सुरमई, पापलेट मिरजेत हजाराच्या घरात

संतोष भिसे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील माशांच्या किंमती पंचवीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत.

मिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील माशांच्या किंमती पंचवीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. अस्सल मासळीबहाद्दरांची पहिली पसंती असलेल्या सुरमई आणि पापलेटने तर खिशाला भलताच खार लावला आहे. समुद्राच्या माशांची भूक नदीतल्या माशांवर भागवावी लागत आहे. ताटातली पापलेटची जागा कटल्याने घेतली आहे. 

उन्हाळ्यात मासळीचा दुष्काळ खवय्यांसाठी नवा नाही. एप्रिल ते जुलै हे चार महिने कसेबसे काढल्यानंतर वर्षभर चंगळ करणारे मासळीबहाद्दर यंदा मात्र मेटाकुटीला येण्याच्या बेतात आहेत. फेब्रुवारीअखेरपर्यंत पाचशे रुपयांत किलोभर मिळणारी सुरमई आता आठशे आणि हजारांच्या टप्प्यात गेली आहे. सहा-सातशेचा पापलेट हजारी पार गेला आहे. मासळीमधला स्नॅक ठरणाऱ्या प्रॉन्सनी तीनशे-चारशेवरुन सात-आठशेची उसळी घेतली आहे. शे-सव्वाशेचा बांगडा दोन-अडीचशेची सीमा पार करतो आहे. मोठा झिंगा पाचशे-सहाशेचा भाव खातो आहे. समुद्राची मासळी आकाशाकडे झेपावताना नदीतले मासेही मागे कसे मागे राहणार ? वाम शंभरांनी वाढलाय तर मरळ तीन-साडेतीनशेवर गेलीय. एकूणच मे-जूनचा वाढता चटका माशांचाही दुष्काळ वाढवणारा ठरतोय. 

सांगली-कोल्हापूरात प्रामुख्याने गोव्यातून पणजी, मडगाव तसेच रत्नागिरी, देवगड, मालवण येथून मासळी येते. ऑगस्टमध्ये मासेमारी सुरु झाल्यानंतर पहिले दोन-तीन महिने कोकणातून जोर असतो. डिसेंबरनंतर गोव्यातून आवक वाढते. सध्या मडगाव-पणजीची चव चाखायला मिळत आहे.

उन्हाळ्यातली तेजी व्यावसायिकांसाठी आणि खवय्यांसाठी नवी नाही; यंदा मात्र ती चांगलीच वाढली आहे. व्यावसायिकांकडून कानोसा घेतला असता परदेशात वाढलेली निर्यात हे मुख्य कारण सांगितले जात आहे. महाराष्ट्रासह देशभरातून थायलंड, इंडोनेशीया, दुबई या देशांत निर्यात लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. उत्तम प्रतीची मासळी तिकडे निघाली आहे.

दरही चांगला मिळू लागला आहे; त्यामुळे निर्यातदारांची चांदी सुरु आहे. निर्यातीने सांगली-कोल्हापुरातील खवय्यांचे मात्र वांदे केले आहेत. सुरमई, पापलेट आणि बांगड्याला जास्त मागणी आहे; त्यांचे दर खाली येण्याचे नाव घेईनासे झाले आहेत. येत्या ऑगस्टनंतर नवा हंगाम सुरु होईल; तोपर्यंत हाच तडका कायम राहण्याची चिन्हे आहेत. येथील व्यावसायिक इरफान पठाण यांनी याला दुजोरा दिला. 

गेल्यावर्षी एप्रिल-मे दरम्यान शासनाने मासेमारीवर बंदी जाहीर केली होती. ऑगस्टपर्यंत माशांचा प्रजननकाळ असल्याने मासेमारी बंद ठेवली होती. त्यामुळे प्रजनन चांगले होऊन गेले वर्षभर मासे मुबलक प्रमाणात मिळाले. वीस ते तीस टक्के जादा माल गवसला; दर बेतात राहील्याने व्यावसायिकांची आणि खवय्यांचीही चांदी झाली. यंदा एप्रिल संपत आला तरी बंदी जाहीर झालेली नाही; त्यामुळे पुढच्या हंगामात माशांचा दुष्काळ पडण्याची भिती व्यावसायिक व्यक्त करत आहेत. चीनमधून आलेल्या एलईडी तंत्राने मासेमारी सुरु झाल्याने समुद्रातून मोठ्या प्रमाणात माशांचा उपसा सुरु आहे; त्याचाही फटका आगामी वर्षात बसण्याची भिती व्यक्त होत आहे. 

दुधाची तहान ताकावर 
समुद्री मासे महागल्याने खवय्यांना नदीतल्या माशांवर वेळ मारुन न्यावी लागत आहे. आलमट्टी धरण, कुडची, ढवळी, म्हैसाळ, डिग्रज, भिलवडी, आमणापूर आदी भागातून सांगली जिल्ह्यात मासे येतात. अस्सल मासळीबहाद्दरांना आगामी तीन-चार महिने त्यांच्यावरच चोचले भागवावे लागणार आहेत.

मासळी उसळली
मासळीबाजारातील सध्याचे सरासरी दर असे आहेत

  • सुरमई - 800 ते 1000
  • पापलेट - 900 ते 1100
  • बांगडा - 200 ते 300
  • प्रॉन्स - 600 ते 800
  • वाम - 400 ते 500
  • मरळ - 400 ते 500
  • कटला - 250 ते 400
Web Title: Sangli news Surmai, Papmlet rate