मुख्यमंत्री उजळ माथ्याने फिरतातच कसे? - ठाकरे

मुख्यमंत्री उजळ माथ्याने फिरतातच कसे? - ठाकरे

मिरज - ‘सांगलीत अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. मुख्यमंत्रीसाहेब, गृहखाते तुमच्याकडे आहे. तुम्हाला या घटनेची लाजदेखील वाटत नाही. उजळ माथ्याने महाराष्ट्रात फिरताय, मी लाभार्थीची जाहिरात करताय. आता त्या जाहिरातीत कोथळेच्या बायकोने, आईने आणि पोरीने काम करावे का? माझ्या नवऱ्याची, माझ्या मुलाची, माझ्या बापाची या सरकारने हत्या केली, होय मी लाभार्थी, हे माझं सरकार, असं म्हणावं का?’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. 

येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर झालेल्या शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दीर्घ काळाने मिरज शहरात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची सभा होत असल्याने भगवे वातावरण झाले होते. त्यात श्री. ठाकरे यांनी भाजपसह राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्‍नावर मी हाक देईन तेव्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, दादासाहेब भुसे, माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी होते. 

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात गृहखाते कुठे आहे ते शोधावे लागेल. कोथळेचे प्रकरण झाले, मंजू शेटे प्रकरण तसेच आहे. भाजपचा आमदार म्हणतोय, माझ्याकडे पोलिस लाच मागत आहेत. कुठाय गृहखाते? मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही यशवंतरावांच्या सृजनशीलतेने काम करतोय. कसली आलीय तुमची सृजनशीलता. लोकशाहीचं फालतू स्तोम माजवलंय. ‘अच्छे दिन’ येणार म्हणे! त्या पापात मीही सहभागी होतो. आता सांगताहेत, चुनावी जुमला होता. तुमच्यावर आत्महत्येची वेळ आली नाही, हेच अच्छे दिन समजा. इथे विजेचा पत्ता नाही, बिल मात्र कडाडून, ही ह्यांची सौभाग्य योजना. कर्जमुक्तीसाठी सतरा हेलपाटे मारले तर साडेतीनशे रुपयांचा लाभ. अरे कुठाय लाभार्थी? कुठाय साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी? मला एकही माणूस भेटत कसा नाही? सीआयडीने याची चौकशीच करावी. गृहराज्यमंत्री केसरकरांनी तसे आदेश द्यावेत.’’

जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते, युवा नेते पृथ्वीराज पवार, दिगंबर जाधव, नगरसेवक शेखर माने, माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, शंभोराज काटकर, तानाजी सातपुते, विशालसिंग रजपूत, संजय काटे, चंद्रकांत मैगुरे, पप्पू शिंदे, गजानन मोरे, विजय शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. 

शिवप्रेमी जनतेशी गाठ
ठाकरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या बळावर शिवरायांनी औरंगजेबाच्या छाताडावर भगवा रोवला होता. तो इतिहास साक्ष आहे. शेतकऱ्यांच्या बळावर आपण हक्क मिळवीत राहू. मी ही सारी व्यथा घेऊन प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यांना भेटेन. प्रश्‍न सुटले तर ठीक; अन्यथा रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा. त्याचे नेतृत्व मी स्वतः करेन. ही ठिणगी पेटली आहे. ती विझू देऊ नका. ती विझली तर राज्यावर वरवंटा फिरेल. छत्रपती शिवरायांच्या नावाने  कर्जमाफीची योजना आणली आहे. त्यात घोटाळा झाला तर आम्ही सहन करणार नाही. गाठ शिवप्रेमी जनतेशी आहे.’’

मिशीला पीळ द्या
ठाकरे म्हणाले, ‘‘या राज्यातील सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी सारे पिचले आहेत. एवढेच कशाला, त्यांचे मंत्रीही त्रस्त आहेत. मी या साऱ्यांशी बांधील आहे. मी सत्तेशी बांधील नाही. मला सत्तेची फिकीर नाही. तुम्ही आता मिशीला पीळ द्या; अन्यथा सरकार तुम्हाला पिळेल.’’
 
विकास वेडा झालाय
ठाकरे म्हणाले, ‘‘सारे मंत्री, संत्री, वाजंत्री तिकडे गुजरातला पळाले आहेत. त्या २२-२३ वर्षांच्या हार्दिक पटेलने यांच्या नाकात दम आणलाय. देशातील सर्व शक्तिमान माणूस त्याला घाबरलाय. ५० सभा घेणार तिथे. विकास वेडा झालाय, त्यामुळेच त्या हार्दिकच्या सीडी दाखवताहेत. अरे, हिंमत असेल तर २२ वर्षांत काय विकास केला त्याच्या सीडी दाखवा. तो मातोश्री बंगल्यावर आला तरी यांना पोटशूळ उठला होता. काश्‍मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्कीसोबत जुळवून घेता आणि इकडे शिवसेना संपवण्याची तयारी करता? कसली भूमिका आहे ही?’’

