बेवारस मृतदेह दिल्याप्रकरणी शासकीय रुग्णालयातील दोन कर्मचारी रडारवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

सांगली - जिवंत रुग्णाला मृत ठरवून नातेवाइकांना बेवारस मृतदेह दिल्याप्रकरणी शासकीय रुग्णालयातील आणखी दोन कर्मचारी रडारवर आहेत. चौकशी समितीने दोन दिवसांत तीस जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्याचा अहवाल तयार झाला असून फाईलीच्या गोंधळापासून पोलिस पंचनाम्यापर्यंत चौकशी येऊन थांबली आहे.

सांगली - जिवंत रुग्णाला मृत ठरवून नातेवाइकांना बेवारस मृतदेह दिल्याप्रकरणी शासकीय रुग्णालयातील आणखी दोन कर्मचारी रडारवर आहेत. चौकशी समितीने दोन दिवसांत तीस जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्याचा अहवाल तयार झाला असून फाईलीच्या गोंधळापासून पोलिस पंचनाम्यापर्यंत चौकशी येऊन थांबली आहे.

दरम्यान, हा चौकशी अहवाल अद्याप जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेला नाही. तासगावातील अविनाश बागवडे यांना रुग्णालयात दहा दिवसांपूर्वी दाखल केले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्यांच्या वॉर्डात एक रुग्ण मृत झाला. त्यावेळी फाईलींची अदलाबदल झाल्याने जिवंत बागवडे यांनाच मृत ठरवण्यात आले. त्यांच्या नावाने बेवारस मृतदेह नातेवाईकांना दिला गेला. तासगावमध्ये मृतदेह दुसऱ्याचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खळबळ उडाली. 

या घटनेच्या चौकशीसाठी रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली. समितीने कालपासून  घटनेवेळी त्या वॉर्डात कामावर असलेल्या सर्वांचे जबाब घेतले. प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या दोघांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यानंतर आज आणखी दोघांची नावे समोर आली आहेत. त्यांच्यावर अद्यापही कारवाई केलेली नाही. 

नेमके झाले काय?
अविनाश बागवडे यांची रुग्णालयात नोंद झाली त्यावेळी तिथे एक बेवारसही होता. प्रकृती खालावल्याने दोघांनाही अतिदक्षता गृहात हलवले. त्याच रात्री बेवारस असणाऱ्याचा मृत्यू झाला. त्यावेळात बागवडे आणि बेवारस दोघांच्या फाईलींची अदलाबदल झाली. मृतदेह ३५ मिनिटांहून अधिक काळ वॉर्डात ठेवता येत  नसल्याने शवागृहात नेला. आणि तो मृतदेह बागवडे यांचाच असल्याचे सांगण्यात आले. तिथून हा गोंधळ उडाला. 

खासगी रुग्णवाहिकेचा हस्तक्षेप का?
रुग्णालय परिसरात काही दिवसांपासून खासगी रुग्णवाहिका चालकांचा हस्तक्षेप वाढला आहे. वॉर्डातील मृत व्यक्तीची माहिती तत्काळ या चालकांना कळते. तेथून त्यांचा हस्तक्षेप सुरू होतो. त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच नाही. रुग्णालय परिसरात ‘पे अँड पार्क’ची व्यवस्था करण्याच्या सूचनेनंतर तीन वेळा निविदा प्रसिद्ध झाल्या. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे अधीक्षक सुबोध उगाणे यांनी सांगितले. अशा खासगी रुग्णवाहिकेचा हस्तक्षेप रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे.

पंचनामा करणाऱ्यांची चौकशी होणार का?
पोलिसांनी बागवडेच्या कुटुंबीयांसमोर मृतदेहाची ओळख पटवल्याचे सांगितले जाते. तेव्हाच हा प्रकार उघडकीस येणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. पोलिस यंत्रणेचाही हा हलगर्जीपणा आहे. त्यामुळे पंचनामा करणाऱ्यांची चौकशी होणार का? याची चर्चा आहे. 

Web Title: Sangli News Two employees of the government hospital on the Radar