फौजींनी उलगडली संघर्ष अन्‌ सन्मानाची गाथा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

सांगली - सैनिकांना कोणतीही जात व धर्म नसतो, केवळ भारत देश हाच एक धर्म इतकंच माहिती असतं. मग त्या तिरंग्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर. देशसेवेत असतानाही आणि निवृत्तीनंतरही मिळणारा सन्मान ही सैनिकांची संपत्ती असते. तेव्हा करिअरकडे पाहताना तिन्ही दलांतील संधीचा जरूर अभ्यास करावा आणि वेगळ्या वाटांची आव्हाने स्वीकारण्याची तयारी दाखवावी, असा सूर विलिंग्डन महाविद्यालयात आयोजित ‘मुक्तछंद’मध्ये उमटला. 

सांगली - सैनिकांना कोणतीही जात व धर्म नसतो, केवळ भारत देश हाच एक धर्म इतकंच माहिती असतं. मग त्या तिरंग्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर. देशसेवेत असतानाही आणि निवृत्तीनंतरही मिळणारा सन्मान ही सैनिकांची संपत्ती असते. तेव्हा करिअरकडे पाहताना तिन्ही दलांतील संधीचा जरूर अभ्यास करावा आणि वेगळ्या वाटांची आव्हाने स्वीकारण्याची तयारी दाखवावी, असा सूर विलिंग्डन महाविद्यालयात आयोजित ‘मुक्तछंद’मध्ये उमटला. 

कर्नल कल्याणी (भूदल), लेफ्टनंट गिरीश मंद्रुपकर (नौसेना) आणि ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवाडकर (हवाई दल) यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. त्यांना आलेले थरारक अनुभव, काही सुखद गोष्टी शेअर करीत, युवकांना देशसेवेतील विविध संधींचा मंत्र दिला. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर आणि ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. अगदी त्यांच्या शालेय जीवनापासून ते निवृत्तीपर्यंत आणि आताच्या ‘सेकंड इनिंग’पर्यंचा सारा प्रवास विद्यार्थ्यांसमोर सोप्या भाषेत उलगडला.

कर्नल कल्याणी म्हणाले की, शालेय शिक्षणापासूनच मी सैनिक प्रशिक्षण, त्यानंतर सैन्यात भरती झालो. तसं म्हटलं तर इतरांप्रमाणे मी महाविद्यालयीन जीवन एन्जॉय केलं नाही. पण लहानपणापासून देशसेवा डोळ्यांसमोर ठेवली. भरती झाल्यानंतर खडतर प्रशिक्षण झाले. त्यानंतर अनेक थरारक अनुभव माझ्यासमोर आहेत. बंदुका घेऊन लढणारे आम्ही सैनिक. १९७८ मध्ये आसामच्या दंगलीवेळी कारवाईच्या मोहिमेत मी होतो.

१९८४ मध्ये गाजलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या कारवाईत मी सहभागी होतो. सुवर्णमंदिरात घुसून अतिरेक्‍यांवर कारवाई केली होती. या सर्व कारवाईचे दीर्घकाळ परिणाम पुढील काळात झाले. पण, पंजाबला देशापासून तोडणाऱ्यांचे मनसुबे लष्कराने पूर्ण होऊ दिले नाहीत. त्यानंतर श्रीलंकेतील ‘एलटीटीई’च्या विरोधातील कारवाईतही जंगलात तळ ठोकून कारवाई केली होती. 

ग्रुप कॅप्टन वालवाडकर म्हणाले, की वडील स्वातंत्र्यसैनिक. त्यामुळे लहानपणापासून देशसेवेचे बाळकडू घरातून मिळाले होते. पदवीनंतर अगदी विसाव्या वर्षी वायुसेनेच भरती झालो. त्यानंतर तातडीने सियाचिन येथे झालेल्या शांतीसेना कारवाईसाठी मला पाठविण्यात आले. त्यानंतर अनुभव वाढत गेला. अनेक कारवाईत माझा सहभाग राहिला. कारगिलमध्येही मी सहभागी होतो. या देशसेवेमुळे माझे जीवन अर्थपूर्ण झाले. निवृत्तीनंतरही देशसेवेसाठी कोणत्याही मेट्रोसिटीत न जाता सांगली जिल्हा निवडला. येथील अधिकाधिक तरुण वायुसेनेत भरती होण्यासाठी काम करीत आहे.

