शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशनासाठी स्वाभिमानीचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

सांगली - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दूध दरवाढ, उसाची थकीत बिले आणि शेतकरी प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन या मागण्या  यावेळी त्यांनी केल्या.

सांगली - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दूध दरवाढ, उसाची थकीत बिले आणि शेतकरी प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन या मागण्या  यावेळी त्यांनी केल्या.

मोर्चा दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावरच  अडवल्याने बाचाबाची झाली. ""आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्हाला आत सोडा, आम्ही नुकसान करणार नाही, मात्र हक्क मारू नका'', असा इशारा देत आक्रमक पवित्रा घेतला. प्रशासनाचा निषेध करत प्रवेशव्दारावर  आंदोलकांनी दूध ओतले. 

जिल्हाध्यक्ष महेश खराडे, युवा नेते संदीप राजोबा, महावीर पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. हातात ऊस, दूधाच्या किटल्या घेऊन मोर्चा निघाला. खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचे डिजीटल फलक आंदोलकांच्या हातात होते. मोर्चा दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलिसांनी तो अडवला. त्यावर आम्हाला आत सोडा, अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करायची आहे, अशी मागणी केली. पोलिसांनी त्याला नकार दिल्याने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. अडवणूक केल्याचा आरोप करत दूध ओतले. 

जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही. ती लवकर द्यावी. दूध दरात बेकायदेशीर कपात केली जात आहे, त्यामुळे दूध दरात वाढ करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चा घडवावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

Web Title: Sangli News Swabhimani agirtation