डॉ. खोचीकर झाले 'सर्जरी'च्या जागतिक संदर्भग्रंथाचे लेखक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

वीस वर्षांत डॉ. खोचीकर यांनी मूत्रपिंडाचा कर्करोग आणि त्यावरील उपचार, शस्त्रक्रियांबाबत मूलभूत स्वरूपाचे संशोधनकार्य केले आहे. त्यांच्या या कामामुळेच शल्यचिकित्सेच्या क्षेत्रातील संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता असलेल्या या ग्रंथासाठी लेखक म्हणून त्यांची निवड झाली.

सांगली : वैद्यकीय क्षेत्रात शल्यचिकित्सेचा जागतिक दर्जाचा संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता असलेल्या 'सर्जरी कोअर प्रिन्सिपल अँड प्रॅक्‍टिस' या दोन खंडातील ग्रंथात येथील प्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांच्या दोन अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश झाला आहे. अमेरिकेतील जेपी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे जॉन कॉर्सन आणि रॉबीन विल्यम्सन संपादक आहेत. भारतातील फक्त दोन डॉक्‍टर या ग्रंथासाठी निमंत्रित लेखक होते. 'मूत्रपिंडाचे कर्करोग आणि अंडाशयाचे आजार' या दोन विषयांवर त्यांचे प्रबंध आहेत. 

नवी दिल्ली, लंडन आणि पनामा येथे कालच (ता. 29) हे पुस्तक प्रकाशित झाले. वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञांची ज्ञानाची सतत आदान-प्रदान होत असते. वैद्यकीय परिषदांच्या निमित्ताने ही तज्ज्ञ मंडळी नेहमीच सतत भेटतात. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष शस्त्रक्रियाही जगभरातील डॉक्‍टर अनुभवत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील 'सुपरस्पेशालिटी' क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक विविध विभागांमधील तज्ज्ञांकडून प्रसिद्ध होणाऱ्या अशा संदर्भ ग्रंथांचे त्यामुळेच खूप महत्त्व असते. वीस वर्षांत डॉ. खोचीकर यांनी मूत्रपिंडाचा कर्करोग आणि त्यावरील उपचार, शस्त्रक्रियांबाबत मूलभूत स्वरूपाचे संशोधनकार्य केले आहे. त्यांच्या या कामामुळेच शल्यचिकित्सेच्या क्षेत्रातील संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता असलेल्या या ग्रंथासाठी लेखक म्हणून त्यांची निवड झाली. या क्षेत्रातील सुमारे 30 तज्ज्ञांनी या लेखकांची निवड केली होती. सुमारे चार वर्षांपासून या संदर्भ ग्रंथाची जगभरातील नामवंत शल्यचिकित्सक जुळवाजुळव करीत होते. त्यात डॉ. खोचीकर यांच्याबरोबरीने नडियाल (गुजरात) येथील डॉ. महेश देसाई यांचीही निवड झाली होती. 

डॉ. खोचीकर यांनी गेल्या दोन दशकांत कर्करोगाच्या वीस हजारांवर रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याचा संपूर्ण दस्ताऐवज त्यांनी जतन करून ठेवला आहे. संशोधनकार्यासाठी सामग्रीचे असे जतन पुढच्या अनेक पिढ्यांसाठीही ज्ञानसाठा असतो. हे सारे संचित त्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी खुले होत आहे. योग्य पुरावे आणि संदर्भासह केलेले हे विश्‍लेषण या ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढवणारे असे आहे. या संदर्भ ग्रंथात त्यांनी सुमारे सत्तर पानांचे लेखन केले आहे. 

तीन नवे संदर्भ ग्रंथ लिहिणार 
वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य संदर्भ नियतकालिक म्हणून 'लॅन्सेट'ला मान्यता आहे. या नियतकालिकाच्या संपादकीय सल्लागार मंडळावरही डॉ. खोचीकर कार्यरत आहेत. मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान आणि उपचारपद्धतीवर त्यांनी मौलिक असे कार्य केले आहे. कर्करोगामुळे बाधित झालेला मूत्रपिंडाचा भाग नव्याने आतड्यापासून तयार करून त्याचे रोपण करून त्यांनी शेकडो रुग्णांना जीवदान दिले आहे. आजवर सुमारे वीस हजारांवर रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. या सर्व संशोधन कार्याविषयची तीन पुस्तके लवकर प्रसिद्ध होणार आहेत

Web Title: sangli news surgery world reference book dr khochikar