देशात हळद उत्पादनात होणार घट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सांगली - हळद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात यंदा पावसाला उशिरा सुरवात झाल्याने हळद उत्पादन सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता आहे. या दोन राज्यांतील उत्पादनात ७ लाख पोती म्हणजे सुमारे ४२ हजार टन घट होईल. त्याचा परिणाम सांगलीच्या हळद मार्केटवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

सांगली - हळद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात यंदा पावसाला उशिरा सुरवात झाल्याने हळद उत्पादन सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता आहे. या दोन राज्यांतील उत्पादनात ७ लाख पोती म्हणजे सुमारे ४२ हजार टन घट होईल. त्याचा परिणाम सांगलीच्या हळद मार्केटवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

देशात तमिळनाडू, आंध्रप्रदेश राज्य हळद उत्पादनात अग्रेसर आहेत. देशाच्या एकूण उत्पादनापैकी या राज्याचा वाटा तब्बल ४० टक्के आहे. देशात दरवर्षी हळदीचे सरासरी ७५ लाख पोत्यांचे म्हणजेच ४  लाख ५०  हजार टन उत्पादन होते. पाऊसच कमी झाल्याने  उत्पादनात घट होऊन यंदाच्या हंगामात हळद उत्पादन अंदाजे ६७ लाख पोते म्हणजेच ४ लाख २ हजार टन होईल असा अंदाज आहे.  यंदा पावसाला उशिरा प्रारंभ झाला, त्यामुळे हळद  लागवडी उशिरा झाल्या. हळद उत्पादक राज्यात सरासरी इतका पाऊस झाला, मात्र तो हळदीच्या पोषण काळात झाला नाही. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी पाऊस फारसा उपयुक्त ठरला नाही. हळद उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा हळदीच्या पिकाची पुरेशी वाढ झालेली नाही. हळदीच्या उत्पादनात घट झाल्यास दरात तेजी राहील. यंदा साधारण ५५०० ते ११००० रुपये दर आहे. तो १५ हजार रुपयांपर्यंत जाईल. हळद उत्पादन वाढीसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाची सरासरी दरवर्षी पाहिली जाते. निम्मा ऑगस्ट महिना  पाऊस झालाच नाही. पुढच्या महिन्यात वेळेत पाऊस झाला तरच थोडाफार फायदा होई. देशात शिल्लक असलेल्या हळदीला डिसेंबर महिन्यात तेजी येण्याची शक्‍यता आहे. 

तमिळनाडूमध्ये मोठी घट  
तमिळनाडूमध्ये दरवर्षी हळदीचे सुमारे १२ ते १६ लाख पोत्यांचे उत्पादन होते. या राज्यात यंदा पावसाने दांडी मारली आहे. परिणामी हळद लागवडीवर झाला आहे. तमिळनाडूमध्ये सुमारे ३० टक्‍क्‍यांनी लागवड घटली आहे. यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा ५ लाख हळदीची पोत्यांचे उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. अशी माहिती हळदीचे व्यापारी मनोहर सारडा यांनी दिली. 

हळद हंगाम दृष्टिक्षेपात 
गेल्यावर्षी देशातील उत्पादन ः ७५ लाख पोती 
(एक पोते- ६० किलो) 
१५ ऑगस्टपर्यंत देशात ३५ ते ३६ लाख पोती शिल्लक. 
सांगली बाजार समितीत इतर राज्यातून ५ ते ६ लाख पोती हळद दाखल होते. 
बाजार समितीत यंदाच्या हंगामात २० ते २१ लाख पोती दाखल. 
२०१६-१७ च्या हंगामात ७५०० ते ११००० क्विंटल दर. 
२०१७-१८ च्या हंगामात ५५०० ते १०५०० क्विंटल दर. 

गेल्यावर्षीपेक्षा यंदा हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दर वाढण्याची शक्‍यता आहे. येत्या हंगामात हळदीचे दर प्रति क्विंटल १२ ते १३ हजार रुपये पर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.’’ 
- मनोहर सारडा. हळद व्यापारी, सांगली 

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात हळदीच्या लागवडीवर परिणाम झालेला नाही. तमिळनाडू आणि तेलंगणामध्ये कमी पाऊस असल्याने हळदीच्या लागवडीवर परिणाम झाला झाला आहे. हळदीच्या दरात निश्‍चितपणे मोठी वाढ होईल, असे चित्र आहे.
- प्रकाश पाटील सचिव, सांगली बाजार समिती

Web Title: sangli news Turmeric