सांगली शहरात उद्या बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

सांगली - खाकी वर्दीतील गुंडांनी चोरीच्या आरोपातील संशयित अनिकेत कोथळेचा खून केला. उद्या त्यांच्या तावडीत आणखी कुणाचा तरी अनिकेतसारखा "बळी' जाऊ शकतो. त्याला वेळीच आवर घालण्यासाठी शहरात उद्या (ता. 13) सर्वपक्षीय कृती समितीने "शहर बंद'ची हाक दिली आहे.

सांगली - खाकी वर्दीतील गुंडांनी चोरीच्या आरोपातील संशयित अनिकेत कोथळेचा खून केला. उद्या त्यांच्या तावडीत आणखी कुणाचा तरी अनिकेतसारखा "बळी' जाऊ शकतो. त्याला वेळीच आवर घालण्यासाठी शहरात उद्या (ता. 13) सर्वपक्षीय कृती समितीने "शहर बंद'ची हाक दिली आहे. 

शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहणार आहेत. बंदमध्ये सहभागी होऊन सांगलीकरांनी पोलिसांच्या कृत्याचा निषेध करावा, असे आवाहन समितीने केले आहे. बंदच्या नियोजनासाठी आज सर्वपक्षीय कृती समितीची कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक झाली. बंदला शहरातील सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

कृती समितीतर्फे सकाळी दहा वाजता स्टेशन चौकात वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकलवरून फेरी काढण्यात येणार आहे. वसंतदादांना अभिवादन करून फेरी सुरू होईल. यात जी दुकाने उघडी असतील त्यांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरीद्वारे बंदमध्ये सहभागाची विनंती करण्यात येणार आहे. स्टेशन चौकातून हरभट रोड, मारुती रोड, एस.टी. स्टॅंड, सिव्हिल हॉस्पिटल मार्गे पुष्पराज चौकात फेरी येईल. तेथून राममंदिर, पंचमुखी मारुती रोडवरून मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही फेरी येईल. तेथे सांगता होणार आहे. 

सर्वपक्षीय कृती समितीने मागण्यांचे निवेदन यापूर्वीच दिले आहे. यात शहर पोलिसांनी अनिकेतची हत्या करून माणुसकीला काळिमा फासला आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी जागरूक नागरिक म्हणून खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. गुंडप्रवृत्तीच्या पोलिसांना पाठीशी घालण्याची भूमिका वरिष्ठ अधिकारी घेत आहेत, याची कबुली अतिरिक्‍त महासंचालकांनी दिली आहे. म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची तातडीने बदली करावी, उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी समितीने केली आहे. 

बैठकीस गौतम पवार, सतीश साखळकर, उमेश देशमुख, डॉ. संजय पाटील, महेश खराडे, आसिफ बावा, शाहीन शेख, नितीन चव्हाण, महेश पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

विद्यार्थी वाहतूक सुरू 

बंदला रिक्षा संघटना, वाहतूक संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा सुरू राहणार आहेत. त्यांचा बंदला पाठिंबा आहे. इतर अत्यावश्‍यक सेवाही सुरू राहणार आहेत. 

Web Title: Sangli News tomorrow bandh in city