सांगली जिल्ह्यातील नाट्यगृहांचा आढावा

सांगली जिल्ह्यातील नाट्यगृहांचा आढावा

तासगावात नाट्यगृहच नाही; ना खंत- ना खेद!

तासगाव शहराचे सांस्कृतिक भवन म्हणजे नाट्यगृह. असून अडचण आणि नसून खोळंबा असा हा प्रकार. ‘नाटक न होणारे नाट्यगृह’ अशी त्याची ओळख. इथे सुमारे दोन दशकांपूर्वी नाटक झाले असावे. आता ते पाडून नवे बांधा असा साऱ्यांचा हेका. मात्र नाट्यगृह म्हणून एक गोदाम का बांधले याबद्दल कोणालाही खंत वाटत नाही. या नाट्यगृहाची वर्षातून एखाद्या सरकारी कार्यक्रमापुरती झाडलोट होते. राजकारण्यांना फक्त ओरडायचे असतल्याने इथे कितीही आवाज घुमला तरी तो त्यांना चालवतो. स्टेजवरचे ऐकूच येत नाही. नाही आले तरी चालते. पहिल्यांदा चार-पाच नाट्यप्रयोग झाले.  त्यानंतर आता योग पुन्हा आला नाही. आता हे नाट्यगृह शहरवासीयांच्या चेष्टेचा विषय झाले आहे. कधी काळी लग्न समारंभ, व्याख्यानमाला असे काही इथे व्हायचे, तेही आता बंद झाले आहे. आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणांसाठी किंवा पालिकेच्या एखाद दुसऱ्या कार्यक्रमासाठी ते उघडले जाते.

आता छताला गळती लागली आहे. छताच्या सिलिंगचे तुकडे जागोजागी पडलेले असतात. त्यामुळे छताचे पत्रे बदलून, किरकोळ दुरुस्त्या, रंगरंगोटी झाली. मात्र सुधारणांसाठीचा प्रशासकीय स्तरावर विचार झाला, मात्र  दुरुस्तीचा खर्च नव्या इमारतीइतका होत असल्याचा शोध प्रशासनाला लागला. मध्यंतरी एक तज्ज्ञांने (?) नाट्यगृहात घुमणारा आवाज बंद करण्यासाठी भिंतींना छिद्रे पाडण्याचे डोके लढवले. मात्र त्यांची बुद्धी वाया गेली. आता कधीमध्ये इमारत पाडून इथे दुकानगाळे बांधूयात असे एखाद्या कारभाऱ्यांच्या मनी येते. त्यांची गणिते लढवली जातात. गावात नाट्यगृह असावे असे कुणाला वाटतच नाही. त्यामुळे पालिकेच्या कारभाऱ्यांना शॉपिंग सेंटरमध्येच अधिक रस वाटतो.

कधी काळी तासगाव तालुक्‍यात देशातील पहिल्या काही सर्कशीमधील एक सर्कस होती. तालुक्‍यातील अनेक तमाशा कलावंतांनी अवघा महाराष्ट्र गाजवला. इथल्या राजकीय नेत्यांनी फर्ड्या वक्तृत्वाने महाराष्ट्र गाजवला. तिथे एखादे ऐकू येईल. स्वच्छ असेल असे नाट्यगृह असू नये, याची ना कुणाला खंत, ना कुणाला खेद.

नाट्यगृहाबाबत नाट्यपंढरीची अवस्था करंटी
मास्टर दीनानाथ यांच्या नावे सांगली, मिरज, कुपवाड  शहर महापालिकेचं नाट्यगृह आहे. सुरेश पाटील यांच्या महापौरपदाच्या काळात सतरा वर्षांपूर्वी कोटींचा खर्च झाला, मात्र ते नाट्यगृह कधीच नाटकांसाठी वापरात आले नाही. आज ते केवळ सभागृह म्हणून वापरात आहे. अस्वच्छ परिसराचा वापर महापालिकेने भंगार टाकण्याची जागा म्हणून केला आहे. सभोवती गवत उगवले आहे. या नाट्यगृहाची साफसफाईदेखील पालिकेला जड झाली आहे. या जागेवर नाट्यगृह बांधण्यापेक्षा इथे शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उठवले तर अधिक कमाई होईल, हा पालिकेतील कारभाऱ्यांचा बेत झाकून राहिलेला नाही.

