नाट्य-सांस्कृतिक चळवळीला नेतृत्व हवे !

टीम सांगली सकाळ बातमीदार
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

गावपण सरत आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून नव नव्या विकासाच्या संकल्पनांवर चर्चा होत आहे अशा वेळी नाट्यगृह ही शहराची सांस्कृतिक गरज असल्याचे ध्यानात घेतले पाहिजे.

नाट्यगृह ही शिराळा शहराची गरज

नागपंचमीचा उत्सव म्हणजे सांस्कृतिक उत्सव असंच काहीसा पक्का समज शिराळ्यात झाला आहे. इथे नाटक रुजवण्यासाठी बालनाट्य चळवळीपासून सुरवात करण्याची गरज आहे. स्थानिक शाळा महाविद्यालयांमध्ये त्यासाठी वातावरण निर्मितीची गरज आहे. त्याबरोबरच नाट्यगृह ही या शहराची गरज आहे. गावपण सरत आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून नव नव्या विकासाच्या संकल्पनांवर चर्चा होत आहे अशा वेळी नाट्यगृह ही शहराची सांस्कृतिक गरज असल्याचे ध्यानात घेतले पाहिजे.

सध्या नागपंचमीशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम कोणते अशी विचारणा केली तर हाताच्या बोटावर इतकेच उपक्रम सांगता येतील. प्रचिती  सांस्कृतिक मंचने ग्रामिण संस्कृतीचा भाग असलेल्या गौरी-गणपतीच्या गाण्यांची जपणूकीचा उपक्रम हाती घेतला होता. गणपती उत्सव काळात शिराळा, शेडगेवाडी येथे जागर मंगळा-गौरीचा नावाने  कार्यक्रम होतात. एरवीच्या शेती कामातून सवड काढून महिला मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होतात. या मंच ने किर्तन, भजन, भारूडाचे कार्यक्रमही घेतले खरे तर परंपरेने अशा अनेक लोककला आजवर खेडोपाड्यात चालत आल्या आहेत. मात्र त्यांना एका सूत्रात बांधणारी चळवळ मात्र तालुक्‍यात नाही. त्यासाठीची मध्यवर्ती जबाबदारी घेऊ शकेल अशी संस्था नाही. ही चळवळ रुजण्यासाठी सुसज्ज नाट्यगृहाची शहराला गरज आहे. 

निसर्गसौंदर्याने नटलेल्या शिराळा तालुक्‍यात अनेक चित्रपटांचे चित्रिकरणही अलीकडे होताना दिसते. काही स्थानिक कलावंत नव्या माध्यमांच्या मदतीने लघु चित्रपट, मालिकांशी स्वतःला जोडून घेत आहेत. चित्रपट क्षेत्राशी ते जोडले आहेत. गेल्या काही वर्षात शिराळ्यातील विविध चमूनी सहा लघुपटाचीही निर्मिती केली आहे. त्यातले दोन लघुपटांना जिल्हा  परिषदेची पारितोषिके मिळाली. महाविद्यालयीन तरुण पथनाट्ये करतात. या  साऱ्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ देणारे कला क्षेत्रातील नेतृत्व नाही. नाट्यगृह नाही. 

अर्ध्यावरती डाव मोडला नाट्यगृहाचा..

दुष्काळी कवठेमहांकाळ तालुक्‍यात नाट्यगृह होणार याचा कोण आनंद व्यक्त झाला, मात्र आता त्याचा आनंद पार विरून गेला आहे. निधीअभावी ते आता रखडले आहे. या मातीने महाराष्ट्राला मोठमोठे लोककलावंत दिले. शाहीर दिले. हा वारसा पुढे नेण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी हक्काचे केंद्र असावे ही रास्त भावना. शहराच्या मध्यवर्ती जागा मिळाली मात्र आता ते कधी होईल हे कोणीही सांगू शकत नाही. वाघोली, शेळकेवाडी, रायवाडी, आगळगाव, कुची, जाखापूर, हिंगणगाव, मळणगाव, तिंसगी, कोकळे, कुंडलापूर, शिंदेवाडी या साऱ्या गावांमध्ये अनेक मंडळे आजही कार्यरत आहेत.

सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक विषयांवरील संहिता लिहून ही मंडळी पदरमोड करून नाटक करीत असतात. कोकळेसारख्या गावांत लोकसेवा कला नाट्य मंडळाच्या माध्यमातून सिकंदर शेख, सहकारी आजही तुटपुंज्या साधनसामग्रीवर नाटकाचा किल्ला लढवत आहेत. तमाशा कलावंत नामदेव इरळीकर, दत्तोबा तिंसगीकर, शिरढोणचे अंतबर सोंदाडै, लोकनाट्य तमाशा मंडळ, आप्पासाहेब पाटील, वाय. के. माळी, नाटककार एकनाथ जगताप आणि शाहीर बाळासाहेब जगताप (बनेवाडी), लोकशाहीर राजा पाटील (कवठेमहाकांळ) ही सारी मंडळी आपल्या परीने आजही योगदान देत आहेत.  अनेकांच्या प्रयत्नातून २००४-०५ मध्ये ग्रामपंचायतीने ४५ लाख रुपये खर्चाचे बजेट मांडून नाट्यगृहाच्या कामाला सुरवात केली. आत्तापर्यंत १८ लाख खर्च झाले आणि काम अर्धवट पडले.

आता ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. शासनाकडून निधी मिळणार असेही सारे म्हणत असतात. आता या नाट्यगृहाच बजेट १.३३ कोटींवर गेले आहे. खर्च किती होतो यापेक्षा तो योग्य कारणी लागतो हे अधिक महत्वाचे. नव्याने काम सुरु करताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. मुळ आराखड्यात आवश्‍यक त्या सुधारणा कराव्यात. अन्यथा कोटींचा खर्च करूनही पुन्हा नाट्यगृहाचे गोदाम होऊ नये अशी माफक अपेक्षा.  

Web Title: Sangli News Theater day special