कोरेगावात दोन गटांत तुफान हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

आष्टा - कोरेगाव (ता. वाळवा) येथे उपसरपंचपदाच्या निवडणुकीनंतर मिरवणुकीदरम्यान गुलाल टाकल्यावरून माजी आमदार विलासराव शिंदे समर्थक दिवंगत आर. के. पाटील गट व माजी मंत्री जयंत पाटील समर्थक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष  बी. के. पाटील गटातील कार्यकर्त्यांत काठ्या, दगडाने तुफान मारामारी झाली.

आष्टा - कोरेगाव (ता. वाळवा) येथे उपसरपंचपदाच्या निवडणुकीनंतर मिरवणुकीदरम्यान गुलाल टाकल्यावरून माजी आमदार विलासराव शिंदे समर्थक दिवंगत आर. के. पाटील गट व माजी मंत्री जयंत पाटील समर्थक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष  बी. के. पाटील गटातील कार्यकर्त्यांत काठ्या, दगडाने तुफान मारामारी झाली. एका नागरिकासह दोन्ही गटांचे अनेकजण जखमी झालेत. राजकीय वैमनस्यातून दोन्ही गटांकडून जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोसायटी, दुकाने व खासगी इमारतींवर काचेच्या बाटल्या व दगडफेक झाली. डिजिटल बॅनर फाडण्यात आले. गावात तणावाची स्थिती आहे. 

बुधवारी रात्री घटना घडूनही गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आष्टा पोलिसांत दोन्ही गटांकडून फिर्यादी दाखल झाल्या नव्हत्या. आष्ट्याचे सहायक पोलिस फौजदार विरुपाक्ष कुंभार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सरपंच धैर्यशील ऊर्फ मयूर रमेश पाटील, उपसरपंच निवास बाबूराव पाटील यांच्यासह दोन्ही गटांच्या तीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आज २१ जणांना अटक केली. पोलिसांत आर. के. पाटील गटाच्या धैर्यशील ऊर्फ मयूर रमेश पाटील, निवास बाबूराव  पाटील, जयेंद्र बाबूराव पाटील, विठ्ठल नंदकुमार गावडे, शिवाजी गोविंद गावडे, संदीप शंकर गावडे, महेश  नारायण पाटील, सुनील रामचंद्र पाटील, गंगाराम अभिजित शंकर पाटील, संग्राम अशोक पाटील, संग्राम शामराव पाटील, हृषीकेश सुभाष पाटील, गणेश अशोक पाटील, योगेश अशोक पाटील, राजदीप रामचंद्र पाटील, राजवर्धन रमेश पाटील, धनंजय व्यंकटराव पाटील, धनाजी बबन पाटील यांच्यावर तर बी. के. पाटील गटाच्या भरत माणिकराव पाटील, सागर विठ्ठल सिद्ध, वसंत बापू  पाटील, प्रदीप वसंत पाटील, गुलाब आनंदा पाटील,  सचिन बाबासाहेब पाटील, विजय अशोक पाटील, अमोल गणपती पाटील, विक्रम सर्जेराव पाटील, मोहन ज्ञानू पाटील, प्रमोद पोपट पाटील, संग्राम विलास पाटील, डॉल्बी मालक प्रशांत संभाजी उगले यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली व मिळालेली माहिती अशी, की कोरेगाव (ता. वाळवा) येथे माजी आमदार विलासराव शिंदे गटाचे दिवंगत आर. के. पाटील व आमदार जयंत पाटील गटाचे बी. के. पाटील गटात राजकीय संघर्ष आहे. मागील महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची झाली. दिवंगत आर. के. पाटील गटाने सरपंचपदासह  आठ- सहा फरकाने सत्ता मिळवली. मतदान व निकालादरम्यान दोन्ही गटात किरकोळ वादावादी,  मारामारी झाली होती. मयूर पाटील यांची थेट सरपंचपदी निवड झाली. बुधवारी उपसरपंच निवडीचा कार्यक्रम  होता. आर. के. पाटील गटाच्या निवास बाबूराव पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाली. निवडीनंतर या गटाच्या समर्थकांनी डॉल्बी लावून मिरवणूक काढली. पोलिसांनी त्यांना लेखी नोटीस दिली. डॉल्बीचा वापर करू नका, असे सूचित केले. मिरवणूक कोरेगाव बसस्थानकाजवळील मारुती मंदिराजवळ आली असता  बी. के. पाटील गटातील वसंत बापू पाटील यांचे संपत पान शॉपमध्ये गुलाल टाकला.

यावरून वसंत पाटील  यांनी त्यांच्या गटाच्या प्रदीप पाटील, गुलाब पाटील,  सचिन पाटील, विजय पाटील, अमोल मगदूम, विक्रम पाटील, मोहन मगदूम, प्रमोद पाटील, संग्राम पाटील यांच्यासह तीस-चाळीस जणांना बोलावून घेतले. मिरवणुकीत पानशॉपमध्ये गुलाल टाकण्यावरून एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली. वादावादी, आरडाओरड, दंगामस्ती करून एकमेकांना काठ्यांनी मारहाण सुरू झाली. दोन्ही दिशेने दगड व कोल्ड्रींक्‍सच्या बाटल्या भिरकावण्यात आल्या. दोन्ही गटात राडा झाला.

जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोसायटी, खासगी इमारती, दुकानांवरही दगडफेक करून इमारतींचे नुकसान करण्यात आले. कार्यकर्त्यांनी स्टॅंड चौकातील दुकाने बंद करून सार्वजनिकरीत्या दहशत निर्माण केली. धैर्यशील ऊर्फ मयूर पाटील यांचे तसेच इतर डिजिटल बॅनर फाडून टाकले. घटनेने गावात तणाव निर्माण झाला. 

दिवसभर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. आष्टा पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या लोकांनी गर्दी केली. एकमेकांची नावे घालण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात होता. तालुक्‍यातील नेते पोलिस ठाण्याबाहेर थांबून होते. पोलिसांनी दोन्ही गटांच्या २१ जणांना अटक केली. या मारामारीत अमोल जगन्नाथ लोंढे या नागरिकासह दोन्ही गटांचे अनेकजण जखमी झाले. मात्र पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून फिर्यादी दाखल होत नव्हत्या. पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक सावंत, अवधूत भाट, संजय सनदी, अरुण पाटील, सुधीर पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Sangli News tense in Koregaon