सांगलीत नाटकाला खतरा... प्रयोग अवघे सतरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

सांगली - नाट्यकलेची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाट्यपंढरीत नाटकासाठी धोक्‍याची घंटा वाजते आहे. ‘बजेट’चं कारण देऊन व्यावसायिक नाटकांनी सांगलीकडे पाठ फिरवली असून ‘महागडी’ नाटकं पाहायला प्रेक्षक मिळत नाहीत, या कारणास्तव संयोजकांनीही नाद सोडून दिला आहे.

सांगली - नाट्यकलेची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाट्यपंढरीत नाटकासाठी धोक्‍याची घंटा वाजते आहे. ‘बजेट’चं कारण देऊन व्यावसायिक नाटकांनी सांगलीकडे पाठ फिरवली असून ‘महागडी’ नाटकं पाहायला प्रेक्षक मिळत नाहीत, या कारणास्तव संयोजकांनीही नाद सोडून दिला आहे.

परिणामी, विष्णुदास भावे नाट्यमंदिर या जिल्ह्यात नाटक होणाऱ्या एकमेव थिएटरमध्ये गेल्या वर्षभरात व्यावसायिक नाटकाचे अवघे सतरा प्रयोग झाले आहेत. एकेकाळी तब्बल १२० व्यावसायिक कार्यक्रमांची  बरसात अनुभवणारा रंगमंच नाट्यदुष्काळ अनुभवतोय. 

नाट्यकलेतील देशातील सर्वांत मोठी संस्था नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्लीचा अभिजात नाट्य महोत्सव इथे सुरू आहे. त्यात देशातील नामांकित पाच नाटके होताहेत. पैकी चार नाटकांना निम्मे प्रेक्षागृह भरले नव्हते. उद्‌घाटन सोहळ्यात संस्थेचे संचालक वामन केंद्रे यांनी ‘रिकाम्या खुर्च्या पाहून मला चीड येते’, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. नाटकाकडे लोक का वळत नाहीत, या प्रश्‍नाचे उत्तर शोधताना या क्षेत्रातील मान्यवरांनी ‘सकाळ’कडे अतिशय महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. त्यातूनच यंदा अवघी सतरा व्यावसायिक  नाटकं होणं, हा आकडाच पुरेसा असल्याचा मुद्दा पुढे आला. यामध्ये ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘यू-टर्न’, ‘आई रिटायर होतेय’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘हे राम नथुराम’ अशा नाटकांसह दीपक देशपांडे यांचा ‘हास्यसम्राट’ हा व्यावसायिक विनोदी कार्यक्रम झाला. त्याचे ‘कलेक्‍शन’ अजिबात समाधानकारक नव्हते, असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. 

नाट्य परिषद सांगली शाखेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत ज्येष्ठ नाट्य कलाकार शरद पोंक्षे, डॉ. गिरीश ओक अशांशी चर्चा केली. नाटकाचे बजेट कमी करूया, तिकीट दर माफक ठेवू आणि रसिकांची संख्या वाढवू, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. मुंबईत कमी बजेटमध्ये नाटक होते, मग सांगलीत का नाही, असाही प्रश्‍न उपस्थित केला गेला. त्यावर ‘बजेट’ हे सार्वत्रिक व अडचणीचे उत्तर मिळतेय. मुंबई आणि पुणे सोडले की खर्च आणि सोबत बजेट वाढते, असा युक्तिवाद किंवा व्यावसायिक गणितच मांडले जाते.

अर्थात, त्या मुद्द्याला प्रत्युत्तर म्हणून ‘सुनेच्या राशीला सासू’ हे स्थानिक पातळीवर अन्य तांत्रिक बाबी सोपवून कमी ‘बजेट’मध्ये होणारे नाटक यशस्वी ठरल्याचा मुद्दाही चर्चेत आणला गेला. परंतु, त्यातून फारकाही साध्य होताना दिसत नाही. सध्याचे तिकीट दर ५००, ४००, ३००, २०० असे आहे. त्या तुलनेत इथले नाट्यगृह ना वातानुकूलित आहे, ना कोचच्या खुर्च्या आहेत. ५०० रुपये मोजून लोखंडी खुर्चीवर कोण बसणार, असा मुद्दा रसिकांच्या बाजूने मांडला जातो. एकूणच या ‘सतरा-खतरा’ प्रश्‍नाच्या दोन्ही बाजूंनी गुंता झाल्याचे समोर येते.

नाटक ‘स्वस्त’ झाले तरच... - डॉ. नाईक
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दयानंद नाईक यांनी नाटकाचे तिकीट स्वस्त करून रसिकसंख्या वाढवणे, हाच महत्त्वाचा उपाय केला पाहिजे, असे मत ‘सकाळ’शी बोलताना  व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘नाटकाचे दर जास्त आहेत. महत्त्वाचे कलाकार टीव्ही मालिकांमध्ये व्यस्त आहेत. ज्यांच्या नावावर तिकीट खिडकी हाऊसफुल्ल व्हावी, असे कलाकार राहिले नाहीत. टीव्हीच्या पडद्याचे ग्लॅमर इकडे वापरायला कुणी तयार नाही. वाहतूक खर्चही वाढलाय आणि सलग दहा-बारा दिवसांचा दौरा करून बजेट आटोक्‍यात आणावे तर तेवढी सवड नाही, असे अनेक प्रश्‍न नाटकाभोवती वेढा टाकून बसलेत. नाटक स्वस्त होईल यासाठी खास प्रयत्न केले तरच पुन्हा चांगले दिवस येतील, अशी आशा करूया.’’

Web Title: Sangli News theater business in danger