निर्यात साखरेला प्रतिक्विंटल हजार रुपयांचे अनुदान मिळावे -  वैभव नायकवडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

वाळवा - निर्यात होणाऱ्या साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने द्यावे, किमान तीस लाख टन साखर निर्यात व्हावी म्हणून अनुकूल धोरण राबवावे अशी मागणी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केली आहे.

वाळवा - निर्यात होणाऱ्या साखरेला प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने द्यावे, किमान तीस लाख टन साखर निर्यात व्हावी म्हणून अनुकूल धोरण राबवावे अशी मागणी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केली आहे. निर्यातीला पोषक वातावरण न मिळाल्यास राज्यातील साखर कारखानदारी मोडायला वेळ लागणार नाही, असे ते म्हणाले. 

ते म्हणाले, ""केंद्राने साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. जागतिक बाजारपेठेत सध्या साखर दर प्रतिक्विंटल एक हजाराने गडगडले. तुलनेत देशांतर्गत साखरेची बाजारपेठ चांगली आहे. साखर निर्यात करणे कोणत्याही कारखान्याला परवडणारे नाही. केंद्राचे अनुदान धोरण निश्‍चित नाही. निर्यातीचा निर्णय घेणे कारखान्यांना अडचणीचे झाले आहे. अतिरिक्त उत्पादित 30 लाख टन साखर प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देऊन केंद्राने निर्यात करावी, तेवढ्या साखरेचा बफर स्टॉक करावा.'' 

ते म्हणाले, ""सहकारी साखर कारखानदारीने अनेक अडचणींवर मात करीत शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हितासाठी मोठे योगदान दिले. काही वर्षांत मात्र केंद्र व राज्याच्या निश्‍चित धोरणाअभावी उद्योग कमालीचा अडचणीत आला आहे. सध्या देशात साखरेचे दर तीन हजारपर्यंत घसरले. ते आणखी घसरण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत निर्यातीचा निर्णय तातडीने होण्याची गरज आहे. साखरेची बाजारपेठ अनिश्‍चित आहे. अपेक्षेपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाले. दर गडगडल्याने अनेक कारखान्यांना "एफआरपी'ची रक्‍कम देताना नाकीनऊ येते. पुन्हा कर्जाच्या खाईत सहकारी कारखाने जातील. एकूणच विचित्र अवस्थेतून वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या संस्थांना म्हणूनच केंद्र व राज्याने संरक्षण देण्याची गरज आहे.'' 

ते म्हणाले, ""यंदा उत्पादित साखर वेळेत विक्री न झाल्यास पुढील हंगामात अनेक कारखाने सुरू होणार नाहीत. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. निर्यातीचे धोरण व अनुदानाचा निर्णय तातडीने झाला पाहिजे.'' 

Web Title: Sangli News Vaibhav Naikwadi Press