शिक्षकांच्या पगारासाठी "बुलडाणा पॅटर्न' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सांगली - शिक्षकांचा पगार एक तारखेला द्यावा, असा शासन निर्णय असतानाही जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी नाही. ऑनलाईन-ऑफलाईनच्या घोळात जुलैचा पगार 21 ऑगस्टपर्यंत लांबणीवर गेला. पगाराच्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी "बुलडाणा पॅटर्न' राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी त्यासाठी सकारात्मकता दर्शवली. 

सांगली - शिक्षकांचा पगार एक तारखेला द्यावा, असा शासन निर्णय असतानाही जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी नाही. ऑनलाईन-ऑफलाईनच्या घोळात जुलैचा पगार 21 ऑगस्टपर्यंत लांबणीवर गेला. पगाराच्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी "बुलडाणा पॅटर्न' राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी त्यासाठी सकारात्मकता दर्शवली. 

जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे पगार नियमितपणे एक तारखेलाच व्हावेत, असा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आले. परंतु, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात होताना दिसत नाही. त्यामुळे शिक्षकांना ओढाताण करावी लागते. बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचे हप्ते प्रत्येक महिन्यात वेळेत द्यावे लागतात. हप्ता चुकला दर दंड भरावा लागतो. उसनवारी करावी लागते. उशिराने पगार हातात पडल्यानंतर तो ऊसनवारी भागविण्यासाठी आणि बॅंकांतील दंडव्याज भरण्यातच खर्ची होतो. शिक्षकांचा पगार वेळेत व्हावा, यासाठी शिक्षकांच्या विविध संघटना प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेकडे त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. 

सांगली जिल्ह्यात ही परिस्थिती असताना दुसरीकडे बुलडाण्यासारख्या जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या पगारासाठी अनोखा पॅटर्न राबविला आहे. त्यामुळे तेथे प्रत्येक महिन्यात एक तारखेला शिक्षकांचा पगार होतो. त्याच धर्तीवर सांगली जिल्हा परिषदेतही हा पॅटर्न राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी अनुकूलता दर्शवली आहे. 

बुलडाणा पटर्न असा 
बुलडाणा "सीईओं'शी त्यांनी संपर्कही साधला. त्यानुसार जिल्ह्यातही शाळा ते कोशागार या पगारासाठीच्या मार्गाचे टप्पे पाडले जातील. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी आणि कोशागार कार्यालय असे पगारासाठीचे टप्पे आहेत. या सर्वांना प्रत्येक महिन्यात ठराविक मुदत दिली जाईल. त्या मुदतीत संबंधितांनी जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. एखाद्याने जबाबदारी पार पाडली नाही तर कारवाई केली जाईल. 
ऑक्‍टोबर एक तारखेचा पगार "बुलडाणा पॅटर्न'प्रमाणे देण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी लवकरच पगाराच्या प्रक्रियेतील संबंधितांची बैठक घेऊन सूचना दिल्या जातील. 

""शिक्षक भारती संघटनेने जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार वेळेत व्हावेत, यासाठी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी बुलडाणा पॅटर्न राबविण्याबाबत आश्‍वासन दिले. श्री. राऊत यांनी जी सकारात्मकता दाखवली त्याचे निश्‍चितच स्वागत आहे.'' 
- महेश शरनाथे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना 

Web Title: sangli news teacher