कायदे करून प्रदूषणाचा प्रश्‍न सुटणार नाही - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मिरज -  ‘पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच आहे. कायदे करून प्रदूषणाचा प्रश्‍न सुटणार नाही,’ असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. कृष्णा नदीच्या प्रदूषणावर विचार करण्यासाठी डेव्हलपमेंट फोरमने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

मिरज -  ‘पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच आहे. कायदे करून प्रदूषणाचा प्रश्‍न सुटणार नाही,’ असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. कृष्णा नदीच्या प्रदूषणावर विचार करण्यासाठी डेव्हलपमेंट फोरमने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

आमदार सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, उपायुक्त स्मृती पाटील या वेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, की कायद्याने सर्व विषय सुटत नाहीत. फक्त दहशत निर्माण होते. प्रदूषणमुक्तीसाठी शासकीय स्तरावर सर्व ते प्रयत्न मी करेन. पण, प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने स्वतःची मानसिकता बदलावी. शहराच्या स्वच्छतेसाठी रोज किमान अर्धा तास द्यावा. सद्यस्थितीला पर्यावरण क्रांतीची गरज आहे. तरुण मंडळांत डॉल्बीची स्पर्धा असते. अशा मंडळांना वर्गणी न देण्याची भूमिका घेतली पाहिजे.

गेल्या वीस वर्षांतील वृक्षारोपणाचा आढावा घेतला, तर राज्यात तीन-चार मजली वृक्षारोपण होईल. तरीही सांगली जिल्हा सर्वांत मागे का पडला आहे, याचा विचार व्हायला हवा. झाडे नष्ट झाली, हे सांगण्यासाठी अनेक कारणे आपल्याकडे आहेत. वृक्षारोपणाचा कार्यक्रम शासकीय न राहता प्रत्येकाने केला तर झाडांप्रती जिव्हाळा वाढेल. वृक्षारोपण खऱ्या अथाने यशस्वी होईल. 

- सुभाष देशमुख, पालकमंत्री

या वेळी सांगली-मिरजेतील पर्यावरणप्रेमींनी अनेक सूचना व प्रस्ताव मांडले. नदीत जाणाऱ्या ड्रेनेजवर लक्ष द्या, असे अजित पाटील म्हणाले. कालबाह्य कायदे बदलण्याची मागणी किशोर पटवर्धन यांनी केली.

वि. द. बर्वे म्हणाले, की हरित न्यायालयाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. सध्या त्यांचा बाऊ केला जातोय. शासकीय यंत्रणा ढिम्म आहे.

सतीश साखळकर म्हणाले, की प्रत्येक सोसायटीला स्वतःचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सक्ती करा. शहरात रास्त दरात कापडी पिशव्या उपलब्ध झाल्या तर लाखोंच्या संख्येने वितरित करण्याची जबाबदारी आम्ही घेतो.

नदीकाठच्या प्रत्येक गावाने दोन किलोमीटर अंतराच्या नदीस्वच्छतेची जबाबदारी घेतल्यास कृष्णा प्रदूषणमुक्त होईल.

- रवींद्र व्होरा

आमदार खाडे म्हणाले, की शेरीनाल्याचा प्रश्‍न बरीच वर्षे गाजतोय. स्वच्छतेसाठी प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून सुरवात करायला हवी. 

Web Title: Sangli News Subhash Deshmukh comment