पेट्रोलचा दर तपासण्यासाठी "एसएमएस' सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

सांगली - सोन्याप्रमाणे आता पेट्रोल व डिझेलचे दर रोजच्या रोज बदलू लागले आहेत. पंपावर आकारले जाणारे पेट्रोल व डिझेलचे दर फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आकारला जाणारा दर अधिकृत आहे की नाही हे ओळखण्याची "एसएमएस' सुविधाही ग्राहकांना दिली आहे. 

सांगली - सोन्याप्रमाणे आता पेट्रोल व डिझेलचे दर रोजच्या रोज बदलू लागले आहेत. पंपावर आकारले जाणारे पेट्रोल व डिझेलचे दर फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आकारला जाणारा दर अधिकृत आहे की नाही हे ओळखण्याची "एसएमएस' सुविधाही ग्राहकांना दिली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती दररोज बदलत असतात. त्यानुसार देशभरात पेट्रोल व डिझेलचे दर ठरवले जातात. आतापर्यंत कच्च्या तेलाचे दर दररोज बदलत असले तरी पेट्रोलच्या किमती मात्र दररोज बदलत नव्हत्या. ठराविक दिवसांनंतर दरवाढ किंवा कपात जाहीर केली जात होती; परंतु आता पेट्रोल व डिझेलचे दर रोजच्या रोज बदलण्याची "डायनॅमिक प्राईसिंग' पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 16 जूनपासून या दराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

रोज मध्यरात्री 12 वाजता दर जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहापासून दराची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले; परंतु मध्यरात्री दर जाहीर करण्याच्या पद्धतीला डीलर्स असोसिएशनने विरोध केला. त्यामुळे सध्या रात्री आठ वाजता प्रत्येक पंपमालकास उद्या कोणता दर असेल त्याचा "एसएमएस' येतो. त्याप्रमाणे सध्या अंमलबजावणी सुरू आहे. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल, आयबीपी, टाटा, रिलायन्स या कंपन्यांचे पेट्रोल आपल्याकडे विकले जाते. प्रत्येक कंपनीच्या पेट्रोल व डिझेल दरात किरकोळ पैशाची किंवा रुपयाची तफावत असते. 

सोन्याच्या दराप्रमाणे रोजच्या रोज दर बदलत असल्यामुळे पंपमालकांना मशीमध्ये बदल करावे लागतात. जे पंप ऑनलाईन आहेत त्यांच्या मशीमधील बदल वरूनच होतात. त्यांना फेरफार करावे लागत नाहीत. रोजचा दर ग्राहकांना माहीत व्हावा यासाठी प्रत्येक पंपमालकांना पंपावर दर्शनी भागात डीलरचे नाव, डीलर कोड, पेट्रोल, डिझेलचा आजचा दर प्रसिद्ध करावा लागेल. ग्राहकांना दराची खात्री करायची असेल तर ती देखील सुविधा दिली आहे. मोबाईलवर "आरएसपी' ही अक्षरे टाईप करून स्पेस द्यावा. त्यानंतर डीलरचा कोड नंबर टाईप करून दिलेल्या मोबाईल क्रमांकावर "एसएमएस' पाठवावा. काही सेकंदांतच तुम्ही ज्या पंपावर थांबला आहात, त्या पंपाचा आजचा पेट्रोल व डिझेल दराचा "एसएमएस' तुमच्या मोबाईलवर येईल. 

मोबाईल ऍप, वेबसाईटही- 
"एसएमएस' सुविधेबरोबरच पंपावरील दर किती आहे हे समजण्यासाठी स्मार्ट ड्राईव्ह या मोबाईल ऍपचा वापर करून कोणत्याही पंपावरील दर पाहू शकता. तसेच प्रत्येक पेट्रोल कंपनीच्या वेबसाईटवरदेखील "लिंक' मिळू शकते. ही सर्व माहिती पंपावर ठळक प्रसिद्ध करणे आवश्‍यक आहे. अन्यथा ग्राहक तक्रार करू शकतात.

Web Title: sangli news SMS petrol rates petrol pump