सांगलीच्या पोलिस अधीक्षकपदी सुहेल शर्मा, उपाधीक्षकपदी वीरकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

सांगली -  पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि शहर उपाधीक्षक दिपाली काळे यांची अखेर बदली झाली आहे. कोल्हापूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक असतील. शिंदे यांची नागपूरला तर श्रीमती काळे यांची सोलापूर शहरला बदली झाली आहे.

सांगली -  पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि शहर उपाधीक्षक दिपाली काळे यांची अखेर बदली झाली आहे. कोल्हापूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा सांगलीचे नवे पोलिस अधीक्षक असतील. शिंदे यांची नागपूरला तर श्रीमती काळे यांची सोलापूर शहरला बदली झाली आहे.

सांगली शहर पोलिसांकडून ठाण्यात थर्ड डिग्रीनंतर झालेला अनिकेत कोथळे याचा मृत्यू आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केलेला गंभीर गुन्हा यामुळे समाज तीव्र भावना उमटल्या होत्या. येत्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर बदल्यांचे निर्णय तातडीने अंमलात आले. 

कोथळे याचा कोठडीतील मृत्यू आणि तो पचवण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक युवराज कामटे याने सहकारी पोलिसांसोबत केलेल्या खटाटोपामुळे पोलिसांच्या अब्रुचे पुरते धिंडवडे निघाले आहेत. तरीही जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आबाधीत असल्याचा हवाला कालच अधीक्षक शिंदे यांनी दिला होता. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी दोन दिवसापुर्वी शहरातील लोकप्रतिनिधींसमवेत कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता.

या बैठकीला अधीक्षक शिंदे उपस्थित नव्हते. मात्र या बैठकीत नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरिक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनीही गृहविभागाला सादर केलेल्या अहवालात शिंदे यांच्यावर ठपका ठेवला होता. येत्या शनिवारीच सर्वपक्षीय कृती समितीने कोथळे हत्या प्रकरणी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर गृह विभागाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच बदलीचे आदेश दिले आहेत. 

गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी आज बदलीचे आदेश पत्रे काढली आहेत. त्यात शिंदे यांची नागपूरला बदली झाली आहे. ही पोलिस दलातील साईड पोस्टींग मानली जाते. त्यांच्या जागी सांगलीचे पोलिस अधीक्षक म्हणून कोल्हापूर येथील अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची नियुक्ती झाली आहे. तर श्रीमती काळे यांची बदली सोलापूरला सहाय्यक आयुक्तपदी बदली झाली आहे. शहर पोलिस उपाधीक्षकपदी आता नांदेड येथील देगलूर उपविभागाचे उपाधीक्षक अशोक वीरकर रूजू होतील. 

Web Title: Sangli News Sohel Sharma as Superintendent of Police