शेतकरी की फर्डा वक्ता
शेतकऱ्यांचे दुखणे मांडण्यासाठी सुभाष पाटील यांना शिवसेनेने व्यासपीठावर बोलावले. ते शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडतील, असे वाटले होते; मात्र ते फर्डे वक्ते निघाले. त्यांनी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. शेतकरी प्रश्‍न बाजूलाच राहिले. 

सम्राटांना दणका द्या
ठाकरे म्हणाले, ‘‘या भागात शिक्षणसम्राट, साखरसम्राट कुणाच्या जोरावर मोठे झाले. त्यांना दणका द्या. आमच्या घरात नाही पीठ अन्‌ ह्यांचे एकावर एक विद्यापीठ, अशी स्थिती आहे.’’

पंधरा-वीस वर्षांत काहीच झालेले नाही
प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘‘या भागात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना शिवसेनेने आणली; मात्र गेल्या पंधरा-वीस वर्षांत काहीच झालेले नाही. रोजगार संपला, व्यापार अडचणीत आला. पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय. आता केवळ शिवसेनेकडूनच लोकांना आशा आहे.’’

महापालिकेवर भगवाच
ठाकरे म्हणाले, ‘‘आठ महिन्यांवर महापालिकेची निवडणूक आली आहे. सांगली, मिरज, कुपवाड पालिकेवर भगवा फडकावूनच दाखवू. त्यासाठी मी पुन्हा येईन. इथले रस्ते, गढूळ पाणी, नोकऱ्यांअभावी होणारे स्थलांतर, रस्ते, स्कायवॉक... तुम्ही ज्यांना डोक्‍यावर चढवून ठेवलेय त्यांना आता रस्ता दाखवायची वेळ आली आहे. या सांगलीने विधानसभेला शिवसेनेला काही दिले नाही, म्हणून मी यायचा थांबलो नाही. असला करंटा विचार मी करत नाही; पण या वेळी भगवा फडकवणार आणि विजयोत्सव साजरा करायलाही मी येणार.’’

संभाजीअप्पा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
भाजपचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संभाजी पवार यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज इस्लामपुरात वीस मिनिटे भेट घेतली. याला पार्श्‍वभूमी सर्वोदय सहकारी साखर कारखान्याची असली तरी राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व संभाजी पवार यांचे भाजपमध्ये एक पर्व होते. त्या काळात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पवार यांचे नावही चर्चेत आले होते. जिल्ह्याच्या दौऱ्यावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आले. शिवसेनेत असलेले ‘आप्पा’ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

शरद पवारांनी ‘तो’ प्रसंग आठवावा

माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्‍या शब्दांत टीका केली आहे. त्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ‘‘मी भाजपच्या विरोधात बोलतोय तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस माझ्यावर टीका करतेय. त्यांना विषय झेपेना म्हणून मी मैदानात उतरलोय; परंतु ह्यांच्या पोटात का दुखतेय? मोदी बारामतीत आले होते तेव्हा पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगितले होते. 

त्या गुरू-शिष्य नात्याची जाण ठेवताय का? आम्हाला निष्ठा शिकवण्याची गरज नाही. शरद पवार यांनी तर नाहीच नाही. सत्तेत राहून मी भाजपवर टीका करतोय अन्‌ त्याचे त्यांना आश्‍चर्य वाटतेय. असला प्रकार कधी पाहिला नव्हता म्हणे. शरद पवार, मी शिवसेनेचा आहे, भाजपवर टीका करतोय, तुम्ही तर काँग्रेसमध्ये असतानाच वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला होता अन्‌ पुलोदचे सरकार स्थापन करून टुणकण खुर्चीवर जाऊन बसला होतात. विसरलात का काय? सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा काढल्यावर त्यांनी तुम्हाला ‘गेट आऊट’ केले. तुम्ही राष्ट्रवादी काढली आणि पुढे पंधरा वर्षे त्याच काँग्रेसची सत्तेसाठी भांडी घासलीत. मी सत्तेसोबत फेविकॉलने जोडला गेलेलो नाही, माझा जोड या जनतेशी आहे. तो फेविकॉलपेक्षा भारी आहे. 

मला सत्तेत रमत नसेल तर मी तुम्हाला का सांगेन? माझी तुमची भेट झाली तर म्हणे राजकीय चर्चा आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात त्यात काय क्रिकेटवर चर्चा केली काय? धोनीने कधी निवृत्त व्हावे, विराटने कसे खेळावे हे ठरले का? कुणाला शिकवताय. मला फुकटचे सल्ले देत बसू नका. माझ्यात बाळासाहेबांचे गुण आहेत, मला तोंड उघडायला लावू नका.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com