जानेवारीपासून नऊजणांना ‘स्वाईन फ्लू’ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

सांगली - जानेवारी २०१७ पासून ९ रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली. त्यातील ५ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले. चौघांचा मृत्यू झाला. आता ताप, सर्दी, खोकल्याने ग्रस्त रुग्णाला स्वाईन फ्लू आहे किंवा नाही, याची खात्री होण्यासाठी रक्त तपासणीच्या अहवालाची प्रतीक्षा करू नका. तीन दिवसांत ताप कमी झाला नाही तर लगेच टॅमी फ्लूचा डोस सुरू करा, असे आदेश जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासकीय  आणि खासगी डॉक्‍टरांना दिले आहेत.

पावसाळी वातावरणात स्वाईन फ्लू वेगाने पसरत असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या रुग्णांची नावे समोर येत आहेत. वसंतदादा शासकीय रुग्णालयातही ताप, सर्दी, खोकल्याने ग्रस्त रुग्ण संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी लोकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन यंत्रणेने केले आहे.

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीमध्ये देशभरातून रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी येतात. परिणामी, अहवाल मिळायला वेळ लागू शकतो. काहीवेळा शासकीय सुट्यांची अडचण येते. तोवर रुग्णावर उपचार थांबवून चालत नाही. परिणामी, राज्य शासनाने तीन दिवस ताप, सर्दी, खोकला कमी झाला नाही तर तातडीने स्वाईन फ्लूसाठीचा उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची मार्गदर्शन तत्त्वे शासकीय यंत्रणेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या परिसरातील खासगी डॉक्‍टरांना पुरवण्यात आली आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्ह्यातील सदस्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.  

चौघांचा मृत्यू; एक समान धागा
जिल्ह्यात आतापर्यंत चार रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडे या यंत्रणेने चौकशी केली असता एक समान धागा सापडला आहे. त्या चौघांनीही पुणे, मुंबई, नाशिक या भागात प्रवास केला होता. त्यातून स्वाईन फ्लू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पैकी दोघांना सातारा जिल्ह्यातील रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

लक्षणे आणि सूचना
* ताप, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, सर्दी, डोकेदुखी, वाहते नाक, श्‍वास घेण्यास त्रास
* अतिसार आणि उलट्या
* तीन दिवस ताप न उतरणे, शुद्ध हरपणे, धाप लागणे

Web Title: sangli news swine flu