कृष्णाकाठानं दिले धुरंदर ‘प्रदेश सारथी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

सांगली - कृष्णाकाठच्या सांगलीनं राज्याला नेहमीच धुरंदर सारथी दिले. राज्याचे संघटनात्मक नेतृत्व करण्याची संधी वसंतदादांपासून ते आर. आर. पाटील यांच्यापर्यंत मातब्बरांनी समर्थपणे पेलवली. आता जयंत पाटील यांना संधी मिळालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला इथल्या नेतृत्वाने उभारी दिली आहे.  

सांगली - कृष्णाकाठच्या सांगलीनं राज्याला नेहमीच धुरंदर सारथी दिले. राज्याचे संघटनात्मक नेतृत्व करण्याची संधी वसंतदादांपासून ते आर. आर. पाटील यांच्यापर्यंत मातब्बरांनी समर्थपणे पेलवली. आता जयंत पाटील यांना संधी मिळालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला इथल्या नेतृत्वाने उभारी दिली आहे.  

‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षपदी जयंतरावांची निवड झाली. त्यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पश्‍चात जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात छाप उमटवली. त्या जोरावर ते विधानसभेचे गटनेते व आता प्रदेशाध्यक्ष झाले. ‘राष्ट्रवादी’कडे मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेल्या नेत्यांत त्यांचे नाव खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवारही घेतात. लोकसभा, विधानसभेच्या तोंडावर त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आलीय. 

आबांना दोनदा संधी   
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. २००४ च्या झंझावाती प्रचाराने राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. आबा उपमुख्यमंत्री आणि ‘राष्ट्रवादी’चा राज्याचा चेहरा झाले. २००८ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटानंतर आबांनी गृहमंत्रिपद सोडले, ते पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाले. ते पदही त्यांनी प्रभावीपणे सांभाळले.

वसंतदादा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण केला. ते चार वेळा मुख्यमंत्री झाले. सहकारमहर्षी गुलाबराव पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. दादा मुख्यमंत्री आणि गुलाबराव प्रदेशाध्यक्ष अशी सत्ताकेंद्रे त्या वेळी सांगलीत एकवटली होती. विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुखही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले. लोकनेते राजारामबापूंनी दीर्घकाळ जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले. त्यांनी काँग्रेसच्या झंझावातातही जनता पक्षाची छाप पाडली. माजी आमदार संभाजी पवार जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षातही ते प्रदेशाध्यक्ष होता होता राहिले. 

जनता दलात पवारांनंतर माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना संधी मिळाली. ते पदावर कायम आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष आहेत. ते मूळचे कवठेमहांकाळ तालुक्‍यातील ढालेवाडीचे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांनी दीर्घकाळ काम केले. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील हे स्वतःच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जयंत पाटील या साऱ्यांत प्रभावी ठरतात का, याकडे आता लक्ष असेल. 

Web Title: Sangli News State President form Sangli