जेलफोडीचा थरार...अन्‌ दोन क्रांतिकारकांचे हौतात्म्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

स्वातंत्र्य लढ्याची धुमश्‍चक्री सुरू असताना वसंतरावदादा, जयराम कुष्टे, हिंदूराव पाटील आदींना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये ठेवले. दत्तूतात्या सूर्यवंशी, वसंतरावदादा आणि हिंदूराव पाटील यांना ‘सेपरेटर्स’मध्ये ठेवले. काकोरी बॉम्बस्फोटात पकडलेले शहापूरचे बाबूराव जाधव आणि सांगलीचे अल्पवयीन आण्णा पत्रावळेही आत होते. वसंतरावदादा, दत्तूतात्या आणि हिंदूरावांना जुलैनंतर साताऱ्यातील जेलमध्ये हलवण्यात येणार होते. तेथे क्रूरकर्मा गिलबर्ट पोलिसप्रमुख होता. तत्पूर्वीच जेल फोडून पळून जाण्याचा कट रचला. शनिवार २४ जुलै १९४३ हा दिवस निश्‍चित केला.

स्वातंत्र्य लढ्याची धुमश्‍चक्री सुरू असताना वसंतरावदादा, जयराम कुष्टे, हिंदूराव पाटील आदींना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये ठेवले. दत्तूतात्या सूर्यवंशी, वसंतरावदादा आणि हिंदूराव पाटील यांना ‘सेपरेटर्स’मध्ये ठेवले. काकोरी बॉम्बस्फोटात पकडलेले शहापूरचे बाबूराव जाधव आणि सांगलीचे अल्पवयीन आण्णा पत्रावळेही आत होते. वसंतरावदादा, दत्तूतात्या आणि हिंदूरावांना जुलैनंतर साताऱ्यातील जेलमध्ये हलवण्यात येणार होते. तेथे क्रूरकर्मा गिलबर्ट पोलिसप्रमुख होता. तत्पूर्वीच जेल फोडून पळून जाण्याचा कट रचला. शनिवार २४ जुलै १९४३ हा दिवस निश्‍चित केला. ‘अण्णा पत्रावळेचं लग्न शनिवारी दुपारी ३ वाजता आहे’, असे संकेतवाक्‍य बनवले. 

दुपारी दादा आणि हिंदूराव शौचाच्या निमित्ताने ‘सेपरेटर’मधून पोलिसांच्या देखरेखीत बाहेर पडले. बराकीसमोर अण्णांनी विचारलं, ‘आज माझ्या लग्नाला कोण येणार’, ‘आम्ही सगळी येणार’ एकमुखी उत्तर आलं. गलका सुरू केला, ‘लघवीला सोडा.’ पहारेकऱ्यांनी कुलूपे काढली. दादा, हिंदूराव आप्पा बाहेर आले. अण्णाने संकेत दिल्याबरोबर हिंदूरावांनी पोलिसाला कवळा घातला. दादांनी खांद्याची रायफल काढून घेतली. त्याच वेळी अण्णाने रुमाल फडकवला. तसे १५-२० जणांनी हत्यारी पोलिसांना जेरबंद केले. तटावरच्या पोलिसाला अण्णाने पायरीवर पाडले. अण्णाने त्याची बंदूक उचलून एक बार काढला. बाबूराव जाधव यांनी दुसरा बार काढला. जिनपाल खोतानी खंदकात पहिली उडी मारली. पाठोपाठ दत्तूतात्या सूर्यवंशी, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, वसंतरावदादा, महादेव बुटाले, सातलिंग शेटे, बाबूराव पाचोरे, विठ्ठल शिंदे, बाबूराव जाधव, वसंत सावंत, मारुती जाधव, अण्णा पत्रावळे आदींनी २५/३० फुटांवरून खंदकात उड्या मारल्या. हिंदूराव मागे थांबून पोलिसांना रोखत होते. तुरुंगातील घंटा वाजली. रिसाला रोडवरील घोडेस्वाराला पोलिसांनी बाहेरून गराडा टाकला. तेराजण दादांच्या नेतृत्वाखाली ‘भारत माता की जय’ घोषणा देत मारुती देवळापासून आयर्विन पुलावरून सांगलीवाडीकडील घाट उतरले. पेवाच्या रस्त्याने नदीकाठाने धावत राहिले. काहींनी कृष्णेच्या पात्रात उड्या मारल्या. अण्णाला पोहता येत नव्हते. एका झुडपाजवळ पोलिसांनी घेरून गोळी घातली. अण्णा हुतात्मा झाला. दादांनी इतरांना वारणेतून पोहून जाण्यास सांगून पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू ठेवला. बाबूराव जाधवांनी महापुरात उडी मारली; परंतु पोलिसांची गोळी त्यांच्या डोक्‍याला लागली. क्षणात त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. दादा गोळीबारात जखमी झाल्यानंतर पकडले गेले. पोलिसांनी सर्वांना अटक करून जेलमध्ये आणले. 

(शब्दांकन : प्राचार्य विजय कोगनोळे)

Web Title: sangli news vasantdada patil

टॅग्स