मला खासदार राजू शेटींना सल्ला विचारण्याची गरज काय ? - नाईक

शिवाजीराव चौगुले
रविवार, 24 जून 2018

शिराळा - मी भाजपचाच असून मी याच पक्षात समाधानी आहे. हा बलाढ्य पक्ष सोडून दुसरीकडे जाण्यासाठी मला खासदार राजू शेटींना सल्ला विचारण्याची गरज काय ?.उलट त्यांनीच २०१४ ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारीची दिलेली ऑफर मी नाकारली होती. त्यामुळे भाजप सोडून मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याची माहिती आमदार शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिराळा - मी भाजपचाच असून मी याच पक्षात समाधानी आहे. हा बलाढ्य पक्ष सोडून दुसरीकडे जाण्यासाठी मला खासदार राजू शेटींना सल्ला विचारण्याची गरज काय ?.उलट त्यांनीच २०१४ ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारीची दिलेली ऑफर मी नाकारली होती. त्यामुळे भाजप सोडून मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याची माहिती आमदार शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नाईक म्हणाले, मी कोणाच्या सांगण्यावरून पक्ष बदलत नाही. कार्यकर्त्यांच्या विचाराने आम्ही निर्णय घेत असतो. २०१४ ला कायम अपक्ष लढणे सोयीचे नसल्याने आम्ही कार्यकर्त्यांनी मिळून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनीही आमच्या विनंतीला मान देऊन तिकीट दिले. त्यावेळी पक्षाबाबत लोकांचे असणारे मत, आम्ही केलेली विकास कामे व लोक संपर्कावर आम्ही विजयी झालो. त्यावेळी भाजपमध्ये  जाण्याचा सल्ला शेटींनी दिला नव्हता. उलट त्यांनी शिराळ्यातून स्वाभिमानीची ऑफर दिली होती. तरीही त्या निवडणुकीत त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन आमचे काम ही केले. 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, उत्तम पाटील, भारत निकम उपस्थित होते.

पदा पेक्षा निधी जास्त महत्वाचा
काँग्रेस व राष्ट्रवादीचा पूर्वीचा अनुभव आम्हाला आहे. त्यामुळे त्यांचा विचार ही आमच्या मनात येत नाही. मंत्रीपद नसल्याने मी नाराज असल्याची व पक्ष बदलाची अफवा पसरवून लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. पण पक्षाने मंत्रीपदापेक्षा शिराळ्याला विकास निधी जास्त दिला आहे. त्यामुळे मी पक्ष बदलाचा व नाराजीचा संबंध नसून मला पदा पेक्षा मिळालेला निधी जास्त महत्वाचा असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्याला उमेदवारी दिली तरी काम करू
आम्ही मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी करत आहोत. पक्षाला बाधा येईल असे कोणतेही कृत्य केलेले नाही. लोकसभा व विधानसभेला पक्षाचेच काम करू. २०१९ ला दुसऱ्याला उमेदवारी दिली तरी ही पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करू. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या मतदार संघाच्या विकासाला चालना देण्यासाठी भरीव निधी दिला असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

पक्ष बांधणीत आम्हीच आघाडीवर
पक्षाची सभासद नोंदणी व पक्ष बांधणीत आम्हीच जिल्ह्यात आघाडीवर आहे.त्यामुळे पक्ष बदलाचा विचार आमच्या मनात कसा येईल?
रणधीर नाईक,
माजी जिल्हा परिषद सदस्य

Web Title: Sangli News Shivajirao Naik press