सांगलीत दीड हजारांनी हळद उतरली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

सांगली - अपेक्षेपेक्षा हळद उत्पादनवाढ आणि मागणी कमी झाल्याने गेल्या पंधरवड्यात हळद दरात दीड हजार रुपयांनी घट झाली. अतिरिक्त उत्पादनाचा उत्पादकांना फटका बसला. हळदीचा रंग फिका पडला. सांगली बाजार समितीत हळदीला सरासरी ७ हजार ५०० रुपये दर मिळतो आहे. सध्या समितीत एक लाख पोती हळद शिल्लक आहे. 

सांगली - अपेक्षेपेक्षा हळद उत्पादनवाढ आणि मागणी कमी झाल्याने गेल्या पंधरवड्यात हळद दरात दीड हजार रुपयांनी घट झाली. अतिरिक्त उत्पादनाचा उत्पादकांना फटका बसला. हळदीचा रंग फिका पडला. सांगली बाजार समितीत हळदीला सरासरी ७ हजार ५०० रुपये दर मिळतो आहे. सध्या समितीत एक लाख पोती हळद शिल्लक आहे. 

देशात यंदा ६५ ते ७० लाख पोत्यांचे (पोते ६० किलोचे) उत्पादनाचा हळद उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज होता. दरम्यान, हंगामाच्या सुरवातीस हळदीचे दर प्रतिक्विंटलला दीड हजार रुपयांनी वाढून सरासरी १० ते ११ हजारपर्यंत पोहोचले. तेजीत शेतकरी हळद विक्रीसाठी पुढे आले. मात्र, देशात अपेक्षेपेक्षा १० लाख पोत्यांनी हळद उत्पादन वाढले. याचा परिणाम हळद दर घटण्यात झाला. सांगलीत नांदेड, पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू बसमधून हळद विक्रीला येते. भविष्यात एक लाख पोती आवक होईल. मात्र, दरातील घसरणीने तेवढी हळद शिल्लक राहण्याचा धोका आहे. आंध्रप्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा राज्यांतील हळदीला सध्या सरासरी साडेसहा ते साडेसात हजार रुपये दर मिळतोय. 

शेतकऱ्यांची अपेक्षा...
हळद दर घटीला व्यापारीच कारणीभूत आहेत. आवक कमी असताना दर वाढवाढीसाठी व्यापारी पुढे येत नाहीत. त्यांनीच हळदीचे दर पाडलेत. सध्या खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे, खते, पेरणीसाठी आर्थिक गरज आहे. यामुळेच हळद कमी दरात विकायची वेळ आलीय. बाजार समिती प्रशासनाने दराबाबत लक्ष घालावे.

शेतकऱ्यांकडे २० लाख पोती हळद शिल्लक
देशात अपेक्षेपेक्षा १० लाख पोत्यांचे अतिरिक्त उत्पादन वाढून ते सुमारे ८० लाख पोत्यांचे उत्पादन झाले. अद्याप देशभरातील शेतकऱ्यांकडे २० लाख पोती हळद  शिल्लक आहे.

हळदीच्या उत्पादनाचे अंदाज चुकले. अन्य शेतीमाल दरात मंदी आहे. यंदा तमिळनाडूमध्ये पाऊस चांगला झाल्याने यंदा तेथे हळद लागवड वाढीची शक्‍यता आहे. याचाही पुढील हळद हंगामावर परिणाम होईल.
- मनोहर सारडा, शीतल पाटील, व्यापारी 

पहिल्यांदाच हळद लावण केली अन्‌ दरात घसरण झाली. पण पर्याय नसल्याने हळद सौद्यास लावली. कमी दरात हळद विक्री परवडत नाही. तोटा भरून निघणारा नाही.
- त्र्यंबक मुंडे, हळद उत्पादक शेतकरी, कोरेगाव, जि. बीड.

Web Title: Sangli News Turmeric market special