खेड्यांनाही का हवाय ‘वृद्धाश्रम’?

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

तासगाव तालुक्‍यातील येळावी येथे वृद्धाश्रम सुरू होतोय. ही गोष्ट चांगली की वाईट? कोणत्याही समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढत राहणं ही समाजाच्या प्रगतीचे लक्षण मानायचं? वृद्धाश्रम ही शहरी संस्कृतीचा प्रॉडक्‍ट आहे, असं म्हटलं जाताना खेड्यांतल्या घट्ट कुटुंब व्यवस्थेचा दाखला दिला जायचा. विभक्त होत जाणारी कुटुंबे, शहरी जगण्याचा अट्टहास, इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला ओढा आणि संस्कारांची बदललेली व्याख्या, घरांचे काँक्रिटीकरण अशी शहरीकरणाची दृश्‍य लक्षणे खेड्यांबाबतीत चर्चेत होती. त्यात वृद्धाश्रमांची भर पडतेय. त्याचे नेमके काय परिणाम होतील याविषयी या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अस्वस्थ करणारी निरीक्षणे...

प्रत्येकाची वेगवेगळी गाऱ्हाणी
विठ्ठल पाटील (गोविंद वृद्धाश्रम, येळावी) 

मी कुंडलच्या क्रांती साखर कारखान्यात काम करतो. खेड्यांतही वृद्धांची आबाळ होत चालली आहे. शहरांत आर्थिक सुबत्ता असेल तर वृद्धाश्रमात जायचा पर्याय असतो. खेड्यात ती सोय नसल्याने अनेकांना कुटुंबात खितपत पडावे लागते. मी काही सहकाऱ्यांच्या मदतीने वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या आठ जण दाखल झालेत. चार पुरुष, चार महिला आहेत. सारेच शेतकरी कुटुंबातून आलेले. मुले हयात नाहीत. मुलीच्या सासरची मंडळी स्वीकारत नाहीत अशी प्रत्येकाची वेगवेगळी गाऱ्हाणी. सर्वांना आम्ही विनाशुल्क समावून घेतलंय. या वृद्धाश्रमासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. जागेपासून बांधकामापर्यंत आणि आता अन्नापर्यंतच प्रत्येक जण मदत देत आहे. 

ज्येष्ठांच्या समस्यांचा दिवसेंदिवस वाढता परीघ
उदय जगदाळे,  (कुपवाड वृद्धाश्रम)

तरुणांचा देश असलेल्या भारतात आता ज्येष्ठांच्या समस्यांचा परीघ दिवसेंदिवस वाढत आहे. कुपवाडमधील आमच्या वृद्धाश्रमाच्या दोन नव्या शाखा सुरू कराव्या लागल्या. त्यात डे केअर युनिटचा समावेश आहे. खेड्यांतून शहरातील वृद्धाश्रमात दाखल होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. गरिबीच्या असह्य परिस्थितीने येणारे आणि त्याच वेळी कितीही पैसे घ्या, मात्र आम्हाला चांगल्या सुविधा द्या, असा आग्रह धरणारे अशी वर्गवारी झाली आहे. यापुढे जिल्हा परिषदेच्या आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे ऐपतीप्रमाणे शिक्षण, वृद्धाश्रम असेही दोन प्रवर्ग तयार होतील. त्यामुळे या क्षेत्राचा प्रवासही आता चॅरिटीकडून व्यावसायिकतेकडे सुरू झाला आहे. सांगलीतील दत्ताजीराव माने ट्रस्टच्या वतीने आम्ही घरीच रुग्णसेवेसाठी नर्सेस उपलब्ध करून देतो. म्हणजे आपल्या माणसांना सांभाळणे अवघड होते, आपल्या माणसांची सेवा करणेही मुश्‍कील होतेय. हे वास्तव आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आज ज्येष्ठांचे जे काही संघटन आहे ते पेन्शनरांचे आहे. त्यापलीकडे शेतकरी, कष्टकरी असा मोठा वर्ग आहे. ज्यांच्या भवितव्याबाबत शासनाकडे कोणताच कार्यक्रम नाही. 

वृद्धाश्रमाविषयी समाजाचे वर्तन दुतोंडी
डॉ. दिलीप शिंदे  (संवेदना शुश्रूषा केंद्र)

वृद्धाश्रम ही समाजाची गरज झाली आहे. ती नाकारून चर्चा करण्यात अर्थ नाही. ज्येष्ठांना तिकडे पाठवताना त्यांच्याशी नाते तोडले जातो हे आक्षेपार्ह आहे. समाजाचे याबाबतचे वर्तन दुतोंडी असते. त्यामुळे वृद्धश्रम ही विरुंगुळा केंद्रे न होता अडगळीच्या खोल्या होतात. ग्रामीण भागातून वृद्धाश्रमात येण्यामागे प्रामुख्याने कुटुंब कलह कारण दिसते. मानसिक खच्चीकरण झालेले, घरातून हाकलून दिलेले ज्येष्ठ इकडे येतात. त्यांच्या शारीरिक आरोग्याची काळजी करतो, मात्र त्यांच्या मानसिक आरोग्याची तितकी काळजी केली जात नाही. या पातळीवर प्रबोधनाची खूप गरज  आहे. खरे तर वृद्धाश्रम त्या ज्येष्ठाची गरज म्हणून व्हावीत. आज ती कुटुंबाची गरज म्हणून होत आहेत. हे क्‍लेशदायक आहे. आम्ही शुश्रूषा केंद्र सुरू केले. मात्र त्यांची संख्या वाढवण्याऐवजी कुटुंबाच्या पातळीवरच प्रश्‍न कसे सोडवता येतील या दिशेने आमची ही चाचपणी सुरू आहे.

आर्थिक, भावनिक कारणातून रवानगी
प्रदीप सव्वाशे  (रुग्ण सेवा प्रकल्प)

वर्षभरापासून आम्ही केंद्र सुरू केलंय. १३ ज्येष्ठ दाखल झालेत. त्यातील तिघे ग्रामीण भागातून आले आहेत. शहरांएवढी गंभीर समस्या खेड्यात नाही. मात्र खेड्यात कुटुंबातून सन्मान हरवलेले ज्येष्ठ नाना कारणांनी वृद्धाश्रमाकडे येऊ इच्छितात. ज्येष्ठांत कायदेशीर अधिकारांबाबत जागरूकता गरजेची आहे. विशेषतः मालमत्तांचे अधिकार मृत्यूपर्यंत ज्येष्ठांनी आपल्याकडेच राखून ठेवले, तर वृद्धाश्रमाकडे नाईलाजाने येणाऱ्यांच्या संख्या कमी होईल. सर्व शेतीवाडी नावावर करून घेऊन प्राध्यापक मुलाने बापाची वृद्धाश्रमात रवानगी केली किंवा सावत्र मुलाने सारी मालमत्ता नावावर करून घेऊन  सांभाळ केला नाही, अशी काही उदाहरणे आहेत. आर्थिक आणि भावनिक अशा दोन्ही कारणांतून ज्येष्ठांची वृद्धाश्रमात रवानगी होते. खेड्यांत या समस्या प्रामुख्याने आर्थिक आहेत. मात्र घरांतही ज्येष्ठांना समजून घेण्यातील अभाव किंवा त्यांच्या विरुंगुळ्याच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्याने वृद्धांच्या समस्या वाढत आहेत.

Web Title: sangli news Tasgaon old age home