निकषात बसणाऱ्या सर्व थकबाकीदारांना कर्जमाफी -  सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

सांगली - लागू केलेल्या निकषात बसणाऱ्या सर्व थकबाकीदारांना राज्य सरकार कर्जमाफी देणार आहे. कर्जमाफीपासून थकीत कर्जदार वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिली.

सांगली - लागू केलेल्या निकषात बसणाऱ्या सर्व थकबाकीदारांना राज्य सरकार कर्जमाफी देणार आहे. कर्जमाफीपासून थकीत कर्जदार वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिली. दिवाळी सुटीमुळे चार दिवस कर्जमाफी लांबल्याचे सांगून ते म्हणाले,""पहिल्या यादीतील 8.50 लाख शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होईल.''

येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक व स्व. गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार वितरण झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले,""छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजनेसाठी 79 लाख शेतकरी अर्ज दाखल करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यापैकी 77 लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. कर्जमाफीचा लाभासाठी विरोधकांसह सर्व स्तरातून दबाव होता. कुणी म्हणाले, कर्जमाफी फसवी, मिळण्याबाबत साशंकता, दिवाळी गोड होणार की नाही. अनेक प्रश्न निर्माण विचारले जात होते. गतवेळच्या कर्जमाफीप्रमाणे पुन्हा चुका होणार नाहीत याची दक्षता घेतलीय. गेल्यावेळी अपात्र कर्जदारांना लाभ मिळाला. यंदा पारदर्शीपणे योजना राबवली. सरकारच्या निकषात बसणारा एकही कर्जदार माफीपासून वंचित राहणार नाही. थकीत कर्ज असलेल्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल.'' 

ते म्हणाले,""कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. चार दिवस बॅंका बंद राहिल्याने विलंब झाला. पहिल्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. कर्जमाफीसाठी दुसऱ्या यादीची छाननी करण्यात येत आहे. काहीसा वेळ लागेल. मात्र कुणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता सरकारकडून घेण्यात येत आहे. जिल्हा बॅंकेकडे कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. बुडणारे कर्ज मिळणार आहे. चार-दोन दिवस मागे पुढे होतील. मात्र बॅंकांनी ताणू नये.'' 

मोडगळीस आलेल्या संस्थांचे पालकत्व घ्यावे 

श्री. देशमुख म्हणाले,""सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याने राज्यात देशात नाव कमावले. सहकार पंढरीतील अनेक संस्था मोडगळीस आल्यात. सक्षम असलेल्या संस्थांनी डबघाईला आलेल्या संस्थांचे पालकत्व घेऊन परतफेडीवर कर्जपुरवठा करण्याची गरज आहे.'' जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना उद्देशून ते म्हणाले,""अडचणीतील संस्थांची एकत्रत बैठक घ्यावी.'' अशी सूचना केली. 

तुमची देशमुखी कायम करतो- जयंत पाटील 

सहकारतपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार कार्यक्रमांत आमदार जयंत पाटील हे भाषणाला सुरुवात करीत असताना राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव घेतल्यानंतर सहकारमंत्री सुभाष पाटील असा नामोल्लेख झाला. व्यासपीठावरील मंडळींच्या लक्षात आल्याने ही बाब जयंतरावांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जयंरावांनी तात्काळ सावध पवित्रा घेत माझा शब्द मागे घेतो, असे सांगत तुमची देशमुखी कायम करतो, असे म्हणाले. अन्‌ सभागृहात हशा पिकला. 
 

Web Title: Sangli News Subhash Deshmukh Press