लेफ्टनंट मंद्रुपकर म्हणाले, की आई शिक्षिका असल्याने घरात लहानपणापासून शिस्तीचे वातावरण होते. त्यानंतर अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर खासगी कंपनी नोकरी केली. नोकरी करीत असताना केवळ प्रवासातच आपला वेळ खर्ची होतो, हे लक्षात आले. त्यानंतर नौसेना भरतीची जाहिरात आली. अर्ज केला आणि भरती झालो. प्रशिक्षण सुरू असताना समरीनवर काम करायची इच्छा होती. त्यानंतर काहीच दिवसांत ही संधी मिळाली. १५०० कोटी समरीन घेऊन मी पाण्यात उतरलो. आणि यशस्वीपणे बाहेरही आलो. त्यानंतर अनेक भन्नाट अनुभव माझ्या जीवनात आले.

आजच्या तरुणाईने खरी देशसेवा करण्यासाठी सैन्यदलातच गेले पाहिजे. 
प्राचार्य डॉ. ताम्हणकर यांनी महाविद्यालयाने सुरू केलेल्या ‘मुक्‍तछंद’ या उपक्रमाबद्दल माहिती दिली. या वेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पंडित यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजकुमार पाटील, उपप्राचार्य जे. बी. देशपांडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी शहिदांना मानवंदना देण्यात आली, तसेच सीमेवर लढणाऱ्यांना शुभेच्छापत्रे देण्याचा उपक्रमही राबविण्यात आला.
 

युद्धे परवडणारी नाहीत...
सध्या युद्धाचे ढोल पुन्हा वाजू लागले आहेत. या प्रश्‍नावर वालवाडकर म्हणाले की, युद्धाची संकल्पना पहिल्यापेक्षा बदलली आहे. दोन महायुद्धांनी जगाचे मोठे नुकसान झाले. यास कारणीभूत असलेल्या हिटलरसारख्या नेत्यांना लोक राक्षस म्हणूनच संबोधतात. तेव्हा दक्षिण कोरियाच्या किम जोनला नक्‍कीस राक्षस म्हणवून घ्यायला आवडणार नाही. कल्याणी म्हणाले की, प्रत्येक बड्या देशाकडे अणुबॉम्ब आहेत. प्रत्येकाला नुकसानीची भीती आहे. त्यामुळे युद्ध खूप लांबची दुर्मीळ गोष्ट आहे. मंद्रुपकर म्हणाले की, आपण इतर देशांपेक्षा सक्षम झाले पाहिजे. असे झाले तर आपल्याकडे वाकड्या नजरेने कोणीच पाहणार नाही.

..अन्‌ मुलगीही झाली मेजर
कर्नल कल्याणी यांनी केलेल्या देशसेवेचा इतिहास कानी पडत असतानाच त्यांनी हळूवार सांगितले की, माझी मुलगीही आता मेजर झाली आहे. हे ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुलगी आहे म्हणून तिला मागे न ठेवता, तिलाही देशसेवेसाठी पाठवून आपली देशभक्‍ती निवृत्तीनंतरही त्यांनी सुरू ठेवली आहे.

यापूर्वीही सर्जिकल स्ट्राईक
कर्नल कल्याणी म्हणाले, ‘‘सर्जिकल स्ट्राईकचा मोठा गाजावाजा झाला. तो आजच्या व्यापक झालेल्या माध्यमांमुळे. पण अशा पद्धतीची कारवाई यापूर्वीपासून सुरू आहे. सीमेवर रोज कोठे ना कोठे गोळीबार होत असतो. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वाद थांबविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.’’

Web Title: sangli news soldier storys