वसंतदादा कारखान्याचा ताबा आजपासून श्री दत्त इंडियाकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

जिल्हा बॅंकेला 60 कोटी अदा - संयुक्त करार दहा वर्षांसाठी

जिल्हा बॅंकेला 60 कोटी अदा - संयुक्त करार दहा वर्षांसाठी
सांगली - आशिया खंडातील सर्वांत मोठा असलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना आजपासून मुंबईच्या श्री दत्त इंडिया कंपनीला भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यावर आज अंतिम शिक्कामोर्तब झाले. तो कंपनीकडे दहा वर्षे राहील. दत्त इंडिया कंपनीने कराराप्रमाणे जिल्हा बॅंकेला आजअखेर 60 कोटी रुपये दिले आहेत. कारखाना "दत्त इंडिया'ला देण्याबाबत कंपनीचे अधिकारी, जिल्हा बॅंक, वसंतदादा कारखाना अध्यक्ष यांच्यात संयुक्त करार झाला. आता कारखाना सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला. करार नोंदणीकृत करण्यासाठी चार कोटी रुपयांचे मुद्रांक लावले आहे.

जिल्हा बॅंकेच्या 93 कोटी थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने मार्चमध्ये कारखान्याचा ताबा घेतला. त्यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आली. तिलाही दोनदा मुदतवाढ देण्यात आली. 18 मे 2017 रोजी श्री दत्त इंडियाने सर्वाधिक निविदा भरल्याने त्यांना कारखाना देण्याचा निर्णय झाला; मात्र निविदेतील अटीप्रमाणे 60 कोटी रुपये जिल्हा बॅंकेकडे जमा केल्यानंतरच अंतिम करार होणार होता. "दत्त' ने अनामतपोटी भरलेले एक कोटी, दोन दिवसांपूर्वी 14 कोटी आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याकडे 45 कोटींचा धनादेश दिला. त्यानंतर जिल्हा बॅंकेत दुपारी दोनच्या सुमारास करार झाला.

जिल्हा बॅंकेतर्फे अध्यक्ष दिलीप पाटील, कारखाना प्राधिकृत अधिकारी तथा व्यवस्थापक मानसिंग पाटील, दत्त इंडियाच्या संचालक प्रीती रूपारेल, जितेंद्र धारू, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या उपस्थितीत करार झाला.

Web Title: sangli news vasantdada sugar factory goes to shree datta india company