अंगभूत गुणवत्तेचा नेता

अंगभूत गुणवत्तेचा नेता

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या अग्निकुंडात ज्यांनी संसारावर निखारे ठेवून उड्या घेतल्या आणि स्वातंत्र्यानंतर देशउभारणीसाठी निःसंग भावनेने समाजविकासासाठी वाहून घेतले, अशा थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक वसंतदादा होते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या तोडीचे काम त्यांनी महाराष्ट्रासाठी केले. सांगली-नांद्रे-वसगडे या रस्त्याच्या मध्ये ‘पद्माळे’सारख्या छोट्या गावातून वसंतदादा आले. अल्पशिक्षित माणूस देशाचे राजकारण करणारा नेता कसा झाला, हा गहन संशोधनाचा विषय ठरावा. मध्यम उंचीचे, भारदस्त, आकर्षक प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, कसलेल्या कुस्तीगिरासारखे गोळीबंद असे हे व्यक्तिमत्त्व होते. धोतर व नेहरू शर्टातील दादा लोकगर्दीत सहज ठसठसीत उठून दिसायचे. भव्य कपाळ, भेदक डोळे; पण चेहऱ्यावर अपार आपुलकी असे त्यांचे प्रथमदर्शनी स्वरूप आजही माझ्या स्मरणात आहे.

पद्माळेजवळचे नांद्रे माझ्या वडिलांचे आजोळ. माझ्या लहानपणात मी नेहमी तिथे जायचो. पद्माळे, कर्नाळ, डिग्रजशी माझा त्या वेळी संबंध यायचा. तेव्हा म्हणजे साधारणत १९५० पासूनच सांगलीच्या सामाजिक जीवनात वसंतदादांचे नाव उदयोन्मुख, जबाबदार, सामाजिक कार्यकर्ता व राजकीय नेता म्हणून रुजले होते. आम्हा शाळकरी मुलांना दादांचे व्यक्तिमत्त्व धाडसी, क्रांतिकारक, आक्रमक, मुरब्बी सेनापतीचे वाटायचे. माझ्या आयुष्यात काही वळणांवर त्यांच्याशी भेटण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे प्रसंग मला लाभले. ‘दादा’या शब्दाचा अर्थ थोरला भाऊ, आधारवड. त्यांचे वागणे नेहमीच दादा शब्दाला प्रतिबिंबित करणारे होते. हा माणूस विधायक आयाम घेऊनच जन्माला आला असला पाहिजे, असे वाटायचे.

मी १९५९ ते १९६१ या काळात सांगलीच्या जैन बोर्डिंगचा विद्यार्थी होतो. त्या वेळी दादा बोर्डिंगच्या समोरून गावात जायचे. बोर्डिंगच्या दारात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी करायचे. जेवण-खाण, खोली, स्वच्छता, पाणी अशी आपुलकीने चौकशी करायचे. त्यात कोणताही राजकीय विषय नसायचा, असायची ती आम्हा विद्यार्थ्याच्या पालकत्वाची भूमिका. 
१९६० ते दादा राजस्थानचे राज्यपाल होईतोपर्यंतचे सांगली जिल्ह्याचे राजकारण, अर्थकारण व सत्तासंघर्ष हा एका अर्थाने दादा, बापू, शिंदे, गुलाबराव पाटील, आटपाडी-खानापूरचे माने देशमुख व शिराळ्याचे नाईक/देशमुख, नायकवडी असा अनेक पदरी होता. आज मागे वळून बघताना या संघर्षातून जिल्ह्यात सहकारी साखर कारखाना, औद्योगिक वसाहती, सूत गिरणी, सहकार शिक्षण केंद्र, मिरज शासकीय दूध केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती, मेडिकल कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल, मध्यवर्ती बॅंका, शांतिनिकेतन, शिवाजी विद्यापीठ स्थापना, नगरपालिका असा सारा विकासाचा पट विस्तारला. 

मुख्यमंत्री म्हणून दादांनी सिंचन खात्याची घडी बसवली. पाणी अडवा-पाणी जिरवा संकल्पनेचे ते प्रणेते होते. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्थेत व्यावसायिक शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा त्यांचा निर्णय क्रांतिकारक होता. महाराष्ट्राचे मानवी भांडवल सतत श्रीमंत करण्याचा तो अनोखा प्रयोग होता.

महाराष्ट्राच्या रस्ते, रस्ते-वाहतूक, रोजगार हमी, वीज, सिंचन या पायाभूत रचनेचे ते शिल्पकार मानले पाहिजेत. त्यांनी लठ्ठे शिक्षण संस्था व विवेकानंद शिक्षण संस्था, तसेच रयत शिक्षण संस्थांच्या विकासाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हातभार लावला. सांगली शहराचा नगर विकास त्यांच्याच दृष्टिकोनाचे प्रत्यंतर होते. सांगलीचे काँग्रेस भवन त्यांच्याच कष्टाचे फलित.
दादा व बापू या सांगली जिल्ह्याच्या दोन लोकमान्य, विधायक, महत्त्वाकांक्षी; पण तितक्‍याच सुसंस्कृत नेत्यांतील विधायक व रचनात्मक स्पर्धा (संघर्ष नव्हे) हा राजकारणाचा एक आदर्श मानावा लागेल. वारणा नदीवर धरण कोठे बांधावे (चांदोली का खुजगाव) या वादात परस्परविरोधी भूमिका घेताना दादा-बापूंनी अत्यंत अभ्यासपूर्वक आपल्या भूमिका माध्यमातून लोकांच्या पुढे मांडल्या. त्यात व्यक्तिगत हेव्यादाव्यांचा अंशही नव्हता.

जास्तीत जास्त क्षेत्र पाण्याखाली आणणे, टिकाऊ बांधकाम, किमान पुनर्वसन, कार्यक्षम खर्च व किमान फलप्राप्तिकाळ या निकषांवर दोघांनी मांडणी केली. धरण झाल्यानंतर लोकांना फक्त लाभांचीच जाणीव राहिली. महत्त्वाचे म्हणजे चांदोली प्रकल्प गतिमान झाला. फलद्रूप झाला. दादा संपूर्ण महाराष्ट्राचे, महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मांचे, प्रदेशांचे नेते होते. त्यांच्याइतकी लोकस्वीकृती मिळविणे, हा आताच्या परिस्थितीत चमत्कारच मानावा लागेल. दादांनी समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला. राजकारणाचे एक सभ्य शास्त्र निर्माण केले. प्रश्‍न समजून घेण्याची, कोणत्याही क्षेत्रातील त्यांची कुवत अचंबित करणारी होती. त्यांची चेहरा-नाव, प्रसंग एकत्र लक्षात ठेवण्याची क्षमता अफलातून! काही लोक त्याला फोटोजेनिक मेमरी असे नाव देतात. त्यांनी राजकारणाची, विधायक स्पर्धेची, राजकीय सभ्यतेची, मानवतावादी दृष्टिकोनाची एक परंपरा निर्माण करण्याचे काम केले. त्यांचे ‘दादा’पण अजूनही नव्या नेतृत्वाची वाट पाहत आहे. समाज आशावादी असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com