सह्याद्रीतला ‘तो’ वाघ ‘पाहुणा’!

सह्याद्रीतला ‘तो’ वाघ ‘पाहुणा’!

सांगली - सह्याद्री डोंगररागांच्या कुशीत दोन दिवसांपूर्वी पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. वन्यजीव प्रेमींच्यात आनंदलहर आली. बाल्यावस्थेत असलेला सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प योग्य दिशेने वाटचाल करतोय, याचा सांगावा घेऊन तो वाघ आला होता. तो ‘पाहुणा’ आहे, त्याने तेथेच मुक्काम ठोकावा, घर करावं, अशी व्यवस्था केली जातेय. तसे झाल्यास त्याला सवंगडी म्हणून भारतातील अन्य व्याघ्र प्रकल्पातून वाघ आणण्याच्या प्रक्रियेला मान्यता मिळू शकेल. 

भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्रीत दोनशे कॅमेरे बसवले होते. त्यातील दोन कॅमेऱ्यांमध्ये वाघाचे दर्शन घडले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दोन्ही कॅमेऱ्यात दिसलेला वाघ एकच आहे. या पट्ट्यात तब्बल आठ वर्षांनंतर वाघाचे दर्शन झाले आहे. याआधी सन २०१०-११ मध्ये या पट्ट्यात वाघ दिसला होता, कॅमेऱ्यात त्याचे दर्शन झाले होते. या भागातील  लोकांनीही सह्याद्री व्याघ्रच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांच्याकडे तशीच माहिती नोंदवली आहे. त्यामुळे आठ वर्षांनंतर वाघ परतला, ही लक्षवेधी बाब आहे. 

अधिवास म्हणजे ?
‘सह्याद्री’त दिसलेला वाघ ‘पाहुणा’ असण्याची शक्‍यता आहे. कारण, याआधीही येथे वाघ यायचा, मात्र शिकार करून काही दिवस राहून परत जायचा. त्याने सह्याद्री व्याघ्र राखीवच्या संरक्षित क्षेत्रात रहावे, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या क्षेत्रात गेल्या एका वर्षात ८०० एकर कुरण विकास करण्यात आले. तीन पाणवठे विकसित व स्वच्छ केले. तीनही नैसर्गिक पाणवठे आहेत. जेणेकरून कुरणातील गवत आणि उन्हाळ्यात पुरेसे  पाणी मिळाल्याने हरण, काळवीट, सांबर, गवे व अन्य प्राणी येथे वाढतील, वाघांना अन्न उपलब्ध होईल, अन्नसाखळी मजबूत होईल, असे डॉ. व्यास यांनी स्पष्ट केले. 

नव्या वाघांविषयी पुढील वर्षी निर्णय
‘सह्याद्री’त नव्याने वाघ सोडण्याचा निर्णय इतक्‍या घाईत होणार नाही, असे डॉ. व्यास यांनी स्पष्ट केले. त्याबाबत निर्णयासाठी कानाकोपऱ्यात पाहणी होईल, क्रॉस कॅमेरे बसवले जातील. त्यानंतर अधिवासाची खात्री पटेल आणि मगच पुढील वर्षी त्याबाबत काही बोलता येईल, असे त्यांनी सांगितले. 

यावर्षी एक हजार हेक्‍टर क्षेत्रावर कुरण विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. एकूण अठराशे हेक्‍टरवर गवताची लागवड होईल, जी येथे प्राणी पोसण्यास मदत होईल. वाघांचा अधिवास वाढवताना वन्यजीव व मनुष्य यांचा संघर्ष टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे संरक्षित क्षेत्रातच अन्नसाखळी मजबूत करण्याला आमचे प्राधान्य आहे.
  - डॉ. विनिता व्यास,
उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com