विजेच्या धक्‍क्‍याने सून, सासऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये आणि धुणे वाळत घालण्यास बांधलेल्या तारेत वीजप्रवाह उतरल्यामुळे हा अपघात झाला. 

सलगरे - घराशेजारील गोठावजा पत्र्याच्या शेडमध्ये तारेवर कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या विद्या भैराप्पा कुडचे (वय ३०) यांना विजेचा जोरात धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सून गोठ्यात पडलेली समजल्यानंतर गोठ्यात नेमके काय झाले, हे पाहण्यासाठी गेलेले विद्याचे सासरे बसगोंडा शिवगोंडा कुडचे (वय ७५) यांचाही त्याच विजेच्या तारेचा धक्का बसून त्यांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना लिंगनूर (ता. मिरज) येथील कुडचे मळ्यात घडली. घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये आणि धुणे वाळत घालण्यास बांधलेल्या तारेत वीजप्रवाह उतरल्यामुळे हा अपघात झाला. 

सकाळी विद्या यांनी घरातील कपडे बाहेर वाळत घातले. पावसात कपडे भिजू नयेत म्हणून घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये कपडे टाकण्यास त्या गेल्या. घरातून शेडमध्ये वीज 
नेली आहे. त्या वायरचे कोटिंग निघाल्याने शेड आणि तेथे कपडे वाळत घालण्यास बांधलेल्या तारेत वीजप्रवाह उतरला होता. याची कल्पना नसल्याने विद्या यांना जोरात धक्का बसून त्या बाजूला फेकल्या गेल्या. शॉक लागताच त्या जोरात ओरडल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यामुळे घरातील व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

विद्याचे पती भैराप्पा द्राक्षबागेत होते. त्यांनी तत्काळ पत्नीला गाडीतून उपचारासाठी सांगलीस नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच विद्या यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, विद्याचे सासरे बसगोंडा कुडचे हे शेडमध्ये पाहणी करताना ‘इथे कुठे काय आहे?’ असे म्हणत असतानाच त्यांचा हात तारेस लागून त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. शेजारी इरगोंडा कुडचे यांना दूरध्वनीवरून हे कळवल्यानंतर ते घटनास्थळी आले. बसगोंडा यांना विजेचा धक्का बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वाळलेल्या लाकडाने त्यांना बाजूला केले.

पत्नीला उपचारास नेतानाच घरी वडिलांचाही मृत्यू झाल्याचे भैराप्पांना समजले. इरगोंडा यांनी महावितरणच्या लिंगनूर उपकेंद्रात माहिती देऊन वीजपुरवठा बंद करायला लावला. महावितरण कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली. या वेळी नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. विद्या व भैराप्पा यांना दोन मुली, एक मुलगा आहे. मुलगा तिसरीत तर दोन मुली अंगणवाडीत आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन जाधव व सहकारी, पोलिस पाटील मलय्या स्वामी यांनी पंचनामा केला.

Web Title: Sangli News two dead due to electric shock