शांतिनिकेतनमध्ये होणार दगडांचे संग्रहालय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

दगडांमधून साकारलेली शिल्पे आणि इतर कलाकृतीही नेहमीच आकर्षणाचा बिंदू राहिल्या आहेत. असे विविध प्रकारचे दगड जमवून जर दगडांचेच संग्रहालय झाले तर... कल्पना विचित्र वाटली तरी कुतूहल वाढवणारी आहे. असाच दगडांचे संग्रहालय करण्याची संकल्पना शांतिनिकेतनमध्ये साकारत आहे. 

सांगली - निसर्गाच्या रमणीय अद्‌भूत सौंदर्यात दगडांचेही एक वेगळे स्थान आहे. विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे दगड आपल्याला दिसतात. त्यामुळे त्या दगडांबद्दलही कुतूहल वाढते. शिवाय दगडांमधून साकारलेली शिल्पे आणि इतर कलाकृतीही नेहमीच आकर्षणाचा बिंदू राहिल्या आहेत. असे विविध प्रकारचे दगड जमवून जर दगडांचेच संग्रहालय झाले तर... कल्पना विचित्र वाटली तरी कुतूहल वाढवणारी आहे. असाच दगडांचे संग्रहालय करण्याची संकल्पना शांतिनिकेतनमध्ये साकारत आहे. 

बऱ्याच वेळा आपण निसर्गाचा आनंद घेत जेव्हा समुद्र किनारी, जंगलात, निसर्गरम्यस्थळी अगदी वाळवंटात फिरत असतो त्यावेळी विविध प्रकारातील रंग आणि आगळीवेगळी वैशिष्ट्य असलेले दगड सहजरीत्या आढळतात. पाण्याच्या प्रवाहांमुळेही दगडांचे वेगवेगळे गोटे दिसतात. जगभरात विविध प्रकारच्या दगडांमधून साकारलेल्या वास्तू, मंदिरे, प्रार्थनास्थळे, ऐतिहासिक किल्ले त्यातील दगडामध्ये बनवलेल्या आकर्षक कलाविष्कारामुळे प्रेक्षणीय ठरल्या आहेत. शिवाय अवकाशातून पृथ्वीवर दगड पडण्याच्याही घटना घडल्या आहेत, अजूनही घडतात.

आपल्या दृष्टीने तो एक वेगळा "दगड' असला तरी त्यांच्यामागेही काही वैशिष्ट्ये असतात. असे हे दगडांचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न संग्रहालयाच्या माध्यमातून होणार आहे. 
सांगलीच्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाने यासाठी स्पर्धा घेतली आहे. ती सर्व वयोगटांसाठी खुली आहे. विविध जातीचे, रंगांचे दगड शोधायचे, त्यांची माहिती जमवायची आणि दगड एका पिशवीत घालून, त्यावर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लिहून तो या ग्रंथालयाकडे एक जूनपर्यंत पाठवावेत. 

दगडांची शास्त्रीय माहिती देणार 
जमा झालेल्या रंगबिरंगी दगडांतून एक आकर्षक संग्रहालय शांतिनिकेतनच्या निसर्गरम्य परिसरात साकारणार आहे. यामध्ये गोळा झालेल्या दगडांची शास्त्रीय माहिती तज्ज्ञांमार्फत घेऊन संग्रहालयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे दगड केवळ "धोंडा' नसून तो निसर्गाचा कसा अविभाज्य घटक आहे ते या संग्रहालयातून समोर येणार आहे.

Web Title: Sangli News Stone collection in Shantiniketan