महापालिकेच्या वतीने नाट्यगृह बांधायचेच झाल्यास ते कोठे असावे यावरच आता पुनर्विचार करण्याची गरज आहे. शहर विस्तारते आहे. विश्रामबाग शहराचा मध्यवर्ती भाग झाला आहे. त्या परिसराची गरज विचारात घेऊन विश्रामबागला सुसज्ज नाट्यगृह झाले पाहिजे. विष्णुदास भावे यांच्या नावाने असलेल्या भावे नाट्यमंदिराचा नाट्यगृह म्हणून सर्वच कलावंतांचा  अनुभव चांगला आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या प्रशस्त जागेचा उपयोग पार्किंग म्हणून होत आहे. नाट्यगृहाच्या परिसराच्या विकासासाठी संस्थाचालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. इथे कलावंतांसाठी निवासाची व्यवस्था, नाट्यविषयक उपक्रम कार्यशाळांसाठी छोटेस सभागृह असावे. सांगलीच्या नाट्यपरंपरेचा परिचय करून देणारे कलादालन असावे. खरे तर ही सांगलीच्या नाट्य चळवळीची मातृसंस्था आहे. शहरात किमान दोन-अडीचशे हौशी नाट्यकर्मी आहेत. त्यांच्याशी या संस्थेने स्वतःला जोडून घेतले पाहिजे. त्यासाठी संस्थाचालकांनी स्वतःच घालून घेतलेल्या मर्यादा ओलांडल्या पाहिजेत. नाट्यगृहात वातानुकूलित व्यवस्थेची मागणीही जुनीच आहे.

कुणी नाटकाला जागा देता का जागा?

विट्यात खुल्या नाट्यगृहात १९७५ पासून १९८२ पर्यंत मोहन वाघ, बाळ कोल्हटकर, निळू फुले, मधुकर तोरडमल, काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर आदी मातब्बरांची गाजलेली नाटके झाली. सुविधांअभावी त्यावेळीही नाटकांसाठीचे सर्व साहित्य ठेकेदारांना सांगलीतून आणावे लागे. खर्च-उत्पन्नाचा मेळ बसविताना नाकीनऊ येत. पुढे हळू हळू नाटकांना ओसरती कळा आली आणि आता विट्यात नाट्यप्रयोगच बंद झाले. 
सांस्कृतिक परंपरा रुजलेल्या विट्यात आजघडीला सुसज्ज नाट्यगृह नाही. जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात, ते शहरातील मंगल कार्यालयांमध्येच.  नाट्यरसिक-कलावंताची नाट्यगृहाची मागणी आहे, मात्र जागा नाही असा पालिका अधिकारी-पदाधिकाऱ्यांचा ‘नन्ना’चा पाढा असतो. 

सुवर्णनगरी असं बिरूद मिरवायचं आणि एखादं साधं सुटसुटीत नाट्यगृह नसावं. कलेची ऊर्मी आहे, मात्र त्याला प्रोत्साहन देणारी व्यवस्था नसावी अशी शहराची स्थिती आहे. गुणवंत कलावंतांचा कोंडमारा होत आहे. शहरात आज शिवप्रताप नाट्यसंस्था, रंगश्री, कला अकादमी, मी फिनिक्‍स ॲकॅडमी अशा नाट्य सांस्कृतिक संस्था कार्यरत आहेत. ‘रंगश्री’ संस्थेने ‘आपोआप झाले बाप’ या विनोदी नाटकाची व्यावसायिक निर्मिती केली. योगेश महाडिक, रमेश जाधव व संदीप शितोळे यांच्यासह हौशी कलाकार सोबत होते. योगेश महाडिक, प्रियांका देशमुखे, नमना कुलकर्णी, पराश शहा, संदीप डांगे, डॉ. विनायक महाडिक, अवधूत फलटणकर, हर्षा कुरणे यांनी भूमिका केल्या आहेत. या कलावंतांनी राज्यभरातील अनेक शहरांमध्ये नाट्यप्रयोग केले, मात्र मायभूमीत त्यांचे फारसे कौतुक झाले नाही. प्रतापशेठ साळुंखे यांनी चित्रपट निर्मितीसाठीही हौशी कलावंतांना प्रोत्साहन दिले.  ‘सडा हळदी-कुंकवाचा’, ‘सासूची माया’, ‘टुरिंग टॉकीज’, ‘तिफन’, ‘वंचित’ अशा काही चित्रपटांचे विटा परिसरात चित्रीकरण झाले. भारत पवार, धर्मेंद्र यादव, महेश बनसोडे, अमृता शेंडे, संदीप शितोळे, सचिन गवळी, प्रमोद क्षीरसागर, तौसिफ शेख, परेश शहा या हौशी कलावंतांना अनेक चित्रपटांमध्ये अलीकडे संधी मिळाली.  ‘सुसज्ज नाट्यगृह उभारू’ असे आश्‍वासन आजवरच्या सर्व पालिका निवडणुकांच्या जाहिरनाम्यांचे ध्रुवपद आहे. ते आणखी किती वर्षे राहील माहीत नाही.

