आजोबानं बोट सोडलं..., पोरगं लढलं

अजित झळके
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

त्याला ‘साहेब’ व्हायचंय... त्यासाठी त्याची नवी लढाई सुरू झालीय... त्याला शून्याची भीती वाटत नाही, कारण शून्यच होता, पुन्हा शून्य व्हायला काय घाबरायचं, हे साधं सरळ लॉजिक. खातवळ (ता. खटाव, जि. सातारा) या मूळ गावच्या योगेश पुस्तके या लढवय्या पोराची  कथा मोठी प्रेरणादायी आहे.

सांगली -  सन २००५ ची गोष्ट... पुष्पराज चौकातील दादूकाका भिडे बालसुधारगृहात एका वयस्कर आजोबानं पाय ठेवला... सोबतीला दहा वर्षांचा नातू होता... लेकीचा पोरगा... योगेश... त्याचं आई-बाप अकाली गेलं... पोरगं अनाथ, या वयस्कर बिचाऱ्याच्या जगण्याची लढाई, त्यात चिमुरड्याला कुठं सांभाळायचं म्हणून काळजावर दगड ठेवून त्यानं त्याला  इथं सोडलं... 
आजोबानं बोट सोडलं, त्याची पाठ फिरली... पण, पोरगं मोठ्या हिंमतीनं लढलं... आडनाव पुस्तके... पुस्तकात रमून गेलं... इंजिनिअर झालं... बी.ई.मेकॅनिकलची पदवी घेतली... पण तो थांबला नाही, त्यानं नवी वाट धरली... त्याला ‘साहेब’ व्हायचंय... त्यासाठी त्याची नवी लढाई सुरू झालीय... त्याला शून्याची भीती वाटत नाही, कारण शून्यच होता, पुन्हा शून्य व्हायला काय घाबरायचं, हे साधं सरळ लॉजिक. खातवळ (ता. खटाव, जि. सातारा) या मूळ गावच्या योगेश पुस्तके या लढवय्या पोराची  कथा मोठी प्रेरणादायी आहे.

योगेशच्या आई-वडिलांच्या निधनानंतर तो काही काळ आजोबांसोबत राहिला, तिसरीपर्यंत शिकला. आजोबांची तब्बेल खालवायला लागली. त्यांनी त्याला सांगलीत सोडले. तो न्यू हायस्कूलमध्ये चौथीत दाखल झाला. इथल्या वातावरणात मुले सहजासहजी रुळत नाहीत, मात्र बालवयात त्याला परिस्थितीची पुरती जाण होती. त्यानं जुळवून घेतलंच, शिवाय अभ्यासात झोकून दिले. पुढे चारएक वर्षे आजोबा येत राहिले, त्यांच्या निधनानंतर तो पोरकाच झाला. दहावीत ८४ टक्के गुण घेऊन त्याने पहिला मैलाचा दगड पार केला. शांतिनिकेतनमध्ये त्याने डिप्लोमाला प्रवेश घेतला. तिसऱ्या वर्षाच्या मध्यावर त्याचे वय १८ वर्षे पूर्ण झाले, मात्र इथल्या  व्यवस्थापनाने विशेष बाब म्हणून सहा महिने मुदत वाढवून घेतली. डिप्लोमानंतर त्याने आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेजमध्ये बी.ई.ला प्रवेश घेतला.

बॅंक ऑफ इंडियाचे शैक्षणिक कर्ज घेतले. अधीक्षक पृथ्वीराज पाटील, समिती सचिव सुधीर सिंहासने यांनी महिला, बालकल्याण मंडळाकडे पाठपुरावा करून त्याच्यासाठी ८८ हजार रुपयांचा निधी मिळवला. या लढवय्याला मोठा आधार मिळाला. मिलिंद कुलकर्णी व अन्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुढे काही काळ तो सुधारगृहातच राहिला. 

बी.ई. पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील कंपनीत त्याला अडीच लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी मिळाली, काही काळ ती केली. परंतु, या लढाईत त्याने काही उद्दिष्टे ठरवून घेतली आहेत. त्याला स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी तो कसून तयारी करतोय. त्याने नोकरी सोडली आहे. शिल्लक रकमेत खर्च भागवून झपाटल्यासारखा अभ्यास सुरू आहे. यश-अपयश याची त्याला तमा नाही. कारण हाती शून्य घेऊनच तो जन्माला आला होता, पुन्हा शून्य व्हायची त्याला फिकीर नाही. पण, तो यशस्वी झाल्यावर अशा शून्यातून विश्‍व घडवू पाहण्यासाठी खूपकाही करण्याची त्याची प्रबळ इच्छा  आहे.

आजोबानं बोट सोडलं, पण हे पोरगं हिंमतीनं लढलं. त्याची लढाई यशस्वी होईल, तो शिखर सर  करेल, असा विश्‍वास इथल्या कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

 

Web Title: Sangli News Think Positive Act Positive special story