पोलिस निरीक्षक गडदेंची गोळी झाडून आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यात बढती होत नाही आणि वरिष्ठांचा त्रास होत असल्याचा उल्लेख असल्याचे समजते. त्यांच्या पश्‍चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटूंबियांनी टाहो फोडला. ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त केली जात होती

सांगली - येथील सीआयडी विभागात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक सखाहरी गिरजाप्पा गडदे (वय 49) यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्‍यात गोळी घालून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. विश्रामबागला राहत्या घरी पहाटे त्यांनी आत्महत्या केली. बढती आणि वरिष्ठांच्या त्रासातून आत्महत्या केल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. 

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, की गडदे चार महिन्यांपूर्वी सांगलीतील सीआयडीत बदलून आले होते. सध्या ते वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी आमरावती आणि कोल्हापूर येथे काम केले. कोल्हापूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांनी धडाकेबाज काम केले. त्यानंतर त्यांची तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली. चार महिन्यांपूर्वी त्यांना सीआयडी विभागाचे निरीक्षकपद सोपवले. मात्र, त्यांच्या सेवा काळात बढती होत नसल्याने त्यांना नैराश्‍य आले होते. त्यांच्या बॅचमधील अनेकजणांची बढती झाली होती. तसेच त्यांच्या मागून सेवेत आलेल्या अनेकांनाही बढती देण्यात आली होती. मलाच बढती का मिळत नाही, म्हणून त्यांना नैराश्‍य आले होते. 

विश्रामबागमधील देवल कॉम्प्लेक्‍समधील तिसऱ्या मजल्यावर ते राहत. आज पहाटे त्यांनी साडेसहाच्या सुमारास घरातील सर्व जण झोपले असताना सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्‍यात गोळी घालून आत्महत्या केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यात बढती होत नाही आणि वरिष्ठांचा त्रास होत असल्याचा उल्लेख असल्याचे समजते. त्यांच्या पश्‍चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटूंबियांनी टाहो फोडला. ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. 

मुख्यमंत्र्यांनाही पत्र 
निरीक्षक गडदे यांनी बढतीबाबत अन्याय होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवल्याचे माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली. मुख्यमंत्र्यांनी पत्राची दखल न घेतल्याने हा प्रकार घेतल्याचे चर्चा सुरु होती. 

वडिल- भाऊ पोलिस सेवेत 

गडदे यांचे वडिल गिरजाप्पा गडदे हे पोलिस दलात फौजदार म्हणून निवृत्त झाले होते. सध्या त्यांचे बंधू गणेश गडदे हे पोलिस दलात कार्यरत आहे. 

वडिलांचा केला वाढदिवास 
गडदे यांच्या वडिलांचा काल 84 वा वाढदिवस त्यांनी साजरा केला. त्यांचे वडील विजयनगर येथील बहिणीकडे राहत असल्याने त्याठिकाणी जावून वाढदिवस केला. त्यानंतर त्यांनी पत्नी मुलांसह काल दिवाळीचीही तयारी केली

Web Title: sangli news: suicide