सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.४१ टक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

यंदाही मुलींचीच कडी - बोनस गुणांमुळे छप्पर फाड के गुण; १४४ शाळा शंभर नंबरी 

यंदाही मुलींचीच कडी - बोनस गुणांमुळे छप्पर फाड के गुण; १४४ शाळा शंभर नंबरी 

सांगली - ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’,  शाळेच्या कक्षेतील २० गुण आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडू कोट्यातून मिळणारे ५ टक्के जादा गुण यामुळे यंदाही दहावीतील परीक्षार्थींना ‘छप्पर फाडके’ गुण मिळाले आहेत. जिल्ह्याचा यंदा निकाल ९२.४१ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो अर्धा टक्‍क्‍यांनी घटला आहे. परीक्षेस बसलेल्यापैकी ९४.८६ टक्के मुली, तर ९०.५५ टक्के मुले उत्तीर्ण झाली. येथेही मुलींनी  मुलांवर कडी केली आहे. १४४ शाळांचा निकाल शंभर टक्के असून गतवर्षी ही संख्या १३८ होती. २४ जूनला शाळांमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत.

निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी दुपारी एक वाजल्यानंतर नेट कॅफेवर झुंबड होती. मोबाईलवरही मुले सर्रास निकाल डाऊनलोड करीत होती.

जिल्ह्यातील ४३ हजार ५४ परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४२ हजार ९१० जणांनी परीक्षा दिली. त्यातले ३९ हजार ६५३ उत्तीर्ण झाले. विशेष प्रावीण्य श्रेणीत १० हजार ९९, प्रथम श्रेणीत १४ हजार ४०८, द्वितीय वर्गात १२ हजार ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास श्रेणीत ३ हजार ७८ मुलांचा समावेश आहे. बेस्ट ऑफ फाईव्हमुळे टक्केवारीत वाढली आहे. आता अकरावी प्रवेशासाठी रस्सीखेच सुरू होईल. रिपिटर विद्यार्थ्यांचा निकाल ३२.५१ टक्के एवढा आहे. शंभर टक्के निकालाच्या १४४ शाळा आहेत.

तालुकानिहाय शाळांची संख्या अशी - आटपाडी - १२, जत - १०, कडेगाव - १३, कवठेमहांकाळ - ९, खानापूर - १६, मिरज - १२, पलूस - ९, सांगली शहर - २२, शिराळा - १६, तासगाव - ६ आणि वाळवा - १९ अशी संख्या आहे.

निकालात कडेगाव अव्वल
दहावीच्या तालुकानिहाय निकालात कडेगाव तालुका अव्वल ठरला आहे. तालुकानिहाय निकाल (टक्के) असा : आटपाडी ९४.२८, जत ८९.१६, कडेगाव ९६.४७, कवठेमहांकाळ ९४.९६, खानापूर ९४.५६, मिरज ९१.१३, पलूस ९४.२६, सांगली शहर ९०.३७, शिराळा ९५.२७, तासगाव ९०.५३, वाळवा ९३.७१.

गुणवंताचा विज्ञानकडे कल
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बहुतांश ८० टक्केवरील विद्यार्थ्यांनी शास्त्र शाखेत प्रवेश घेणार असल्याचे स्पष्ट झाले. मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर चार दिवसांनी उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशासाठी गर्दी होईल. त्यातही सांगली, मिरज शहरांतील नामवंत शाळांतच गर्दी होते. 

ऑनलाईनबाबत चालढकल
आधुनिक संगणकाच्या युगात सर्व प्रक्रिया ऑनलाईन राबवली जात आहे. सांगली जिल्ह्यातील ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवावी, अशी पालक, विद्यार्थी संघटनांची मागणी आहे. प्रत्येक महाविद्यालयात जाऊन अर्ज भरावा लागतो. प्रवास, वेळ, माहितीपत्रकांसाठी आर्थिक बोजा पालकांना सोसावा लागतो. मात्र शिक्षण विभागाने याबाबत प्रत्येक वेळी चालढकलची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते.

दहावीचा निकालात जिल्ह्याने परंपरा राखली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. सर्वांना सुरळीत प्रवेश  मिळतील अशी व्यवस्था केली जाईल.
- महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सांगली

Web Title: sangli news ssc result 92.41% in sangli district