झेडपीची एकही शाळा बंद करू देणार नाही - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

बागणी - राज्यातील ११३ मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट सरकारने घातला आहे. परंतु जिल्हा परिषदेची एकही शाळा मी बंद पडू देणार नाही. राज्य शासनाचा हा डाव हाणून पाडू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. 

बागणी - राज्यातील ११३ मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट सरकारने घातला आहे. परंतु जिल्हा परिषदेची एकही शाळा मी बंद पडू देणार नाही. राज्य शासनाचा हा डाव हाणून पाडू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. 

ढवळी (ता. वाळवा) येथे रयत शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. डॉ. एन. डी. पाटील ग्रंथालय व अभ्यासिका उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील, माजी खासदार रामशेठजी ठाकूर, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोजमाई पाटील, श्री शाहू शिक्षण प्रसारक व सेवा मंडळाच्या सचिव विद्याताई पोळ, युनो सदस्य डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ‘रयत’चे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे प्रमुख उपस्थित होते.

राज्य सरकारने जाहिरातीऐवजी बंद पाडण्यात येत असलेल्या शाळांवर खर्च करावा. १४ वर्षांपर्यंत मुलांना मोफत शिक्षण दिलेच पाहिजे. आम्ही शाळा बंद पाडू देणार नाही.

-  सुप्रिया सुळे

सुळे म्हणाल्या, ‘‘शाहू महाराजांमुळे स्त्री शिक्षणाला महत्त्व आले. स्त्रियांना आरक्षण देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्याचा मुलींनी पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. सरोजमाई व माझा रक्‍त गट एक आहे. आम्हाला सतत एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची सवय आहे. माईंनी रयत शिक्षण संस्थेचे जलतरणपटू सागर पाटील विद्यालय एक आदर्श मॉडेल म्हणून उभे केले. येथील लॅब पुणे, मुंबईतील शाळांपेक्षा उत्कृष्ट आहे. आर. आर. पाटील यांची मुले मराठी शाळांमधून घडली.’’

अनिल पाटील म्हणाले, ‘‘सध्याची पिढी नशिबवान आहे. अवकाशाला गवसणी घालणे विद्यार्थ्यांना सोपे झाले  आहे. रयत शिक्षण संस्थेला ९८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील तीन वर्षांत या संस्थेमार्फत शंभर इंटरनॅशनल  स्कूल चालू करणार आहोत. त्यातील एक ढवळी येथे असेल. आयआयटी फाऊंडेशन कोर्स सुरू करू.’’ 

बागणी येथे रयत शिक्षण संस्थेची पहिली शाळा काढण्यात आली. परंतु ढवळीतील मुला-मुलींना बाहेर शिक्षणासाठी जाणे शक्‍य होत नव्हते. बागणीची पोट शाळा ढवळी येथे सुरू करण्यात आली. आता या शाळेत भागातील दहा गावांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्यांना शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाणे शक्‍य नव्हते त्यांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.

- एन. डी. पाटील

सरोजमाई म्हणाल्या, ‘‘शाळा उभा करण्यासाठी देणगीदारांचे हात लाभले. या देणगीचा आम्ही सद्‌उपयोग केला आहे. मुलांनी एन. डी. पाटील व डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. वाचनाची संगत वाढवावी.’’

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. शाळेच्या नियतकालिकाचे प्रकाशन झाले. दि. बा. पाटील, विलास रकटे, पद्मावती माळी, प्रशांत पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Sangli News Supriya Sule comment