अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

सांगली -  राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन येत्या १५ दिवसांत आणखी एक पाऊल उचलणार आहे. अर्ज न केलेल्या पण पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तयारी शासकीय  पातळीवर सुरू आहे. येत्या १५ दिवसांत याबाबत पुन्हा आदेश काढले जाण्याचे संकेत आहेत. सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांच्याकडून राज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेईल, या आश्‍वासनाच्या पूर्ततेच्या तयारीत सरकार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर आजअखेर १६० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.  

शासनाच्या कर्जमाफी योजनेत बसतात प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन प्रस्ताव दाखल केलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांकडून फेरप्रस्ताव मागवले जातील. त्यासाठी बॅंकांच्या यादीतून थकबाकीदार म्हणून नावे आलेल्यांना संधी दिली जाणार आहे. जिल्हा बॅंकेकडून कर्जमाफीबाबत मोबाईलवरून संदेश पाठवले जात आहेत. त्यात संपूर्ण मिळालेल्या २२ हजार ३८३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचे ८९ हजार ७७९ शेतकऱ्यांना ९९ कोटी ५ लाख रुपये जिल्हा बॅंकांच्या विविध शाखांकडे सोमवारी वर्ग करण्यात आले आहेत. कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान खात्यावर जमा होऊ लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जिल्ह्यासाठी २२० कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर असून १७७ कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध झाली आहे. जिल्हा बॅंकेने मंगळवारी मागणी केलेले ३६ कोटी रुपये जिल्हा बॅंकेला आज मिळाले. 

राज्य सरकारच्या कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी आतापर्यंत तीन याद्या जाहीर झाल्या. दीड लाखाच्या आतील थकीत शेतकरी, दीड लाखावरील एकरकमी कर्ज परतफेड करणारे शेतकरी व नियमित कर्जफेड करणाऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीच्या पहिली यादीत १३४६ शेतकरी व ६.५२ कोटी कर्जमाफी, दुसऱ्या यादीत १९ हजार ७७६  शेतकरी, ७२.१९ कोटींची कर्जमाफी, तिसऱ्या यादीत ३ हजार ३६ शेतकऱ्यांना ७.६६ कोटी आणि ५९ हजार ८९२ शेतकऱ्यांसाठी ५४.९९ कोटी प्रोत्साहन अनुदान मिळाले.  

जिल्ह्याची कर्जमाफी, जमा रक्कम  

  •  जिल्ह्यासाठी मंजूर कर्जमाफी २२० कोटी,
  •  जिल्हा बॅंकेला प्राप्त रक्कम १७७.३८ कोटी,
  •  थकबाकीदार शेतकरी (दीड लाखाआतील)२२,३८३, 
  • कर्जमाफी- ८१.३७ कोटी प्रोत्साहन अनुदान, ३८ हजार २८५ शेतकरी, कर्जमाफी ५६.८३ कोटी
  •  अटींवरील कर्जमाफी ५७३९ शेतकरी, ३९.४२ लाख  (दीड लाखावरील थकबाकी भरल्यानंतर) 

जिल्हा बॅंकेचे अधिकारी, शाखांचे इन्स्पेक्‍टर, शाखाधिकारी आणि सोसायट्यांचे सचिव यांच्याकडून कर्जमाफीची कार्यवाही केली जात आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, सहकार विभागाचे मुख्य सचिव एस. एस. संधू तीन दिवसांतून आमचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतात.
- प्रतापसिंह चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी, 
सांगली जिल्हा बॅंक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com