फायनान्स कंपनी फोडून आष्ट्यात ८ लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

आष्टा - चोरट्यांनी येथील फुलर्टन इंडिया  क्रेडिट कंपनी (ग्रामशक्ती) या फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून लॉकरसह एकूण ८ लाख ५६ हजार ७९६ रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यात रोख ८ लाख ६ हजार ७९६ रुपयांची रोकड आहे. सिसको कंपनीचे राऊटर स्वीचही चोरून नेला.

लॉकरसह रोकड लंपास; श्‍वान पथक घुटमळले

आष्टा -चोरट्यांनी येथील फुलर्टन इंडिया  क्रेडिट कंपनी (ग्रामशक्ती) या फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून लॉकरसह एकूण ८ लाख ५६ हजार ७९६ रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यात रोख ८ लाख ६ हजार ७९६ रुपयांची रोकड आहे. सिसको कंपनीचे राऊटर स्वीचही चोरून नेला. या  प्रकरणी व्यवस्थापक संदीप भगवानराव गायकवाड (मूळ गाव हुस्सा ता. नायगाव, जि. नांदेड, सध्या रा. आष्टा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

चेन्नई येथील फुलर्टन कंपनीची आष्टा व शिराळा येथे शाखा आहे. कंपनी ३० किलोमीटरमधील नागरिकांनी वाहन, गृह कर्ज, महिला बचत गटांना अर्थसहाय्य अशी कर्ज वाटप करते. आष्टा शाखेतून सुमारे १४ ते १५ कोटींचे वाटप आहे. २० कर्मचारी काम करतात. १ ते १५ सप्टेंबर दरम्यान  वसुली सुरू असल्याने शाखेत मोठा वसूल होत आहे. दुसऱ्या दिवशी तो इस्लामपूर येथील बॅंकेत भरला जातो. शनिवारी (ता.९) रात्री आठपर्यंत शाखेत ८ लाख  ६ हजार ७९६ रुपये जमा झाले. यामध्ये दोन हजाराच्या  ९० नोटा, ५०० रुपयांच्या ५४९ नोटा, १०० रुपयांच्या ३४१७ नोटा, ५० रुपयांच्या ९६२ नोटा, २० रुपयांच्या ५५८ नोटा, १० रुपयांच्या १८४५ नोटा व ३२३६ नाणी, ५ रुपयांचे १०५ तर १ रुपयाचे एक नाणे अशी रक्कम होती. २ लाख ५० हजार रुपये किमतीचे राऊटर स्वीचही होता. रात्री दहा वाजता लॉकर व शाखा बंद केली.

रविवारी दिवसभर व्यवस्थापक व कर्मचारी शाखेच्या वरील खोल्यात चर्चा करीत होते. रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी  शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुसऱ्या खोलीतील प्लायवूडच्या दरवाजाचे कुलूप तोडून कॅशिअर केबिनची कडी कोयंडा, कुलूप उचकटले. केबिनमध्ये प्रवेश केला. तिजोरीतील लॉकरसह त्यातील रक्‍कम लंपास केली. सोमवारी सकाळी कर्मचारी कामावर आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. शटर अर्धे उघडलेले होते. कट्टयावर पोती व प्लास्टिकच्या पट्टया पडल्या होत्या. आतील कुलपे खुर्च्यांवर पडली होती. 

सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, अरुण पाटील पथकासह दाखल झाले. नागरिकांनी मोठी गर्दी केली  होती. श्‍वानपथक मागवले. ते तेथेच घुटमळले. दिवसभर पोलिसाकडून कंपनी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती. दरम्यान, बसस्थानकाशेजारील भरवस्तीत इतका मोठा प्रकार घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण होते.

३०० किलोच्या लॉकरसह चोरी 
चोरीस गेलेले लॉकर आत बसवण्यासाठी १० जणांच्या बळाचा वापर करावा लागल्याचे व्यवस्थापकांनी  सांगितले. तोच लॉकर रोख रकमेसह चोरट्यांनी पळवले आहे. लॉकर फरशीवरून ओढण्यासाठी पोती व पट्ट्यांचा वापर झाला असावा, असे तेथील पोत्यावरून दिसते. शिवाय भरवस्तीतल्या ठिकाणी कोणत्या तरी चारचाकी मोठ्या वाहनातून ते नेले असावे. एवढ्या मोठ्या चोरीत किती जणांचा समावेश असावा, अशा अनेक प्रश्‍नांनी पोलिस व नागरिक चक्रावले होते. या धाडसी चोरीची शहरभर चर्चा होती.

Web Title: Sangli News theft in aashta finance company