कडेगाव नगरपंचायतीने नाट्यगृहाचा संकल्प करावा  

कडेगाव स्वतंत्र तालुका झाला. गावच्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. गाव बदलतेय. तालुक्‍याचे ठिकाण म्हणून होणाऱ्या या बदलाला दिशा द्यायचा प्रयत्न कारभाऱ्यांकडून व्हायला हवा. या बदलात एखादे सुसज्ज नाट्यगृह ही गरज असेल. नाट्यगृह त्यांपैकीच एक. तालुक्‍यात सांस्कृतिक,  साहित्यिक क्षेत्रातील धडपड्यांची संख्याही मोठी आहे, मात्र कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही. नाट्यगृहाच्‍या मागणीचा अजून कोणीही पाठपुरावा केलेला नाही. नाट्यगृह नसल्याने सध्या नाट्य, सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम मंगल कार्यालये किंवा मोकळ्या मैदानातच पार पडतात.

पूर्वी गावोगाव यात्रेनिमित्त गावातीलच कलावंत नाटक करायचे. पांडुरंग डांगे, इकबाल तांबोळी, नबीलाल अत्तार, माणिकराव देशमुख, श्रीकांत पवार, अनंतराव कुलकर्णी, दत्तात्रय पवार, महेश भुते, सुरेश सकट आदी कलावंतांनी आपल्या परीने नाट्यसेवा केली, मात्र काळाच्या ओघात गावोगावची नाटक मंडळे अस्तंगत झाली. अनेक कलावंत आता नाट्यक्षेत्रात धडपडत आहेत. त्यांना संयुक्त असे व्यासपीठ नाही. योगेश महाडिक या कलावंताने ‘पडले स्वप्नात रे’ या नाटकाचे व्यावसायिक स्तरावर सहा प्रयोग केले. वैभव धर्मे या कलाकाराने पुढाकार घेऊन ‘गणा रे गणा’ या नाटकाचे दहा व्यावसायिक प्रयोग केले आहेत. अशा अनेक कलावंतांना कौतुकाची थाप हवी आहे. एकांकिकांचे प्रयोग होत असतात. त्यांना हक्काचे नाट्यगृह हवे आहे. नाट्यगृहाच्या जागेचाही प्रश्‍न आधी सोडवला पाहिजे. शहर विकास आराखडा बनवताना त्यात नाट्यगृहाचा विचार व्हावा.

 चुका निस्तरा; नाट्यचळवळीचे केंद्र व्हावे !

सुमारे सात वर्षांपूर्वी साडेतीन-चार कोटींचा खर्च करून इस्लामपुरात नाट्यगृह झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा झाली. वस्तुतः इतका खर्च करताना हे नाट्यगृह व्हावे. सांस्कृतिक सभागृह नव्हे याची दक्षता मात्र घेतली नाही. अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते, राजेश खन्ना, हेमामालिनी यांच्यासारखे दिग्गज कलावंत उद्‌घाटनाला आले, मात्र अल्पावधीतच या नाट्यगृहाची कलावंतांमध्ये अपकीर्ती झाली. इथल्या ध्वनिव्यवस्थेबद्दल सर्वांत मोठी तक्रार आहे. व्यासपीठाची लांबी-रुंदीबाबतही आक्षेप आहेत. खरे तर एखाद्या नाट्यगृहाच्या याच मूलभूत गरजा. केवळ एखादी इमारत उभारणीच्यापलीकडे जाऊन या वास्तूकडे पाहायचा दृष्टिकोन राजकारण्यांमध्ये नसल्यानेच आज एवढा खर्च करूनही  इथे प्रयोग करण्यास नाट्यकलावंत राजी नसतात.

