कारखान्यांची गाळपाची तयारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

ऑक्‍टोबर हंगामाची लगबग - जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले

सांगली - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी येत्या गाळप हंगामाची तयारी जोरदार सुरू केली आहे. तोडणी, वाहतुकीचे करार पूर्ण झाले आहेत.

ऑक्‍टोबरमध्ये हंगाम सुरू होतील. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र किंचित वाढले असले तरी वसंतदादा, दालमिया आणि जत डफळे कारखाने पूर्ण क्षमतेने चालण्याचे नियोजन केल्यास यंदा उसाची पळवापळवी होणार आहे. यंदा जिल्ह्यात ६५ लाख टन गाळप शक्‍य आहे. 

जिल्ह्यात खासगी आणि सहकारी असे एकूण १६ साखर कारखाने आहेत. गत वर्षी ७२ हजार ३५९ हेक्‍टरवरील सुमारे ५२ लाख टन गाळप झाले होते. यंदाच्या गाळप हंगामासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. वाहतूक, तोडणी करार पूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी ऊस टंचाईमुळे दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्‍यातील कारखान्याचे गाळप अवघ्या १० दिवसांत बंद करावे लागले होते. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात अतिशय कमी गाळप झाले होते. हा कारखाना श्री दत्त इंडियाला चालवायला दिला आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षाची बिले, कामगार पगार दिले. यंदाच्या गाळपाची तयारी सुरू केली आहे. त्यांचे लक्ष गाळपावर आहे. शिवाय दालमिया कारखानाही पूर्ण क्षमतेने चालणार आहे. परिणामी यंदा उसाची पळवापळवी होणार हे निश्‍चित आहे.

जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत आठ हजार हेक्‍टरने वाढून ते ८० हजार ४४९ हेक्‍टर झाले आहे. बागायती पश्‍चिम भागात वाढ तर दुष्काळी पूर्व भागात क्षेत्र घटले आहे. दोन वर्षापूर्वी पाण्याची कमतरता आणि पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र कमालीचे घटले होते.

गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस ऊस लागवड वाढली. जिल्ह्यात गाळपासाठीचे ऊस क्षेत्र ८० हजार ४४९ हेक्‍टर आहे. गतवर्षी ते ७२ हजार ३५९ हेक्‍टर होते. दुष्काळी पट्ट्यात उसाच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील मिरज, पलूस, कडेगाव, वाळवा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. 

त्याचबरोबर शिराळा तालुक्‍यात यंदा ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.  तासगाव तालुक्‍यात ४४० हेक्‍टरने ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे चित्र दिसते आहे. 

सिंचन योजनांच्या फटका... 

दुष्काळी भागातील आटपाडी, जत तालुक्‍यात प्रत्येकी एक साखर कारखाना आहे. मात्र, या भागात पाणीटंचाईचा फटका ऊस लागवडीस बसला आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी जरी या पट्ट्यात आले असते तरी, अद्यापही लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना उस पिकाला पाणी देणे कठीण होत आहे. परिणामी आटपाडी, जत तालुक्‍यात दिवसेंदिवस ऊसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: sangli news sugar factory galap preparation