joshi Specal article on Corporation election