"एसटी' ही आता "वायफाय'मय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

सांगली -  राज्य परिवहन महामंडळाने खासगी प्रवासी वाहतुकीचे आव्हान परतवून लावण्यासाठी आश्‍वासक पावले टाकली आहेत. शिवशाही गाड्या सुरू केल्यानंतर आता एसटीमध्ये वायफाय सुविधा सुरू केली आहे. ग्रामीणसह, लांब पल्ल्याच्या गाड्यांत ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि मनोरंजक होणार आहे; मात्र फेसबुक, व्हॉट्‌स ऍप, ट्विटर या सोशल मिडियाला लांब ठेवले आहे. या सुविधेत इंटरनेटचा लाभ घेता येणार नाही. 

सांगली -  राज्य परिवहन महामंडळाने खासगी प्रवासी वाहतुकीचे आव्हान परतवून लावण्यासाठी आश्‍वासक पावले टाकली आहेत. शिवशाही गाड्या सुरू केल्यानंतर आता एसटीमध्ये वायफाय सुविधा सुरू केली आहे. ग्रामीणसह, लांब पल्ल्याच्या गाड्यांत ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि मनोरंजक होणार आहे; मात्र फेसबुक, व्हॉट्‌स ऍप, ट्विटर या सोशल मिडियाला लांब ठेवले आहे. या सुविधेत इंटरनेटचा लाभ घेता येणार नाही. 

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी वायफाय सुविधा सुरू केली. जिल्ह्यातील विविध आगारांच्या बसमध्येही सुविधा सुरू केली आहे. महामंडळाने एका खासगी कंपनीशी सुविधांसाठी करार केला आहे. शिवनेरी, एशियाड, परिवर्तन या गाड्यांत वायफायचे हॉट स्पॉट मशीन बसवले आहे, मात्र ही केवळ प्रवाशांच्या मनोरंजनाची सुविधा आहे. त्यांना खासगी वाहतुकीकडून बसकडे ओढा वाढवण्यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरू केला आहे. 

गाणी, चित्रपट, मालिका 
प्रवाशांना प्रवासात कंटाळवाणे वाटू नये यासाठी ही सुविधा आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी त्यांच्या वातानुकूलित गाड्यांत एलईडी बसवून चित्रपट, गाणी पाहण्यास, ऐकण्याची सुविधा दिली जाते, मात्र एसटी गाड्यांत प्रवाशांना मोबाईलवर चित्रपट पाहता येणार आहे. तीन मराठी, तीन हिंदी चित्रपट त्यावर पाहता येतात. लोकप्रिय मालीकांचे भाग पाहण्यास मिळतात. केवळ प्रवाशांचे मनोरंजन करणे, हाच या सुविधेमागचा हेतू आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण, लांब पल्ल्याच्या गाड्यांत ही सुविधा सुरू केली आहे. चालकाच्या मागील बाजूस वायफायचे हॉट स्पॉट मशीन बसवले आहे, तर गाडीत वायफाय सुविधा कशी वापरायची, याची माहिती असलेले स्टिकर्स लावलेत. त्यानुसार मोबाईलवर ही सुविधा चालू करता येते. 

राज्य परिवहन महामंडळाने गतवर्षी डिसेंबर महिन्यात एसटीमध्ये वायफाय सुविधा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुण्यात काही गाड्यांत ही सुविधा सुरू करून चाचणी घेतली. प्रवाशांसाठी ही सुविधा मनोरंजनाची ठरत असल्याने राज्यभरात ती वापरण्याचा निर्णय झाला. सुरवातीस मुंबई-पुणे वातानुकूलित शिवशाही गाड्यांत ही सुविधा सुरू केली. त्यानंतर एशियाड, सेमी लक्‍झरी गाड्यांत सुरू केली. आता परिवर्तन बसमध्येही ही सुविधा सुरू केली आहे. जिल्ह्यात प्रत्येक आगाराच्या गाड्यांत वायफाय सुविधा सुरू आहे. 

प्रवासी वाढवण्याचा प्रयत्न 
प्रत्येक एसटी आगाराला खासगी ट्रॅव्हल्सचा वेढा पडलेला दिसतो. वातानुकूलित गाड्या, एलईडीवर चित्रपट पाहण्याची संधी यामुळे खासगी ट्रॅव्हल्सला प्रवाशांची पसंती होती. त्याचा एसटीच्या प्रवाशांवर परिणाम झाला. आता वायफाय सुविधेमुळे प्रवासी पुन्हा एसटीकडे आकर्षित होतील, असा अंदाज आहे.

Web Title: sangli news st bus wi-fi