कारखान्यांची ‘एफआरपी’च यंदा ठरणार पहिली उचल

कारखान्यांची ‘एफआरपी’च यंदा ठरणार पहिली उचल

सांगली -  जिल्ह्यातील साखर कारखान्याचे धुराडे पेटू लागले आहे. काही कारखान्यांची गाळपाला सुरुवातही झाली आहे. जिल्ह्यात १६ साखर कारखाने आहेत. गेल्या वर्षीचा उतारा आणि गेल्या तीन महिन्यांत साखरेला मिळालेल्या सरासरी दरावर यंदाची ‘एफआरपी’ ठरते. गेल्या वर्षी प्रत्येक कारखान्याच्या उताऱ्यावरील ‘एफआरपी’च यंदाची पहिली उचल ठरणार आहे. यामुळे यंदा दराची कोंडी फोडायची कोणी, असा प्रश्‍नच येणार नाही. 
यंदा ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उसाला पहिली उचल तीन हजार ४०० रुपये मागितली आहे.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी तीन हजार ५०० रुपये मागितली आहे; तर शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने उसाचे अंतिम बिल मोठे म्हणजे गुजरातमधील गणदेवी साखर कारखान्याप्रमाणे चार हजार ४५० रुपये मागितले आहे. पहिल्या उचलेच्या मागणीतून तोडणी वाहतूक वजा करता शेट्टी, मंत्री खोत आणि रघुनाथदादांच्या मागणीप्रमाणे १०० रुपये कमी-अधिक दर मिळायला हरकत नाही. परिणामी, यंदा जरी शेतकरी संघटनांतर्फे दर जाहीर करण्यासाठी सध्या काही भागांत ऊसतोडी बंद पाडल्या जात असल्या, तरी कारखाने आणि आंदोलक शेतकरी संघटना यांच्यात दरांसाठी बैठका घ्यावयाची वेळच येणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.

दरासाठी शेतकरी संघटनांना फार ताणायची वेळ यंदा तरी दिसत नाही. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते जाहीरपणे मांडले एवढेच. दराची घोषणा करण्यासही कारखाना संचालक किंवा प्रशासनाकडून कोणत्याही हालचालीचे चित्र समोर येत नाही.

राज्यातील साखर हंगाम आजपासून सुरू होतील. कर्नाटकातील साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले आहेत. ऊसदर मागण्यासाठी ‘स्वाभिमानी’च्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत तीन हजार ४०० रुपयांची मागणी करण्यात आली. कृषी राज्यमंत्री खोत यांनी ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी शासकीय पातळीवर २ नोव्हेंबरला पुणे साखर आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीत काय ठरणार, याकडे शेतकरी, कारखानदारांचे लक्ष आहे. त्याच बैठकीत ‘एफआरपी’ हीच पहिली उचल जाहीर झाल्यास नवल वाटायला नको.आणि तो तोडगा कारखान्यांनी कोणत्याही परिस्थितीत अमान्य करायलाही संधी असणार नाही.

सरकारने साडेनऊ टक्के साखर उताऱ्याला दोन हजार ५५० रुपये प्रतिटन व पुढील प्रत्येक रिकव्हरीला २६८ रुपये देण्याचे बंधन घातले आहे. मात्र, त्यातून ऊसतोडणी व वाहतुकीचा खर्च वजा करून राहिलेली रक्कम ही ‘एफआरपी’ धरली जाते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी उतारा १२ टक्के आहे. यामुळे बहुतांश कारखान्यांची पहिली उचल दोन हजार ८५० रुपयांदरम्यान राहील. त्यात हुतात्मा, राजारामबापू, क्रांती, सोनहिरा साखर कारखान्यांची पहिली उचल तीन हजार रुपये असेल. त्यातही ‘हुतात्मा’ त्यात १०० ते १५० रुपयांची भर घालू शकेल. गेल्या वर्षी अडचणीत चालविलेले वसंतदादा, माणगंगा, महांकाली कारखान्यांचे दर कमी असणार आहेत. मात्र, वसंतदादा चालवायला घेतलेल्या श्री दत्त इंडिया कंपनीने जिल्ह्यातील अन्य कारखान्यांबरोबरीने दराची घोषणा केली आहे. 

साखर कारखाने आणि सन २०१६-१७ मधील उतारा - (आकडे टक्क्यांत)
हुतात्मा (१३.०१), राजारामबापू- जत (१०.८२), महांकाली- कवठेमहांकाळ (१०.८३), माणगंगा- आटपाडी (१०.२६ ), राजारामबापू- साखराळे (१२९०), राजारामबापू- वाटेगाव (१२.३५), सोनहिरा- कडेगाव (१२.६८), वसंतदादा- सांगली (१०.७४), विश्‍वास- शिराळा (११.७५), क्रांती- कुंडल (१२.५०), मोहनराव शिंदे- आरग (१२.०२), राजारामबापू- सर्वोदय (१३.००), केन ॲग्रो- कडेपूर (११.६०), दालमिया- कोकरूड (१२.३५), सद्‌गुरू श्रीश्रीश्री- आटपाडी (११.०२), उदगीर (११.७६).

उतारा व एफआरपी
 ९.५० टक्के, २५५० रु.
 १० टक्के,    २६८४ रु.
 १०.५० टक्के, २८१८ रु.
 ११ टक्के, २९५२ रु.
 ११.५० टक्के, ३०८६ रु.
 १२ टक्के, ३२२० रु.
 १२.५० टक्के, ३३५४ रु.
 १३ टक्के, ३४८८ रु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com