हौशी संस्था-मंडळांच्या काही कार्यक्रमांना नाट्य-चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी, गिरीश ओक, संदेश कुलकर्णी, सुबोध भावे, मिलिंद नार्वेकर, भाऊ कदम, निर्मिती  सावंत, उपेंद्र लिमये अशा मंडळींनी इथे हजेरी लावली. मात्र त्यांनी आपल्या तक्रारीही संयोजकांकडे नोंदवल्या. सध्या नाट्यगृहातून वर्षाकाठी सरासरी तीनएक लाख मिळतात. ते देखभाल खर्चालाही पुरत नाहीत. नाट्यगृहाच्या दर्शनी पट्टीवरील गिलाव्याचीही दोन वर्षात पालिकेला डागडुजी करता आली नाही. शहरात राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी, अखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा आणि हर्ष ॲकॅडमी संचालित अर्थ कलामंच, आविष्कार कल्चरल ग्रुप यांचे नियमित कार्यक्रम होत असतात. नाट्यपरिषदेकडून बालनाट्य प्रशिक्षण, कार्यशाळा, लेखन-दिग्दर्शन-तंत्राच्या अनुषंगाने प्रशिक्षक बोलावून मार्गदर्शन केले जाते. गेली १६ वर्षे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होतात. त्यातून सांस्कृतिक क्षेत्रात सतत काही ना काही होत असते. नाट्यगृह अशा घडामोडींचे केंद्र ठरावे असे प्रयत्न मात्र झालेले नाहीत. आजघडीला  राहुल मगदूम, शिवानी घाडगे, राहुल जगताप, हरीश तांदळे, शशिकांत कुलकर्णी, उज्ज्वला कदम, उदयश्री परदेशी, वैशाली जौंजाळ, सत्याप्पा मोरे असे काही चेहरे चमकत आहेत. त्यांना प्रोत्साहन हवे.

पैसा वरपलात; थोडी देखभाल तरी ठेवा

मिरजेत जिथे नटश्रेष्ठ बालगंधर्वांनी रंगभूमीवर पाऊल टाकले, तिथे महापालिकेने सुमारे पावणेसात कोटींवर खर्च करून नाट्यगृह उभे केले. साडेतीन कोटींवरून सुरू झालेला हा खर्च कारभाऱ्यांनी कसा वाढवत नेला याबद्दल आजवर अनेकदा पंचनामा झाला आहे. अवाढव्य खर्च होऊनही आजही हे नाट्यगृह परिपूर्ण झाले असे मात्र म्हणता येत नाही. मध्यंतरी तालुका दंडाधिकाऱ्यांनी नाट्यगृहात योग्य सुरक्षा सुविधा नसल्याने नाट्यगृह तीन महिने बंद ठेवले. हे प्रकरण न्यायालयातही गेले. या दोन्ही ठिकाणी त्रुटी दूर करू असे लिहून दिले. तांत्रिक आणि सुरक्षाविषयक त्रुटी दूर करणे दूरच, पण मूलभूत सुविधाही सध्या नाहीत. नाट्यगृहाला अग्निशमनयंत्रणेसाठी आवश्‍यक ती व्यवस्था करता आलेली नाही.

नाट्यगृहाची स्वच्छता, सुरक्षाव्यवस्था याबाबत पालिकेला गांभीर्य नाही. गेल्या अडीच वर्षांपासून साऊंड ऑपरेटर, इलेक्‍ट्रीशिअनच्या जागा रिक्त आहेत. सध्या या नाट्यगृहाचे भाडे तीन तासांच्या कार्यक्रमासाठी ४ हजार रुपये आहे. लाईट बिलासाठी दोन हजार रुपये स्वतंत्रपणे आकारले जातात या सर्वांवर १८ टक्‍क्‍यांचा जीएसटी कर पाहता हौशी नाट्यसंस्थांना हे शुल्क भागवणे आव्हानच असते. सध्या या नाट्यगृहाचा प्रामुख्याने वापर सध्या केवळ धार्मिक कार्यक्रमांसह, खासगी कंपन्यांचे  सेमीनार, शाळा महाविद्यालये, खासगी क्‍लासच्या स्नेह संमेलनासाठीच वापर होतो. 

बालगंधर्व नाट्यगृहाच्या रूपाने शहरासाठी एक  सांस्कृतिक चळवळीचे केंद्र तयार झाले. ही वास्तू पालिकेची नव्हे तर शहरातील विविध सांस्कृतिक  संस्थांची असायला हवी. त्यासाठी कलावंतांच्या सहभागाची स्थानिक व्यवस्थापन समिती स्थापन केली पाहिजे. नाट्यगृहाबाबतचे सर्व निर्णय या समितीच्या नियंत्रणाखालीच झाले पाहिजेत. नाट्यगृह शहराची सांस्कृतिक गरज आहे. त्यामुळे तिथून उत्पन्न किती मिळते यापेक्षा या वास्तूची नियमित  स्वच्छता देखभाल व्हावी याकडे लक्ष दिले पाहिजे. गाढवे चौकातील खुले नाट्यगृहाबद्दल न बोललेच बरे.  या जागेचा वापरच होत नाही. लाखो रुपयांचा खर्च वाया गेला. विठ्ठल पाटील यांनी व्हिक्‍टर फ्रेटस्‌ यांच्या आमदार निधीतून हे काम केले. आज हे खुले नाट्यगृह नेमके ताब्यात कोणाच्या हेच पालिकेलाही माहीत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com