मानवतेच्या स्पर्शाने त्यांच्या आयुष्यात दिवाळी

शैलेश पेटकर
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सांगली - त्यांच्या जगण्यातलं माणूसपण हरवलं होतं. भटक जनावरं बरं, इतकी बिकट अवस्था घेऊन ते रस्त्याकडेला जगत होते, मरण येत नाही म्हणून. पण ते पुन्हा ‘माणूस’ बनणार आहेत. त्या तिघांचे रत्नागिरी येथील मानसोपचार केंद्रात पुनर्वसन केले जाणार आहे. उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या पुढाकाराने दोन महिला आणि एका पुरुषाच्या आयुष्यात दीपावलीचा दिवा पेटणार आहे. 

सांगली - त्यांच्या जगण्यातलं माणूसपण हरवलं होतं. भटक जनावरं बरं, इतकी बिकट अवस्था घेऊन ते रस्त्याकडेला जगत होते, मरण येत नाही म्हणून. पण ते पुन्हा ‘माणूस’ बनणार आहेत. त्या तिघांचे रत्नागिरी येथील मानसोपचार केंद्रात पुनर्वसन केले जाणार आहे. उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या पुढाकाराने दोन महिला आणि एका पुरुषाच्या आयुष्यात दीपावलीचा दिवा पेटणार आहे. 

त्यांचा पूर्वेतिहास कोणालाच माहीत नाही. कोठून आले, नाव काय? यांची ही अवस्था का झाली? या प्रश्‍नांना उत्तर आणि अर्थही नाही. कारण उत्तर मिळालं तरी त्यांचं आयुष्य बदलेल असं नाही. त्यापेक्षा त्यांना पुन्हा माणसांत आणावं, असा विचार वर्दीतल्या एका अधिकाऱ्याने केला. दिवाळीचा मुहूर्त साधून त्याला मूर्त रूप दिलं जातंय. हीच मोठी गोष्टी आहे. कोठे  दिसतात असे लोक...

सांगली-मिरज रस्त्यावर जिल्हा बॅंकेसमोर दाढी वाढलेला काळेमिट्ट कपडे घातलेला, दिसेल ते खाणारा एकजण साऱ्यांनीच पाहिला. शहरात दिसेल त्या रस्त्याने फिरून मिळेल ते खात होता. असंच जगणाऱ्या पन्नाशीतील दोन महिलाही. ते साऱ्यांना दिसत होते. मात्र ही अवस्था पाहून काही करून पाहणारी माणसं त्यांना भेटली नाहीत. उशिरा का असेना, आता ती भेटलीत. एक आहे इन्साफ फाऊंडेशनचा मुस्तफा. त्याने रस्त्यावर फिरणाऱ्या माणसांसाठी अन्नछत्र सुरू केलंय. मायेने जेवायला घालणाऱ्या मुस्तफाशी सारे मन मोकळे करतात. 

डॉ. काळे याही शहरात गस्त घालताना नेहमी अशा व्यक्ती पाहून सुन्न व्हायच्या. वर्दीत असून आपण त्यांच्यासाठी एक हात पुढे केला पाहिजे, असे वारंवार वाटायचे. त्यांनी मदतीची भावना व्यक्त केली. 

शहरात फिरणाऱ्या दोन महिलांना रत्नागिरीतील रुग्णालयात पाठवले. शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनीही पुढाकार घेतला. आता ते दाढीवाल्यासाठी पुढाकार घेताहेत. दिवाळीत बेघरांनाही केलेली ही मदतच आनंद देणारी आहे, अशी त्यांची भावना आहे. वर्दीतल्या या अधिकाऱ्यांचे कामाचं कौतुक केलंच पाहिजे.

शहरात अनेकदा वृद्ध, महिला वा पुरुष रस्त्याकडेला झोपलेले दिसतात. घर आणि मनाचाही लहान झालेला आकार त्याला कारणीभूत आहे. त्यांना पुन्हा माणूस बनवण्यासाठी समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे. त्याची सुरुवात स्वतःपासून केली. इतरांनीही पुढाकार घ्यावा.
- डॉ. दीपाली काळे, 
उपाधीक्षक, सांगली  

Web Title: Sangli News think positive act positive story