प्रत्येक शाळेला ‘डिजिटल’ साठी निधी - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

सांगली - जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवून शिक्षकांनी चिंतन करावे. दानशूर लोकांची मदत घ्यावी. शासनाकडूनही डिजिटलसाठी निधी देऊ, अशी घोषणा सहकार, पणन व वस्त्रोद्योग तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

सांगली - जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवून शिक्षकांनी चिंतन करावे. दानशूर लोकांची मदत घ्यावी. शासनाकडूनही डिजिटलसाठी निधी देऊ, अशी घोषणा सहकार, पणन व वस्त्रोद्योग तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षक व पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण येथील डेक्कन मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनमध्ये झाले. खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार विलासराव जगताप, सुरेश खाडे, सुधीर  गाडगीळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. देशमुख म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमातील आठशे मुले जिल्हा परिषद शाळेत आली हे कौतुकास्पद आहे.

इंग्रजी शाळा बंद पाडण्याची ताकद तुमच्यात आहे. इंग्रजी शाळा पडाव्यात अशी भूमिका नाही. तर शाळांचा दर्जा वाढावा हा उद्देश आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान द्या. उद्योजक, शेतकरी, शास्त्रज्ञ आदी क्षेत्रात विद्यार्थी घडवणारा जिल्हा असे ‘मॉडेल’ येथे बनवा. प्रत्येक शाळा डिजिटल बनवण्याचे उद्दिष्ट ठेवा. 

खासदार पाटील म्हणाले,‘‘जिल्हा परिषद शिक्षकांनी  चांगले काम केले आहे. स्पर्धा असताना सुद्धा शाळा टिकवून ठेवण्याची जबाबदारी ते पार पाडत आहेत. या शाळांचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी प्रयत्न करा. तसेच दुसरीकडे मुलांना मैदानावर आणा. त्यांनी मैदानावर जाऊन शरीर संपादन केले पाहिजे. शिक्षक, क्रीडा पुरस्काराबरोबर भविष्यात शाळा आणि पालकांचा देखील सन्मान करा.

श्री.  खाडे म्हणाले,‘‘जिल्हा परिषदेच्या शाळा बाळसे धरू लागल्यात. ज्या जुन्या शाळांचे निर्लेखन केले जाणार आहे, त्यांना निधी मंजुरीस मान्यता दिली आहे. डीपीसीमधून १७ कोटींचा निधी वर्ग केला. आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल. ग्रामीण भागात क्रीडा सुविधा देण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल.’’

जिल्हा आदर्श शिक्षक व क्रीडा पुरस्काराचे वितरण झाले. शिक्षण व आरोग्य समिती सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्ष श्री. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार  भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, ब्रह्मदेव पडळकर, अरुण राजमाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निशादेवी वाघमोडे आदींसह सदस्य, शिक्षक, खेळाडू, नातेवाईक उपस्थित होते.

आमदार जगताप यांच्याकडून कानपिचक्‍या

शिक्षण श्रीमंताचे झाले. विद्यार्थ्यांना परीक्षा, शिक्षकांना शिक्षणाचे गांभीर्य नाही. ढकलस्टार्ट करून दहावीपर्यंत आणले जाते. दहावी, बारावीत विद्यार्थी गटांगळ्या  खातात. ही विदारक स्थिती आहे. शिक्षकांना पुरस्कारासाठी आमदारांची शिफारस लागते. अनेकदा गुणवत्ता नसतानाही पुरस्कार दिला जातो ही पद्धत बंद करा. प्रामाणिक शिक्षकाला पुरस्काराची गरज नसते. अभ्यासक्रमापलीकडे जाऊन प्रयत्न करावेत. कर्तव्य पारखून बघा. जो पगार घेतो त्यात काय देतो ते तपासा अशा शब्दात आमदार जगताप यांनी शिक्षकांना कानपिचक्‍या दिल्या.
 

इंग्रजीतून ८८० मुले ‘झेडपी’ च्या शाळेत

अध्यक्ष देशमुख म्हणाले,‘‘जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या शाळांकडे बघण्याचा कल बदलला आहे. ८०० मुले इंग्रजी शाळा सोडून इकडे दाखल झालीत. हा या शाळांचा बहुमान आहे. शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यांच्यावर ताण येतो. इतरही काही प्रश्‍न आहेत. ते सोडवण्यासाठी पालकमंत्री देशमुख यांनी मुंबईत बैठक बोलवावी.
 

Web Title: Sangli News Subhash Deshmukh comment