‘तत्त्वतः सरसकट’चं ठरू द्या, मग उसाचा दुसरा हप्ता काढा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

सांगली - उसाचं दुसरं बिल काढण्याची घाई करू नका. आधीच राज्य सरकारच्या सरसकट पण तत्त्वतः कर्जमाफीचा निर्णय होऊ द्या, त्यानंतर ठरवू, अशी सूचना शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांना केली आहे. त्यामुळे तूर्त बिले काढण्याची घाई नसल्याने कारखानदारांत ‘फिल गुड’ आहे. 

सांगली - उसाचं दुसरं बिल काढण्याची घाई करू नका. आधीच राज्य सरकारच्या सरसकट पण तत्त्वतः कर्जमाफीचा निर्णय होऊ द्या, त्यानंतर ठरवू, अशी सूचना शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांना केली आहे. त्यामुळे तूर्त बिले काढण्याची घाई नसल्याने कारखानदारांत ‘फिल गुड’ आहे. 

जिल्ह्यात यावर्षी ५० लाख ५१ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. पैकी १३०० कोटीहून अधिकची बिले अदा करण्यात आली आहेत. ही पहिली उचल होती. ‘हुतात्मा’ने सर्वाधिक २८००, राजारामबापूने २७९० रुपये पहिली उचल काढली आहे. आता दुसऱ्या उचलीचे वारे वाहत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिटन किमान ५०० रुपयांची उचल मिळावी, अशी मागणी केली आहे. कऱ्हाडच्या सह्याद्री कारखान्याने ३१०० रुपये देवून साऱ्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे या टप्प्यात उसाचा दुसरा हप्ता निघेल, अशी चर्चा आहे. कारखानदारांनी त्याची तयारी केली आहे, परंतू काही शेतकऱ्यांनी तूर्त बिले काढू नका, अशी सूचनाच कारखान्यांनी दिली आहे. त्यामागे कर्जमाफीचे नेमके काय होणार, हा मुद्दा आहे.

अनेक शेतकऱ्यांचे कर्ज मार्च २०१७ मध्ये थकीत गेले आहे. ते माफ होणार आहे. जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना ‘निकष’ काय असतील,  याकडे लक्ष लागले आहे. सरसकट कर्जमाफी देताना काय-काय निकष असतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याआधी उसाची बिले निघाली तर विकास संस्थेकडून कर्जाची वसुली केली जाईल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे थोडं थांबा, काय होतयं पाहू, मग बिले काढा, असा मार्ग शेतकऱ्यांनी काढलाय, असे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी सांगितले. त्यामुळे दुसरा हप्ता काढू, मात्र थोडं थांबून, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. कारण, अल्पभूधारकांची  कर्जमाफी झाली असली तरी सात-बारा कोरा व्हायला किती वेळ लागेल, याकडेही लक्ष आहे.

Web Title: sangli news sugarcane second installment