भरधाव मोटार झाडावर आदळून तीन तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

सांगली - मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून घरी परतताना भरधाव मोटार झाडावर आदळून विकी अंकुश चव्हाण (वय 24, यशवंतनगर, सांगली), सम्मेद भारत निल्ले (21, जैन गल्ली, राधानगरी), निनाद राजेंद्र आरवाडे (22, एस.टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली) ठार झाले.

सांगली - मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून घरी परतताना भरधाव मोटार झाडावर आदळून विकी अंकुश चव्हाण (वय 24, यशवंतनगर, सांगली), सम्मेद भारत निल्ले (21, जैन गल्ली, राधानगरी), निनाद राजेंद्र आरवाडे (22, एस.टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली) ठार झाले.

मोटार चालवणारा नितांत राजन बुटाले (26, पत्रकारनगर, सांगली), सुनील महावीर मडके (22, कवठे पिरान, ता. मिरज) जखमी झाले. मध्यरात्री दोनच्या सुमारास वाजता कर्मवीर भाऊराव पाटील चौकात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर अपघात झाला. सम्मेद आणि निनाद एकुलते होते. सम्मेद लठ्ठे पॉलिटेक्‍निकमध्ये डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. निनाद उत्तीर्ण होऊन नुकताच दिल्लीत नोकरीनिमित्त गेला होता. विकी पुणे येथे "बीबीए' करत होता.

अपघाताबाबतची पोलिसांकडून माहिती मिळाली - विकी, सम्मेद, निनाद आणि वृषभ असे चौघे खास मित्र. वृषभ बाहेरगावी गेला होता. सम्मेद शिक्षणानिमित्त सांगलीत होता. विकी व निनाद सांगलीत आले होते. तिघांपैकी एकाचा वाढदिवस असल्यामुळे काल (ता. 6) रात्री पार्टी करण्याचे ठरले. रात्री वान्लेसवाडी येथील खवय्या हॉटेलमध्ये तिघे जमले. त्यांचा आणखी एक मित्र नितांत बुटाले याचाही त्यांच्या ग्रुपमध्ये सहभाग असायचा. नितांत कंत्राटदार आहे. काल सायंकाळी तो आणि पर्यवेक्षक सुनील मडके मोटार (एमएच 02 एवाय 491) मधून बांधकामाची खडी आणण्यासाठी टोप संभापूर (जि. कोल्हापूर) परिसरात गेले होते. पाच-सहा क्रशरवर खडी पाहिली. त्याच वेळी नितांतला तिघांपैकी एका मित्राचा मोबाईलवर कॉल आला. वाढदिवसाच्या पार्टीचा निरोप मिळाल्यानंतर रात्री नितांत, सुनील सांगलीत परतले. पावणेदोन वाजता नितांतच्या मोटारीतून सर्वजण सांगलीत येण्यास निघाले.

नितांत मोटार चालवत होता. शेजारीच सुनील बसला होता. विकी, सम्मेद, निनाद मागच्या सीटवर होते. नितांत भरधाव मोटार चालवत होता. मार्केट यार्डासमोरील गतिरोधकावरून मोटार वेगाने उचलली जाऊन खाली आदळली. वेगावर नियंत्रण न ठेवता मोटार पुढे नेली. त्यानंतर कर्मवीर चौकाच्या अलीकडे जिल्हा बॅंकेसमोर रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गुलमोहारच्या झाडावर मोटार जोराने आदळली. धडकेनंतर मोटार पूर्णपणे मागे फिरली. मागची दरवाजाची बाजू पाच-सहा फुटांवर उचलली जाऊन झाडावर आदळली. दरवाजाचा चक्काचूर होऊन मागे बसलेले तिघे एकमेकावर आदळले. त्यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. मोटार चालवणारा नितांतही जखमी झाला. शेजारी बसलेला सुनील किरकोळ जखमी झाला.

Web Title: sangli news three youth death in accident